पिंगुळी (सिंधुदुर्ग) येथे प्रथमोपचार शिबिराचे आयोजन
कुडाळ – एखादी व्यक्ती अचानक अत्यवस्थ होते आणि वेळीच उपचार न मिळाल्यास तिचा प्राण जाऊ शकतो. अशा स्थितीत रुग्ण व्यक्तीला योग्य उपचार मिळेपर्यंत आपण प्रथमोपचार करून त्या व्यक्तीचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करू शकतो. विदेशांत प्रथमोपचाराचे शिक्षण सर्वांना दिले जाते; मात्र आपल्याकडे तशी जागृती करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. अशात आरोग्य साहाय्य समितीने प्रथमोपचार प्रशिक्षणाचा उपक्रम घेतला, हे कौतुकास्पद आहे, असे उद़्गार येथील बालरोगतज्ञ डॉ. जयसिंह रावराणे यांनी येथे काढले. पिंगुळी येथे २६ एप्रिल या दिवशी या प्रथमोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याला सनातनचे धर्मप्रचारक सद़्गुरु सत्यवान कदम यांची वंदनीय उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते डॉ. रावराणे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर डॉ. रावराणे यांनी ‘व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्यास त्याच्या छातीवर वारंवार दाब देऊन त्याचे प्राण कसे वाचवू शकतो ?’, याविषयी अत्यंत सोप्या भाषेत तात्त्विक आणि प्रायोगिक भाग शिकवला, तसेच शिबिरार्थींकडून तो भाग करून घेतला.