पंचतत्त्वांचे संवर्धन करणारा, मानवी आरोग्‍य जपणारा आणि विविध माध्‍यमांतून प्रबोधन करणारा कणेरी मठ !

२० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत कोल्‍हापूर येथे होणार्‍या ‘सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्‍सवा’च्‍या निमित्ताने…

‘श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्‍थान’च्‍या वतीने २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत ‘सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्‍सव’ आयोजित करण्‍यात आला आहे. या निमित्ताने सिद्धगिरी संस्‍थान, तेथील इतिहास-परंपरा, कार्य यांचा हा आढावा !

‘श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्‍थान’

१. मठाला १ सहस्र ३५० वर्षांची परंपरा आणि ३५० पेक्षा अधिक शाखा !

मठाला १ सहस्र ३५० वर्षांची परंपरा असून गोवा, महाराष्‍ट्र आणि कर्नाटक येथे मठाच्‍या ३५० हून अधिक शाखा आहेत. ७ व्‍या शतकात प.पू. आद्य काडसिद्धेश्‍वर स्‍वामी श्री निर्वायाव यांनी काडसिद्धेश्‍वर श्री क्षेत्र सिद्धगिरी, कणेरी येथे येऊन भक्‍तांना आध्‍यात्मिक आणि दैनंदिन जीवन सुखकारक होण्‍यासाठी मार्गदर्शन करण्‍यास प्रारंभ केला. वर्ष १९२२ मध्‍ये प.पू. मुप्‍पीन काडसिद्धेश्‍वर स्‍वामीजींनी ४८ वे मठाधिपती म्‍हणून दायित्‍व स्‍वीकारले. त्‍यानंतर प.पू. मुप्‍पीन काडसिद्धेश्‍वर स्‍वामीजींनी मठाच्‍या आध्‍यात्‍मिक परंपरेचे संवर्धन करत मठाचा सामाजिक कार्याच्‍या क्षेत्रात समावेश केला. ४९ वे मठाधिपती म्‍हणून प.पू. अदृश्‍य काडसिद्धेश्‍वर स्‍वामीजींनी वर्ष १९८६ मध्‍ये कार्यभार स्‍वीकारला.

प.पू. अदृश्‍य काडसिद्धेश्‍वर स्‍वामीजी

प.पू. अदृश्‍य काडसिद्धेश्‍वर स्‍वामीजी यांनी प.पू. मुप्‍पीन स्‍वामीजींनी चालू केलेल्‍या परंपरेला पुढे नेत लोकांसाठी कल्‍याणकारी कार्य चालू केले. जंगलाला कन्‍नड भाषेत ‘काड’ म्‍हटले जाते आणि सिद्धेश्‍वरचा अर्थ ‘महान पुरुष’ असा आहे. इ.स. ७ व्‍या शतकात कणेरी मठ या ठिकाणी असलेल्‍या जंगलात अनेक सिद्ध पुरुष/महान संत येऊन ध्‍यानधारणा करायचे; म्‍हणून येथील स्‍वामीजींना ‘काडसिद्धेश्‍वर स्‍वामी’ म्‍हणतात. प.पू. स्‍वामीजींनी पंचतत्त्वांचे महत्त्व ओळखून ही तत्त्वे संवर्धित करण्‍यासाठी मठामध्‍ये विविध प्रयोग चालू केले.


हे ही वाचा – 

सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाच्या माध्यमातून पंचतत्त्वांचे संवर्धन आणि लोकजागृती ! – प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी

https://sanatanprabhat.org/marathi/651357.html


२. मठात ६४ कला आणि १४ विद्या यांचे विनामूल्‍य शिक्षण देणारे गुरुकुल !

स्‍वामीजींनी मठात देशी गोवंशाची गोशाळा, रुग्‍णालये, शाळा, महाविद्यालय, सेंद्रिय शेती, लखपती शेती प्रकल्‍प, महिला सक्षमीकरणासाठी लघुउद्योग, ६४ कला आणि १४ विद्या यांचे विनामूल्‍य शिक्षण देणारे गुरुकुलम्, गो-आधारित औषध निर्मिती केंद्र, अनाथ आणि दुर्बल घटकांच्‍या मुलांसाठी ‘आनंदाश्रम’, असे अनेक लोकोपयोगी प्रयोग साकारले आहेत. स्‍वामीजींनी आशिया खंडातील नामांकित असे ‘संग्रहालय’ निर्माण केले आहे. यात प्राचीन भारतीय स्‍वयंपूर्ण ग्रामजीवन, कृषी परंपरा आणि उत्‍सव यांचे एकत्रित दर्शन पहायला मिळते.

३. अन्‍य कार्य

याचसमवेत भारतीय स्‍वातंत्र्यसैनिकांची गाथा सांगणारे भव्‍य ‘थ्रीडी स्‍क्रीन’ असणारे ‘प्रेरणा पार्क’ही लोकांना प्रेरक ठरले आहे. मठामध्‍ये ‘कृषी अनुसंधान परिषद, नवी देहली’ पुरस्‍कृत ‘कृषी विज्ञान केंद्रा’ची स्‍थापना डिसेंबर २०१८ मध्‍ये करण्‍यात आली आहे. याद्वारे परिसरातील शेतकर्‍यांना सतत मार्गदर्शन केले जाते. कणेरी मठ पंचतत्त्वांचे संवर्धन करणे, भूमी, तसेच मानवी आरोग्‍य जपण्‍याचे अव्‍याहतपणे काम आणि विविध उपक्रमांच्‍या माध्‍यमातून प्रबोधन करत आहे.

संकलक : श्री. भारतभूषण गिरी, कोल्‍हापूर