जीवामृत बनवतांना गूळ आणि बेसन यांना पर्याय म्हणून काय वापरावे ?

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम

सौ. राघवी कोनेकर

‘जीवामृत हे देशी गायीचे शेण, गोमूत्र, बेसन आणि गूळ यांच्यापासून बनवलेले एक मिश्रण आहे. घरगुती लागवडीसाठी ५ लिटर जीवामृत करायचे असेल, तर अर्धी वाटी गूळ आणि अर्धी वाटी बेसन लागते. त्यांचे पर्याय खाली दिले आहेत.

१. बेसनाला पर्याय 

येथे बेसन केवळ चणाडाळीचे अपेक्षित नसून मूग, तूर, मसूर, चवळी, अशा कुठल्याही द्विदल धान्याचे पीठ चालते. स्वयंपाकघरातील चांगले बेसन घेण्याऐवजी डाळी, कडधान्ये निवडतांना त्यांतील छिद्र पडलेली डाळ किंवा कडधान्य निवडून बाजूला काढून ते साठवून ठेवावे. मिक्सरवर दळून त्यांचे पीठ करता येते. हे पीठ जीवामृतासाठी वापरावे.

२. गुळाला पर्याय 

गुळाऐवजी तेवढ्याच प्रमाणात गोड फळांचा गर घेतला, तरी चालतो. केळी, पपई, चिकू, आंबा, या गोड फळांचा गर काढून वापरावा. काही वेळा घरी आणलेली ही फळे अतिरिक्त प्रमाणात पिकतात अन् मऊ होतात. अशा वेळीही त्यांचा गर जीवामृत करण्यासाठी घ्यावा. ऊसाचा रससुद्धा वापरता येतो. तो गुळाच्या चौपट प्रमाणात घ्यावा, उदा. अर्धी वाटी गूळ असेल, तर २ वाट्या ऊसाचा  रस घ्यावा.’

– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (८.३.२०२३)

तुम्हाला ही लेखमालिका कशी वाटली, हे आम्हाला कळवा !

ई-मेल – [email protected]