स्थिर राहून शांतपणे मृत्यूला सामोरे जाणारे कै. शिरीष देशमुख

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. शिरीष देशमुख (वय ७६ वर्षे) यांच्या निधनानंतरचा आज बारावा दिवस आहे, त्यानिमित्ताने…

२७.१०.२०२२ या दिवशी सकाळी ९.३५ वाजता श्री. शिरीष देशमुख यांचे देहावसान झाले. त्यानिमित्त साधकांना त्यांचे जाणवलेले वैशिष्ट्यपूर्ण गुण आणि त्यांच्या निधनापूर्वी अन् निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

कै. शिरीष देशमुख

१. शिरीष देशमुखकाका यांच्या रक्तातील प्राणवायूचे प्रमाण न्यून झाल्यामुळे त्यांना धाप लागून श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागणे आणि त्यांना यंत्राद्वारे कृत्रिम प्राणवायू दिल्यावरही त्यांची अस्वस्थता न्यून न होणे

‘२७.१०.२०२२ या दिवशी सकाळी ७.४५ वाजता शिरीष देशमुख यांच्या रक्तातील प्राणवायूचे प्रमाण (ऑक्सिजन लेव्हल) न्यून झाल्यामुळे त्यांना धाप लागली. त्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. आम्ही त्यांना यंत्राद्वारे कृत्रिम प्राणवायू (ऑक्सिजन) दिला. त्यानंतर औषधी द्रवाचा फवारा (नेब्युलायझर) दिला, तरीही त्यांची अस्वस्थता न्यून झाली नाही. त्यांच्यावर मी आणि सहसाधक वैद्य मेघराज पराडकर उपचार करत होतो; परंतु त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर झाली.

२. देशमुखकाकांनी कपाळावर हात ठेवायला सांगताच वैखरीतून ‘ॐ’ चा नामजप चालू  होऊन त्यांना लागलेली धाप थोडी न्यून होणे, तेव्हा ते ‘ॐ कारा’मध्ये विलीन होत आहेत’, असा विचार येणे

सुश्री (कुमारी) सुगुणा गुज्जेट्टी

त्या वेळी काका मला म्हणाले, ‘‘सुगुणा, तुझा हात माझ्या कपाळावर ठेव.’’ त्याप्रमाणे मी तसे केले. मी ‘हा हात प.पू. गुरुदेवांचाच (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा) आहे’, असा भाव ठेवून हात त्यांच्या कपाळावर ठेवला. त्या क्षणी माझा वैखरीतून आपोआप ‘ॐ’ चा नामजप चालू झाला. त्यानंतर काकांना लागलेली धाप थोडीशी न्यून झाली आणि ते शांत झाले. तेव्हा माझ्या मनात ‘काका ‘ॐ कारा’मध्ये विलीन होत आहेत’, असा विचार आला. त्यानंतर आम्ही काकांना रुग्णालयात पाठवले.

३. काकांना रुग्णालयात नेत असतांना अर्ध्या मार्गात (रस्त्यात) असतांना ‘काकांचे देहावसान झाले आहे’, असा मला निरोप मिळाला.

४. देशमुखकाकांची इच्छाशक्ती पुष्कळ प्रबळ असणे

अ. त्यांनी आजारपणातही कधी चाकाच्या आसंदीचा (व्हील चेअरचा) उपयोग केला नव्हता.

आ. ते शेवटच्या क्षणी सुद्धा रुग्णवाहिकेत बसण्यासाठी स्वतःच चालत गेले.’

– कु. सुगुणा गुज्जेटी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.१०.२०२२)


इतरांना सर्वतोपरी साहाय्य करणारे कै. शिरीष देशमुख!

१. स्वावलंबी असणे

श्री. चेतन हरिहर

‘वर्ष २०२१ मध्ये देशमुखकाकांची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली होती. त्यांना डायलिसिससाठी रुग्णालयात जावे लागायचे. रुग्णालयातून आल्यावर ते थोडावेळ विश्रांती घेत. नंतर स्वतःच स्वयंपाक घरात जाऊन त्यांच्यासाठी करून ठेवलेला महाप्रसाद वाढून घेत असत. आतापर्यंत त्यांनी १ – २ वेळाच महाप्रसाद खोलीत आणून देण्यास साधकांना सांगितले होते. ते स्वतःला जेवढे कपडे धुणे शक्य आहे, तेवढे कपडे स्वतःच धुऊन वाळतसुद्धा घालत असत.

