श्रीकृष्‍णजन्‍मभूमीच्‍या सर्वेक्षणाच्‍या निर्णयावर २५ जानेवारीला पुढील सुनावणी

मुसलमान पक्षकारांकडून करण्‍यात आला आहे विरोध !

मथुरा (उत्तरप्रदेश) – श्रीकृष्‍णजन्‍मभूमीच्‍या प्रकरणाची येथील जिल्‍हा न्‍यायालयात २० जानेवारी या दिवशी सुनावणी झाली. या वेळी मुसलमान पक्षाकडून न्‍यायालयाकडून जन्‍मभूमीचे सर्वेक्षण करण्‍याच्‍या आदेशाच्‍या विरोधात युक्‍तीवाद करण्‍यात आला. या वेळी हिंदु पक्षाकडूनही बाजू मांडण्‍यात आली. आता या प्रकरणावर पुढील सुनावणी २५ जानेवारी या दिवशी होणार आहे.

अखिल भारतीय हिंदु महासभेकडून सर्वेक्षणाच्‍या संदर्भात न्‍यायालयाला १८ जानेवारी या दिवशी एक प्रार्थनापत्र सादर करण्‍यात आले होते. हे पत्रही या वेळी न्‍यायालयाकडून वाचण्‍यात आले. याविषयी हिंदु महासभेचे राष्‍ट्रीय कोषाध्‍यक्ष दिनेश शर्मा यांनी माहिती देतांना सांगितले की, या पत्राद्वारे आम्‍ही मागणी केली आहे की, सर्वेक्षणाच्‍या वेळी जिल्‍हाधिकार्‍यांच्‍या समवेत पोलीस अधीक्षक आणि वृंदावनचे महापौर यांनीही उपस्‍थित रहावे, जेणेकरून शांतता बिघडवण्‍याचा प्रयत्न होणार नाही. ‘सर्वेक्षणाच्‍या वेळी मुसलमान पक्षाकडून दगडफेक होऊ शकते’, असा आरोपही त्‍यांनी केला.