चंद्रपूर येथील जिल्‍हाधिकारी विनय गौडा यांना अटक करण्‍याचे आदेश !

चंद्रपूर – जिवती तालुक्‍यातील कुसुंबी या गावातील आदिवासींच्‍या भूमी प्रकरणात विनोद खोब्रागडे यांनी राष्‍ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाकडे तक्रार प्रविष्‍ट केली होती. जिल्‍हाधिकारी विनय गौडा यांना १६ फेब्रुवारी या दिवशी आयोगापुढे उपस्‍थित रहाण्‍याचे आदेश दिले होते; मात्र आयोगापुढे ते स्‍वतः उपस्‍थित झाले नाहीत. त्‍यांच्‍या जागी उपजिल्‍हाधिकारी तृप्‍ती सूर्यवंशी उपस्‍थित झाल्‍या. त्‍यामुळे आयोगाने गौडा यांना अटक करून २ मार्चपर्यंत आयोगापुढे उपस्‍थित करावे, असा आदेश पोलीस महासंचालकांना दिला आहे.

पूर्वीच्‍या माणिकगड आणि आताच्‍या अल्‍ट्राटेक सिमेंट उद्योग समुहाने कुसुंबी येथील आदिवासींच्‍या भूमींवर ३६ वर्षांपासून अवैध नियंत्रण मिळवले आहे, असा आरोप पीडित आदिवासींनी केला आहे, तसेच या प्रकरणात गेल्‍या अनेक वर्षांपासून न्‍यायालयीन लढा चालू आहे.