२. परेच्छेने वागणे

काकांकडे अगदी न्यून कपडे होते आणि तेच ते घालत होते. त्यांच्या नातेवाइकांनी त्यांना भेट म्हणून १ – २ कपडे दिले होते. ते त्यांनी तसेच ठेवले होते. ‘एखादा सण असल्यास काका त्यातले कोणते कपडे घालू ?’, असे साधकांना विचारायचे आणि त्यांनी सांगितलेले कपडे परिधान करायचे.

३. इतरांना सर्वतोपरी साहाय्य करणे

एकदा मी काकांना घेऊन रुग्णालयात गेलो. त्या दिवशी रुग्णालयात इतरही सेवा होत्या. काकांनी त्या मला करण्यास सांगितले. एवढेच नव्हे, तर ‘त्या सेवा कुठे जाऊन करायच्या’, हे केवळ न सांगता प्रत्यक्षात मला ती जागा दाखवून मग ते डायलिसिस करण्यासाठी गेले.

४. सेवेची तळमळ

रुग्णालयातील सेवा संपवून काकांजवळ गेलो, तेव्हा काका झोपून भ्रमणभाषवर सेवा करत होते. त्या वेळी काका आणि माझ्यात झालेले संभाषण पुढे दिले आहे.

मी : तुम्ही विश्रांती घ्या आणि भ्रमणभाष बाजूला ठेवा.

देशमुखकाका : ‘मी आहे, तोपर्यंत सेवा करतो’, असे हसत म्हणाले.

त्यावरून साधक आणि सेवा यासंदर्भातील काकांचे विचार माझ्या लक्षात आले.’

-श्री. चेतन हरिहर, सनातन आश्रम, गोवा. (२८.१०.२०२२)

श्री. शिरीष देशमुख यांच्या निधनानंतर त्यांचा मृतदेह सजीव वाटणे

‘कै. शिरीष देशमुख यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्याची संधी मला लाभली. त्या वेळी मला पुढीलप्रमाणे जाणवले.

पू. संदीप आळशी

१. श्री. देशमुखकाका यांचे डोळे थोडे उघडे होते आणि दृष्टीत जिवंतपणा जाणवत होता. त्यांचा श्वासोच्छ्वास चालू असल्याचेही जाणवत होते. ‘ते आपल्याशी संवाद साधायचा प्रयत्न करत आहेत’, असे वाटत होते. त्यांचा देह साधनेमुळे चैतन्यमय झाल्यामुळे मृत्यूनंतरही तो सजीव वाटत होता. माझ्याप्रमाणेच त्या वेळी अंत्यदर्शन घेणार्‍या अन्य साधकांनाही असे जाणवले.

२. मनाला शांतीची स्पंदने जाणवत होती.

काही साधक विद्यमान असतांना त्यांची साधना आणि गुणवैशिष्ट्ये यांवरून त्यांची आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे घोषित केले जाते. अशा साधकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यदर्शनाच्या वेळी त्यांच्या संदर्भात येणार्‍या वरील प्रकारच्या अनुभूतींवरून त्यांची आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे सिद्धही होते.’

– (पू.) संदीप आळशी, सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा. (३०.१०.२०२२)


सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर अढळ श्रद्धा असणारे कै. शिरीष देशमुख!

१. इतरांचा विचार करणे

कु. रजनीगंधा कुर्‍हे

‘शिरीष देशमुखकाका यांना प्रत्येक गुरुवारी डायलिसिस करण्यासाठी रुग्णालयात न्यावे लागत होते; परंतु ‘साधकांना त्रास होऊ नये आणि त्यांचा वेळ वाचावा’, यांसाठी काका स्वतः गाडी चालवून बाहेरील रुग्णालयात जाऊ का ?’, असे विचारत असत. यावरून त्यांच्यात ‘इतरांचा विचार करणे’ हा मोठा गुण असल्याचे माझ्या लक्षात आले. (डायलिसिस : मूत्रपिंड निकामी झाल्यावर हा उपचार करतात. यात यंत्राद्वारे रक्तातील अशुद्ध घटक बाहेर फेकून शरिराला शुद्ध रक्त पुरवले जाते.)

