पुरोगाम्यांचे संधीसाधू गोप्रेम !

‘सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्‍सव’

पंचतत्त्वांविषयी जनजागृती आणि त्यांचे संवर्धन व्हावे,यासाठी २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत कोल्हापूर येथे ‘सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाच्या माध्यमातून विविध उपक्रम चालू असतांनाच अनपेक्षित कारणाने मठाच्या गोशाळेतील १२ गायींचा मृत्यू झाला. काही साम्यवादी आणि पुरोगामी यांनी शहानिशा न करता ५२ गायींचा मृत्यू आणि काही गायी अत्यवस्थ असल्याच्या हाकाट्या पिटण्यास प्रारंभ केला. कोल्हापूर हा साम्यवादी आणि पुरोगामी यांचा बालेकिल्ला (?); मात्र मागील काही वर्षे येथे विविध माध्यमांतून हिंदुतेज पुन्हा जागृत होत चालल्यामुळे पुरोगाम्यांच्या पायाखालील जमीन सरकली आहे. त्यातच ‘पंचमहाभूत लोकोत्सवा’ला भरभरून प्रतिसाद मिळाल्यामुळे पुरोगाम्यांना पोटशूळ उठला. या उत्सवाचा केंद्रबिंदू असणार्‍या कणेरी मठाच्या गोशाळेत गायींचा मृत्यू झाल्यामुळे सुस्तावलेल्या पुरोगाम्यांमध्ये नवउत्साह संचारला आणि गोप्रेमाची झूल पांघरून त्यांनी मठाच्या विरोधात आगपाखड करण्यास आरंभ केला. मठाकडून मागील २५ वर्षे चालू असलेले गोसंवर्धनाचे कार्य गोप्रेमींना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे पशूप्रेमी किंवा गोप्रेमी यांची सहानुभूती मिळवण्याचा ओंगळवाणा प्रयत्न पुरोगाम्यांकडून होत असून हिंदु जनतेकडे त्यांची डाळ शिजणार नाही, हेही तितकेच खरे !

अन्य वेळी गोतस्कर धर्मांधांकडून गायींच्या हत्या होत असतांना बिळात लपून बसणार्‍या पुरोगाम्यांचे गोप्रेम मठातील गायींच्या मृत्यूनंतर कसे काय जागे झाले ? राज्यातील पशूवधगृहांमध्ये धर्मांधांकडून प्रतिदिन सहस्रो गायी कापल्या जातात. सोलापूर येथील अवैध सोनांकुर पशूवधगृहामध्ये तर प्रदूषणाच्या नियमांच्या उल्लंघनासमवेत तेथे बांगलादेशी घुसखोरही सापडले आहेत, तर अनेक ठिकाणी अर्थकारणातून अवैध पशूवधगृहे चालवली जातात. अशा प्रकरणांच्या वेळी या पुरोगाम्यांचे गोप्रेम उफाळून का येत नाही ? या बेगडी गोप्रेमामागे महोत्सवाला गालबोट लावणे आणि प.पू. काडसिद्धेश्वर महास्वामी यांना अपकीर्त करणे, असाच त्यांचा प्रयत्न होता. अन्य वेळी चिकित्सा किंवा पुरावे यांविषयी गप्पा मारणार्‍या पुरोगाम्यांनी गायींचा शवविच्छेदनाचा अहवाल येण्याआधीच, तसेच कोणतीही अधिक माहिती न घेता ‘मठात गायींना शिळे अन्न दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला’, अशी आरोळी ठोकायला आरंभ केला. येथे हरियाणातील नंदीग्राम गोशाळेतील ४५ गोवंशियांना ख्रिस्त्यांनी विष घालून ठार मारल्याच्या घटनेचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. या प्रकरणी काँग्रेसवाल्यांनी गोवंशियांच्या मृत्यूनंतर आंदोलन केले; मात्र गोवंशियांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या ख्रिस्त्यांचा काँग्रेसच्या एक महिला नेत्या राणी कंबोज यांच्या पतीशी संबंध असल्याचे तेथे निष्पन्न झाले. थोडक्यात हिंदुत्वनिष्ठांना अपकीर्त करण्यासाठी पुरोगामी, निधर्मीवादी आणि साम्यवादी यांची टोळी कुठल्या थरापर्यंत जाऊ शकते, हे या घटनेतून दिसून येते. त्यामुळे कणेरी मठ येथील गायींच्या मृत्यूच्या घटनेचीही सखोल चौकशी होणे अावश्यक आहे.

पुरोगाम्यांचा दिशाहीन विरोध !

