‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या गौरवास्पद कार्याविषयी आणि त्यांच्या सहवासात मागील ५ वर्षांत आलेल्या आध्यात्मिक अनुभवांविषयी मी काही संतवचनांतून सांगण्याचा प्रयत्न करत आहे; कारण सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे व्यक्तीमत्त्वच एवढे महान आहे की, त्याविषयी सामान्य शब्दांत काही कथन करणे अशक्य आहे.
१. भगवान श्रीकृष्णाने दिलेल्या वचनांची पूर्तता करण्याचे कार्य !
प.पू. डॉ. आठवले यांनी फोंडा (गोवा) येथे धर्मजागृती, हिंदूसंघटन आणि राष्ट्ररक्षण यांसाठी सनातन संस्थेची स्थापना केली. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेतून दिलेल्या वचनांची पूर्तता करण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे.
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ।। – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ४, श्लोक ७
अर्थ : हे भारता (भरतवंशी अर्जुना), जेव्हा जेव्हा धर्माचा र्हास आणि अधर्माची वाढ होत असते, तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो; म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रगट होतो.
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धमसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ।। – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ४, श्लोक ८
अर्थ : सज्जनांच्या उद्धारासाठी, पापकर्म करणार्यांचा बीमोड करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगांत प्रगट होतो.
२. श्रीविष्णुशी आत्मतत्त्वाने एकरूप झालेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
संकेतस्थळ आणि संगणकीय प्रणाली यांच्या माध्यमातून देशविदेशांतील जिज्ञासू सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. त्यासाठी त्यांच्या विश्वविद्यालयातील संत आणि साधक (भक्त) यांनी या अलौकिक कार्यासाठी झोकून दिले आहे.
सद्गुरु डॉ. आठवले सच्चिदानंद परब्रह्म विष्णुस्वरूप वासुदेवांशी आत्मतत्त्वाने इतके एकरूप झाले आहेत की, त्यांना पाहिल्यानंतर मला संत तुकाराम महाराजांच्या खालील अभंगाची प्रचीती येते.
राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ।।
अर्थ : विठ्ठलाचे वर्णन करतांना संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘‘विठ्ठलाचे रूप राजबिंडे, सुकुमार आहे. तो प्रत्यक्ष मदनाचा पुतळाच आहे. त्याचे तेज एवढे आहे की, साक्षात् सूर्य-चंद्राचे तेजही त्यापुढे लोप पावेल.’’
३. ‘आध्यात्मिक प्रगतीचे अलौकिकत्व विद्युतशक्तीची प्राप्ती आहे’, हे सिद्ध करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
आम्हास डॉ. आठवले भेटण्यास येणार हे कळल्यामुळे आम्ही त्यांची आतुरतेने वाट पहात होतो. बरोबर ९ वाजायच्या पहिल्या ठोक्यास सद्गुरूंचे आगमन झाले. त्यांच्या समवेत संवाद साधतांना जाणवले की, डॉ. आठवले यांच्या व्यक्तीमत्त्वात ‘रविशशिकळा’ (सूर्य-चंद्राचे तेज) दडलेल्या आहेत आणि म्हणूनच ते ‘सच्चिदानंद परब्रह्म’ आहेत. असे सांगितले आहे की, ‘आध्यात्मिक प्रगतीचे अलौकिकत्व विद्युतशक्तीची प्राप्ती आहे.’ हे परमेश्वरप्राप्तीचे द्योतक आहे’, असे मी सांगू इच्छितो.
४. नारायणस्वरूप गुरुदेवांच्या सहवासात अलौकिक साधना करणारे सनातनचे साधक !
संत चरणरज लागता सहज । वासनेचें बिज जळूनी जाय ।।
मग रामनाम उपजे आवडी । सुख घडोघडी वाढू लागे ।।
कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे । हृदयी प्रगटे रामरूप ।।
तुका म्हणे साधन सुलभ गोमटे । परी उपतिष्ठे पूर्वपुण्ये ।।
या अभंगाचा अर्थ अगदी सरळ असल्यामुळे विस्तारभयास्तव देत नाही; परंतु फोंडा (गोवा) येथील सनातनच्या रामनाथी आश्रमास भेट दिल्यानंतर प्रत्येक भक्तास हा अनुभव दिल्याचे प्रत्ययास येतेच.
असों द्यावा धीर सदा समाधान । आहे नारायण जवळी च ।।
तुका म्हणे माझा सखा पांडुरंग । व्यापियेलें जग तेणें एकें ।। – तुकाराम गाथा, अभंग ३९०४, ओवी २ आणि ३
हरीच्या, नारायणाच्या भक्तांना भवदुःख, भय, चिंता वहाण्याचे काहीच कारण नाही. भक्तीबंधनात विश्वरूप सखा पांडुरंग सर्वत्र भरून उरला आहे. त्यामुळे विश्वात जी जी घटना घडते, ती सद्गुरूंच्या इच्छेनेच घडत असते. स्वतः समाधानात रहावे. हीच अलौकिक साधना रामनाथी आश्रमातील भक्त, भाविक जन आणि विश्वातील साधक करत आहेत, यात तिळमात्र शंका नाही.
– पू. पंडित डॉ. केशव गिंडे, सुप्रसिद्ध बासरीवादक, पुणे. (२२.४.२०२३)
प.पू. सद्गुरु डॉ. आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सव सोहळ्यात सहभागी होतांना मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की, ‘त्यांचे सर्व मनोरथ पूर्णत्वास न्यावेत. ईश्वराने त्यांना आरोग्यसंपन्न असे शताब्दीपूर्तीचे आयुष्य द्यावे !’ – पू. पंडित डॉ. केशव गिंडे |
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे परमेश्वराशी कार्यरूपी अनुसंधान म्हणजे सनातनचे आश्रम !सद्गुरु डॉ. आठवले यांनी परमेश्वराच्या कार्यरूपी अनुसंधानाने आणि सद्गुरुकृपेने आपल्या संतपदाच्या पुढे अनंताशी ऐक्य साध्य केले आहे. वानगीदाखल (उदाहरणादाखल) ‘रविशशिकळा लोपलिया’ या चरणाचा अनुभव सद्गुरु डॉ. आठवले यांनी आम्ही काही साधक आणि भक्त यांना वर्ष २०२२ मध्ये रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात दिला. आम्ही ‘अनामप्रेम’ या संस्थेच्या कार्यक्रमानिमित्त गोव्यात जमलो होतो. त्या वेळी आमचे १ दिवस रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जाण्याचे नियोजन झाले होते. आम्ही सर्व आश्रम पाहिला. अ. आश्रमातील स्वच्छता आणि सर्व साधकांचा विनम्र सेवाभाव, वेळेचे भान ठेवून सेवा करणे अन् शिस्त इत्यादी आम्ही प्रथमच अनुभवत होतो. आ. आश्रमातील स्वयंपाकघर इतके स्वच्छ होते की, येथे एकावेळी शेकडो साधकांचे जेवण त्यांच्या शरीर प्रकृतीनुसार (पथ्यानुसार) बनवले जाते, यावर डोळ्यांचा विश्वास बसत नव्हता. |
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |