समांतर अर्थव्यवस्था निर्माण करणारी हलाल परिषद सरकारने होऊ देऊ नये ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

मुंबईत होणार्‍या हलाल परिषदेला हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून विरोध !

मुंबई, ३ ऑक्टोबर (वार्ता.) – इस्लामच्या नावाखाली देशात समांतर अर्थव्यवस्था चालवली जात आहे. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात समांतर अर्थव्यवस्था निर्माण करणारी हलाल परिषद सरकारने होऊ देऊ नये, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले. या परिषदेला विरोध दर्शवण्यासाठी ९ ऑक्टोबरला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’मध्ये सायंकाळी ५.३० वाजता ‘हलाल सक्तीविरोधी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. समस्त हिंदु बांधवांनी या परिषदेला उपस्थित रहावे, असे आवाहन श्री. रमेश शिंदे सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे केले आहे.

श्री. रमेश शिंदे पुढे म्हणाले, ‘‘मुंबईत १२ आणि १३ नोव्हेंबर या दिवशी होणार्‍या ‘हलाल परिषदे’ला हिंदु जनजागृती समितीचा विरोध आहे. यापूर्वी केवळ मांस हलाल करण्याची पद्धत होती. सध्या मात्र इमारती, संकेतस्थळे, मिठाई यांनाही हलाल प्रमाणपत्र देण्यात येत आहे. हलाल प्रमाणपत्राच्या नावाखाली हिंदु व्यापार्‍यांकडून सहस्रो कोटी रुपये गोळा केले जात आहेत. भारत सरकारकडून प्रमाणपत्र दिले जात असतांना खासगी संस्थांकडून हलाल प्रमाणपत्रासारख्या समांतर प्रमाणपत्राची आवश्यकता काय ? समांतर अर्थव्यवस्था निर्माण करून सरकारला आव्हान देणारी हलाल परिषद या देशात होता कामा नये.

मुंबईत होणार्‍या हलाल परिषदेला समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. या परिषदेच्या विरोधात समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये हलाल सक्तीविरोधी परिषद आयोजित करून हलाल प्रमाणपत्राच्या विरोधातील पुढील दिशा निश्‍चित केली जाणार आहे.’’