न्यूझीलंडमधील भारतीय विद्यार्थ्यांच्या ‘व्हिसा’चे सहानुभूतीपूर्ण निराकरण करावे ! – परराष्ट्रमंत्री जयशंकर

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर आणि न्यूझीलंडच्या परराष्ट्रमंत्री नानेया महुता

ऑकलंड (न्यूझीलंड) – कोरोना काळानंतर न्यूझीलंडमध्ये परतू न शकणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांच्या ‘व्हिसा’च्या सूत्राचे सहानुभूतीपूर्ण निराकरण करावे, असे आवाहन भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी येथे केले. न्यूझीलंडच्या दौर्‍यावर असलेल्या डॉ. जयशंकर यांनी न्यूझीलंडच्या परराष्ट्रमंत्री नानेया महुता यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध सूत्रांवर विस्तृत चर्चा केली.

‘कोरोना काळात ज्या भारतीय विद्यार्थ्यांना भारतात परतावे लागले, त्यांच्याविषयी सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात यावा आणि त्यांच्या ‘व्हिसा’चे सूत्र निष्पक्षतेने हाताळण्यात यावे’, असे आवाहन महुता यांना केल्याची माहिती डॉ. जयशंकर यांनी पत्रकारांना दिली. डॉ. जयशंकर यांनी न्यूझीलंडसमवेत मुक्त व्यापार कराराविषयीही चर्चा केली आणि व्यावसायिक सहकार्य ही काळाची आवश्यकता असल्याचे सांगितले. ‘भारत हा आपल्या सर्वांत महत्त्वाच्या भागीदारांपैकी एक आहे, असे महुता यांनी या वेळी सांगितले.