रत्नागिरीत आंबा बागायतदारांनी केलेल्या आंदोलनात शासनाला दिली चेतावणी

मागण्या मान्य न झाल्यास प्रजासत्ताकदिनी तीव्र आंदोलन !

आंबा बागायतदारांच्या आंदोलनातील उपस्थित शेतकरी

रत्नागिरी – कोकणातील बागायतदारांकडून शासनाकडे विविध मागण्या करण्यात आल्या आहेत; मात्र या मागण्यांवर शासनाने कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने येथील आंबा बागायतदारांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या वेळी ‘कोकणातील बागायतदारांना न्याय मिळालाच पाहिजे’, ‘कर्जमाफी झालीच पाहिजे’, अशा घोषणा आंबा बागायतदारांकडून देण्यात आल्या. बागायतदारांचा विचार शासनाने केला नाही, तर २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी तीव्र आंदोलन करणार, अशी चेतावणी या आंदोलनात देण्यात आली. शासनाला द्यायचे निवेदन जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांना देण्यात आले.

या वेळी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप सावंत, डॉ. विवेक भिडे, उपाध्यक्ष प्रकाश साळवी, रामचंद्र देसाई, मंदार साळवी आणि अन्य बागायतदार उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की, ११ सहस्र ३२६ शेतकर्‍यांचे २२३.८६ कोटी थकित कर्ज माफ करण्याच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांकडे अनेक वर्षांपासून दुर्लक्ष केले जात आहे. कोरोनाचे संकट, चक्रीवादळे अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये अडकलेले बागायतदार मोठ्या आर्थिक संकटात आहेत.

२०२१-२२ यावर्षीच्या आंबा हंगामात आणि नोव्हेंबर मासात अवेळी पाऊस, ढगाळ वातावरण, अनियमित तापमान यांमुळे झाडांना भरपूर मोहोर आला; मात्र पालटत्या हवामानामुळे छोट्या कैरीवरही परिणाम झाला. अल्प कैरी धरणे किंवा ती गळून पडणे, असेही झाले आहे. बागायतदारांनी काढलेल्या कर्जातील ६ टक्के व्याजदर माफ करण्याचा अध्यादेश झाला; मात्र अर्थसंकल्पात नसल्याने त्याचा काहीच लाभ शेतकर्‍यांना झालेला नाही.