‘आम्ही विज्ञानवादी’ म्हणून टिमकी वाजवणार्‍या या पुरोगाम्यांची बौद्धिक दिवाळखोरी या पूर्ण प्रकरणात दिसून आली. त्यांचा विरोध नेमका कशाला आहे ? मठात गायींचा मृत्यू होत असल्यामुळे या टोळीतील सदस्य जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देत सुटले आहेत. त्यासह सामाजिक माध्यमांचा वापर करून ‘पंचमहाभूत लोकोत्सव’ आणि प.पू. काडसिद्धेश्वर महाराज यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे; मात्र भ्रमिष्ट झालेल्या पुरोगाम्यांना नेमका विरोध कशाला करायचा, हे समजेनासे झाले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, गायींना जिवंत ठेवण्यासाठी आयुर्वेदीक काढे का दिले गेले नाहीत ? थोडक्यात त्यांचा रोख लोकोत्सवाच्या माध्यमातून होणार्‍या आयुर्वेदाच्या प्रसाराकडे आहे. ‘आयुर्वेदीक काढे देऊन गायींचा मृत्यू का रोखला नाही ?’, असा प्रश्न विचारणार्‍यांनी ‘कोरोनाच्या लसी घेऊनही अनेक रुग्ण का दगावले ?’, याचे उत्तर प्रथम द्यावे. ‘पंचमहाभूत लोकोत्सवा’चे प्रयोजन हे विज्ञान विरुद्ध आयुर्वेद ही दरी रुंदावण्यासाठी नव्हे, तर ती अल्प करण्यासाठी होते; मात्र बुद्धी खुंटीला ठेवून वागणार्‍यांना याविषयी विचार करायला वेळ नाही.

लोकोत्सवाला इस्रोचे शास्त्रज्ञ डॉ. एस्.व्ही. शर्मा उपस्थित राहिल्यामुळेही या पुरोगाम्यांचे पित्त खवळले आहे. विज्ञानवादाच्या अहंकारामुळे फुगलेल्या या बुद्धीवाद्यांची डॉ. शर्मा यांनाही आव्हान देण्याइतपत मजल गेली आहे. डॉ. शर्मा यांनी विज्ञानक्षेत्रात जे कार्य केले, त्याच्या नखाएवढे तरी कार्य या पुरोगाम्यांनी केले आहे का ? त्यामुळे या टोळीकडून होणारा हा विरोध हा हत्ती ऐटीत जात असतांना कुत्र्यांनी त्याच्यावर भुंकण्याचा प्रकार आहे !

लाखोंचा प्रतिसाद ही पुरोगामी-साम्यवाद्यांना चपराक !

पुरोगाम्यांनी कितीही संधीसाधू गोप्रेम दाखवण्याचा प्रयत्न केला असला, तरी ‘पंचमहाभूत लोकोत्सवा’ ला समाजातून लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पहाता ‘या महोत्सवाचा उद्देश साध्य झाला’, असेच म्हणावे लागेल. कोणत्याही ध्येयाची पूर्ती करतांना त्यामध्ये अडथळे हे येतातच. अशा अडथळ्यांकडे दुर्लक्ष करून ध्येयाच्या दिशेने केलेली प्रामाणिक वाटचाल ही ध्येयप्राप्तीपर्यंत पोचवल्याविना रहात नाही. या महोत्सवाच्या माध्यमातून बालकांपासून प्रौढांपर्यंत पंचतत्त्वांचे महत्त्व पोचले आहे, तसेच त्यांच्या संवर्धनासाठी कृतीशील होण्याचा निर्धार या महोत्सवाच्या माध्यमातून अनेकांनी केला आहे. महोत्सवाच्या माध्यमातून व्यापक जनजागृतीनंतर समाजातील लोकांकडून कृतीच्या दिशेने वाटचाल होण्यास आरंभ झालेला आहे. महोत्सवाच्या माध्यमातून झालेली जनजागृती भारताच्या कानाकोपर्‍यापर्यंत पोचून येणार्‍या काळात भारताला विश्वगुरु बनवण्यात या महोत्सवाचा मोठा वाटा असेल, हे निश्चित !

गोप्रेमाची झूल पांघरून हिंदूंचे संत आणि मठ यांच्यावर टीका करणारे पुरोगामी हे वैचारिक आतंकवादी !

हे ही वाचा आणि पहा –

१२ गायी मृत्यूमुखी पडल्या असून अन्य गायींवर उपचार चालू ! – वाय.ए. पठाण, जिल्हा उपायुक्त, पशूसंवर्धन, कोल्हापूर
https://sanatanprabhat.org/marathi/657350.html

कणेरी मठातील गायींच्या आकस्मिक मृत्यूमागे षड्यंत्र आहे का ? याची चौकशी व्हावी ! – हिंदु जनजागृती समिती
https://sanatanprabhat.org/marathi/657189.html

पंचतत्त्वांचे संवर्धन करणारा, मानवी आरोग्‍य जपणारा आणि विविध माध्‍यमांतून प्रबोधन करणारा कणेरी मठ !
https://sanatanprabhat.org/marathi/652067.html

गोशाळा कणेरी मठ कोल्हापूर (व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा)

__________________________________