ऑस्ट्रेलियन लोक हे जगात सर्वाधिक श्रीमंत लोक !

 वर्ष २०२६ पर्यंत दशलक्षाधीश (मिलियनेअर) असलेल्या भारतियांची संख्या दुप्पट होणार !

(दशलक्षाधीश म्हणजे साधारण ८ कोटी रुपये मालमत्ता असणारी व्यक्ती !)

प्रतीकात्मक छायाचित्र

झ्युरिक (स्वित्झर्लंड) – जगात ऑस्ट्रेलियन लोक हे सर्वाधिक श्रीमंत झाले असून त्यांच्याकडे सरासरी २ लाख ७४ सहस्र डॉलर्स (२ कोटी १८ लाख रुपयांहून अधिक) एवढी मालमत्ता आहे. स्वित्झर्लंडची जागतिक बँक ‘क्रेडी सुइस’ने जारी केलेल्या ‘जागतिक संपत्ती २०२२ अहवाला’मध्ये ही आकडेवारी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया पाठोपाठ बेल्जियम आणि न्यूझीलंड यांचा क्रमांक लागतो. यामध्ये रोख रक्कम आणि चल, तसेच अचल मालमत्ता यांचा समावेश आहे.

‘क्रेडी सुइस’च्या अहवालानुसार अमेरिकी डॉलरच्या भाषेतील भारतीय लक्षाधिशांची संख्या वर्ष २०२६ पर्यंत दुप्पट होणार आहे. वर्ष २०२१ मध्ये भारतात असे ७ लाख ९६ सहस्र दशलक्षाधीश होते. वर्ष २०२६ मध्ये यात १०५ टक्क्यांची वृद्धी होऊन ही संख्या १६ लाख ३२ सहस्र इतकी होणार आहे. ही वृद्धी जगभरातील तिसरी सर्वाधिक वृद्धी असेल. आफ्रिका खंडात दशलक्षाधिशांची संख्या १७३ टक्क्यांनी वाढेल, तर ब्राझिलमध्ये हीच संख्या ११५ टक्क्यांनी वाढणार आहे.

सध्या जगभरात दशलक्षाधिशांच्या संख्येत अमेरिकेचा पहिला क्रमांक लागत असून जगातील ३९ टक्के दशलक्षाधीश हे केवळ एका अमेरिकेत वास्तव्य करतात. दुसरीकडे या जागतिक आकडेवारीत भारताचे प्रमाण केवळ १ टक्का आहे.