मुख्य संशयित वाल्मिक कराड पुणे पोलिसांना शरण !

  • मस्साजोगच्या (बीड) सरपंचांचे हत्या प्रकरण

  • पाषाण येथील गुन्हे अन्वेषण विभागाकडे शरणागती !

पुणे – अनेक दिवसांपासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सूत्रधार संशयित वाल्मिक कराड ३१ डिसेंबर या दिवशी पाषाण येथील गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सी.आय.डी.) शरण आला आहे. आतापर्यंत या प्रकरणामध्ये ४ जणांना अटक करण्यात आली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील वाल्मिक कराड हा ३ आठवड्यांपासून पसार झाला होता. त्याचा शोध गुन्हे अन्वेषण विभागाकडून करण्यात येत होता.

शरण येण्यापूर्वी वाल्मिकी कराड याने सामाजिक माध्यमांवर एक चित्रफीत प्रसारित केली आहे. त्यात ‘मी वाल्मिक कराड, केज पोलीस ठाण्यात माझ्या विरोधात खोटी खंडणीची तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असतांनाही मी पोलिसांना शरण आलो आहे. संतोष देशमुख यांचे जे कुणी मारेकरी असतील, त्यांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. माझे नाव राजकीय स्वार्थापोटी जोडले जात आहे. पोलिसांच्या अन्वेषणामध्ये मी दोषी आढळलो, तर मला फाशी द्यावी. ती मी भोगायला सिद्ध आहे’, असे कराड यांनी म्हटले आहे.

वाल्मिक कराड कोण ?

वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय मानला जातो. स्वत: पंकजा मुंडे यांनी एका जाहीर सभेत त्याच्याविषयी म्हटले होते की, ‘वाल्मिक कराड याच्याविना धनंजय मुंडे यांचे पानही हलत नाही.’ संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर विरोधकांकडून वाल्मिक कराड याला लक्ष्य करण्यात आले होते.