सिडनी (ऑस्‍ट्रेलिया) येथे भारतीय विद्यार्थ्‍यावर वर्णद्वेषातून चाकूद्वारे प्राणघातक आक्रमण

प्रतिकात्मक छायाचित्र

सिडनी (ऑस्‍ट्रेलिया) – ऑस्‍ट्रेलियामध्‍ये शिक्षणासाठी गेलेल्‍या शुभम गर्ग या २८ वर्षीय भारतीय विद्यार्थ्‍यावर वर्णद्वेषातून ११ वेळा चाकूचे वार करण्‍यात आले. यात त्‍याचा तोंडवळा, छाती आणि पोट यांवर गंभीर जखमा झाल्‍याची माहिती त्‍याच्‍या कुटुंबियांनी दिलीे. शुभमवर सध्‍या सिडनीमधील एका रुग्‍णालयात उपचार चालू असून त्‍याची प्रकृती चिंताजनक आहे. शुभमचे कुटुंबीय आगर्‍यामध्‍ये रहातात. या प्रकरणी पोलिसांनी २७ वर्षीय संशयिताला अटक केली आहे. शुभम काही दिवसांपूर्वीच ऑस्‍ट्रेलियाला गेला होता.

१. सिडनीच्‍या ‘युनिव्‍हर्सिटी ऑफ न्‍यू साऊथ वेल्‍स’मध्‍ये शुभम गर्ग ‘मेकॅनिकल इंजिनिअरिंग’मध्‍ये ‘पी.एच्‌डी’.चे शिक्षण घेत होता. शुभम याने आयआयटी मद्रासमधून बी.टेक. आणि एम्.एस्.सी.चे शिक्षण पूर्ण केले आणि पुढील शिक्षणासाठी तो ऑस्‍ट्रेलियाला गेला.

२. या घटनेविषयी शुभमचे वडील रामनिवास गर्ग यांनी सांगितले की, शुभम किंवा त्‍याचे मित्र आक्रमण करणार्‍याला ओळखत नव्‍हते. हे वर्णद्वेषातून करण्‍यात आलेले आक्रमण असल्‍याचे दिसते. आम्‍ही भारत सरकारला विनंती करतो की, त्‍यांनी आम्‍हाला साहाय्‍य करावे.

संपादकीय भूमिका

  • भारतियांवर अमेरिका, युरोप, ऑस्‍ट्रेलिया आदी देशांत होणार्‍या आक्रमणांच्‍या प्रकरणांकडे भारत सरकारने गांभीर्याने पाहून त्‍यांच्‍या रक्षणासाठी कठोर पावले उचलली पाहिजेत !