देवतांचा अवमान करणार्‍या चित्रपटांची निर्मिती रोखण्‍यासाठी प्रयत्न करणार !

  • शंकराचार्य स्‍वामी अविमुक्‍तेश्‍वरानंद सरस्‍वती यांचे प्रतिपादन !

  • शंकराचार्यांच्‍या अध्‍यक्षतेखाली कार्यरत असेल १० जणांचे मंडळ !

  • सेन्‍सॉर बोर्डात धार्मिक व्‍यक्‍तींचा समावेश न केल्‍याने निर्णय !

‘धर्म सेन्‍सॉर बोर्डा’ची अधिकृत स्‍थापना !

वास्‍तविक हिंदूंच्‍या धार्मिक भावना दुखावणार्‍या चित्रपटांवर सरकारने स्‍वतःहूनच बंदी घातली पाहिजे. त्‍यासाठी थेट शंकराचार्यांना पुढाकार घ्‍यावा लागू नये. आता तरी ‘सरकारने या मंडळाला अधिकृत दर्जा देऊन शंकराचार्यांच्‍या धर्महानी रोखण्‍याच्‍या कार्याला हातभार लावावा’, असेच हिंदूंना वाटते !

स्‍वामी अविमुक्‍तेश्‍वरानंद सरस्‍वती
ज्‍योतिष पीठाचे शंकराचार्य स्‍वामी अविमुक्‍तेश्‍वरानंद सरस्‍वती

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – ज्‍योतिष पीठाचे शंकराचार्य स्‍वामी अविमुक्‍तेश्‍वरानंद सरस्‍वती यांनी १० सदस्‍यीय ‘धर्म सेन्‍सॉर बोर्ड’ स्‍थापन केल्‍याची अधिकृत घोषणा केली. हे बोर्ड हिंदूंच्‍या देवता आणि संस्‍कृती यांचा अवमान करणारे चित्रपट, वेब सिरीज आदींवर लक्ष ठेवणार आहेत. या मंडळाचे अध्‍यक्ष स्‍वत: अविमुक्‍तेश्‍वरानंद सरस्‍वती हे आहेत. इतर ९ सदस्‍यांमध्‍ये सुरेश मनचंदा (माध्‍यम क्षेत्रातील तज्ञ), पी.एन्. मिश्रा (वरिष्‍ठ अधिवक्‍ता, सर्वोच्‍च न्‍यायालय), स्‍वामी चक्रपाणी महाराज (हिंदु महासभा), मानसी पांडे (अभिनेत्री), तरुण राठी, कॅप्‍टन अरविंद सिंह भदौरिया (सामाजिक विषयातील तज्ञ), प्रीती शुक्‍ला, गार्गी पंडित (सनातन धर्मातील तज्ञ) आणि धरमवीर (पुरातत्‍व सर्वेक्षणाचे माजी संचालक) यांचा समावेश असणार आहे. ‘देवतांचा अवमान करणार्‍या चित्रपटांची निर्मिती थांबवण्‍यासाठी मंडळाच्‍या माध्‍यमातून पावले उचलली जातील’, असे शंकराचार्यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

माघ मेळ्‍यात शंकराचार्यांनी पत्रकारांकडे मांडलेली सूत्रे

१. आमचे तज्ञ मंडळ चित्रपट प्रदर्शित झाल्‍यावर तो पहातील आणि जर आम्‍हाला तो सनातन धर्माशी संबंधित लोकांसाठी योग्‍य वाटला, तरच आम्‍ही त्‍याविषयीचे प्रमाणपत्र देऊ. सध्‍या सरकारने स्‍थापन केलेल्‍या केंद्रीय चित्रपट परीनिरीक्षण मंडळाने (सेन्‍सॉर बोर्डाने) प्रमाणपत्र दिलेेल्‍या चित्रपटांमध्‍ये लोकांच्‍या भावना दुखावणारी अनेक दृश्‍ये आढळतात. परीनिरीक्षण मंडळात धार्मिक व्‍यक्‍तींचा समावेश करण्‍याची मागणी आम्‍ही वारंवार केली आहे; पण ही मागणी मान्‍य झालेली नाही. त्‍यामुळेच आम्‍ही आमचे स्‍वतःचे सेन्‍सॉर बोर्ड स्‍थापन केले आहे.

२. आम्‍ही बोर्डाची मार्गदर्शक तत्त्वे घोषित केली आहेत. हे सेन्‍सॉर बोर्ड कोणत्‍याही प्रकारचे चित्रीकरण किंवा ऑडिओ यांचे प्रसारण, हिंदूंच्‍या देवतांचा अपमान  रोखण्‍यासाठी मार्गदर्शक म्‍हणून काम करेल. स्‍वस्‍त लोकप्रियतेसाठी सनातन संस्‍कृतीचा विपर्यास करणारे चित्रपट, वेब सिरीज आणि मालिका यांची निर्मिती खपवून घेतली जाणार नाही.

३. आमच्‍या सेन्‍सॉर बोर्डाची निर्मिती सरकारला साहाय्‍य करण्‍यासाठी करण्‍यात आली आहे. हे बोर्ड चित्रपट, वेब सिरीज आणि मालिका बनवणार्‍या सर्व चित्रपट निर्माते आणि दिग्‍दर्शक यांच्‍याशी संपर्क साधून त्‍यांना या संदर्भात माहिती देईल. असे असूनही जर हिंदुविरोधी आणि भावना दुखावणारे चित्रपट आणि मालिका बनवल्‍या गेल्‍या, तर त्‍या न पहाण्‍याचे आवाहन हिंदु समाजाला करण्‍यात येईल.