तिहार कारागृहात ‘आप’च्या मंत्र्याला विशेष वागणूक !

  • कारागृहात मंत्र्यांना मालिश केली जात असल्याचे सीसीटीव्हीचे चित्रण भाजपकडून प्रसारित

  • ‘आप’कडून स्पष्टीकरण

आम आदमी पक्षाच्या सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांना तिहार कारागृहात विशेष सुविधा

नवी देहली – आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी सध्या तिहार कारागृहात असलेले देहलीतील आम आदमी पक्षाच्या सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांना विशेष सुविधा पुरवण्यात येत असल्याचा आरोप भाजपकडून केला जात होता. कारागृहात त्यांना मालिश केले जात असल्याचे सीसीटीव्हीचे चित्रण असलेला व्हिडिओ आता भाजपकडून प्रसारित करण्यात आला आहे. यानंतर आम आदमी पक्षाने यावर स्पष्टीकरण दिले आहे.

आम आदमी पक्षाकडून उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी म्हटले की, मालिश हा सत्येंद्र जैन यांच्या आजारपणावरील उपचारांचा एक भाग आहे. एका आजारी व्यक्तीवरील उपचारांचे सीसीटीव्ही चित्रण प्रसारित करून त्यावर वाईट विनोद करण्याचे काम केवळ भाजपच करू शकते. जैन त्यांच्या मणक्याला दुखापत झाली होती.