२. कुठलीही आसक्ती न ठेवता मृत्यूला सामोरे जाण्याची पूर्ण सिद्धता करणारे शिरीष देशमुख !

२१.१०.२०२२ या दिवशी मी देशमुखकाकांना दिवाळीनिमित्त नमस्कार करण्यासाठी गेल्यावर ते मला म्हणाले, ‘‘मी आता अधिक दिवस रहाणार नाही.’’ त्या वेळी काकांना त्यांच्या ‘मृत्यूची पूर्वसूचना मिळाली असावी’, असे मला वाटले. तेव्हा मला त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या मनात व्यवहार, घरची नाती आणि स्वतःचा देह या संदर्भातील कुठलीच आसक्ती, तसेच मृत्यूची भीती नसल्याचे मला जाणवत होते. ‘त्यांची मृत्यूला सामोरे जाण्याची पूर्ण सिद्धता झाली आहे’, असे मला जाणवले. जणूकाही त्यांच्या साधनाप्रवासात ‘मृत्यू हा कुठला अडथळा नसून ती एक सहज प्रक्रिया आहे.’ ‘मृत्यूनंतरही स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीची काळजी परात्पर गुरु डॉ. आठवले घेणार आहेत’, अशी अढळ श्रद्धा त्यांच्या बोलण्यातून मला जाणवली. त्यांची ‘ही श्रद्धा किती दृढ आहे’, हे मला शिकायला मिळाले.

३. निधनापूर्वी

२२.१०.२०२२ या दिवसापासून देशमुखकाका यांच्याकडे पाहिल्यावर ‘त्यांच्या तोंडवळ्याभोवती मृत्यूची दाट छाया दिसत होती. ते आवरण नसून ती मृत्यूची छाया आहे’, असे मला जाणवले.

४. निधनानंतर

अ. ‘कै. देशमुखकाका यांचा मृतदेह पाहिल्यावर मृतदेहाभोवती पिवळे सोनेरी कवच आहे’, असे मला दिसले. ‘जणू ईश्वर त्यांच्या देहाचे रक्षण करत आहे’, असे मला जाणवले.

आ. ‘त्यांचा प्राण त्याच्या मुखातून गेला असून त्यांच्या मुखातून पुष्कळ प्रमाणात चैतन्य बाहेर पडत आहे’, असे मला जाणवत होते.

इ. कै. काका ज्ञानमार्गी असल्याने त्यांचे हातही मुद्रावस्थेत (अंगठा आणि तर्जनी यांची टोके जुळलेली अशा स्थितीत) होते आणि ‘त्यांचे देहावसान झाल्यावरही ते ध्यानस्थ आहेत’, असे मला वाटले.

५. ‘दिवाळीच्या २२ ते २६.१०.२०२२ या कालावधीत साधकांना कुठला त्रास होऊ नये’, यांसाठी ‘त्यांचा मृत्यू ४ दिवस देवानेच पुढे ढकलला कि काय ?’, असे मला वाटले. 

६. ‘कै. शिरीष देखमुख यांची मृत्यूच्या वेळी आध्यात्मिक पातळी ६३ टक्के आहे’, असे मला जाणवले.’ (त्यांची आध्यात्मिक पातळी ६४ टक्के झाली आहे.- डॉ. आठवले)

– कु. रजनीगंधा कुर्‍हे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.१०.२०२२)


कै. शिरीष देशमुख यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत असतांना जाणवलेले सूत्र आणि आलेली अनुभूती

१. ‘मी देशमुखकाका यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत असतांना त्यांच्या तोंडवळ्याकडे पाहिल्यावर मला चैतन्य जाणवले.

२. काकांच्या पायांकडे पाहिल्यावर काही क्षण मला शांतीची अनुभूती आली.’

– होमिओपॅथी वैद्या (सुश्री (कु.)) आरती तिवारी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.१०.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या व संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक