कराची (पाकिस्तान) येथील सिंध विधानभवनाबाहेर हिंदूंचे सर्वांत मोठे आंदोलन !

  • हिंदूंवरील आक्रमण, धर्मांतर आदींचा विरोध

  • सरकारने मागण्य मान्य न केल्यास परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याची चेतावणी

सिंध विधानभवनाबाहेर हिंदूंचे सर्वांत मोठे आंदोलन

कराची (पाकिस्तान) – येथील सिंध विधानभवनाला हिंदूंनी आंदोलन करून घेराव घातला. पाकधील हिंदूंचे बलपूर्वक होणारे धर्मांतर, अपहरण आणि अल्पवयीन हिंदु मुलींचे अपहरण करून मुसलमानाशी विवाह लावून देण्याच्या वाढत्या घटनांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले. पाकिस्तानमध्ये हिंदूंनी केलेले हे सर्वांत मोठे आंदोलन समजले जाते. आंदोलनकर्त्यांची सरकारच्या प्रतिनिधींनी भेट घेतली. यात सिंध प्रांताच्या मुख्यमंत्र्यांचे मानवाधिकाराविषयीचे विशेष साहाय्यक डॉ. खाटूमल जीवन यांचा समावेश होता. त्यांना हिंदूंनी १४ सूत्री मागण्यांचे निवेदन सादर केले. तसेच मासाभरात मागण्या मान्य न केल्यास पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख आणि परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांच्या घरासमोर निदर्शने करण्याची चेतावणी दिली. सरकारी प्रतिनिधींनी मागण्या मान्य करण्याच्या दिलेल्या आश्‍वासनानंतर आंदोलकांनी माघार घेतली.

१. या आंदोलनाचे नेतृत्व अल्पसंख्यांकांच्या अधिकारांसाठी काम करणार्‍या ‘पाकिस्तान दारावर इत्तेहाद’ (पीडीआय) या संघटनेकडून करण्यात आले. या संघटनेचे प्रमुख फकीर शिवा यांनी सांगितले की, या आंदोलनाचा मूळ उद्देश बालविवाह अधिनियमाची योग्य कार्यवाही करणे हा आहे, तसेच बलपूर्वक धर्मांतराच्या विरोधात संसदेत विधेयक संमत व्हावे.

२. आंदोलनात सहभागी झालेले पीडित राम भील यांनी सांगितले, ‘माझ्या १६ वर्षांच्या मुलीचे काही वर्षापूर्वी अपहरण करून नंतर बलपूर्वक विवाह लावून देण्यात आला होता. लोकांनी इस्लामच्या नावाचा गैरवापर करून आमच्या मुलींवर अन्याय करावा, असे आम्हाला वाटत नाही.’

संपादकीय भूमिका

पाकिस्तानसारख्या कट्टर इस्लामी देशात तेथील हिंदूंनी अशा प्रकारे संघटित होऊन आंदोलन करणे, हे कौतुकास्पद होय !