‘इस्रो’च्या उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण; मात्र संपर्क तुटला !

एस्.एस्.एल्.व्ही.-डी१ चे प्रक्षेपण

श्रीहरिकोटा (आंध्रप्रदेश) – येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्थे’ने अर्थात् ‘इस्रो’ने ‘स्मॉल सॅटेलाईट लाँच व्हेईकल डेव्हलपमेंटल फ्लाइट-१’ (‘एस्.एस्.एल्.व्ही.-डी१’चे) प्रक्षेपण केले. यासमवेत पृथ्वी उपग्रह आणि विद्यार्थ्यांनी सिद्ध केलेला ‘आझादीसॅट’ हा उपग्रहसुद्धा प्रक्षेपित करण्यात आला; मात्र यशस्वी प्रक्षेपण झाल्यानंतर त्यांचा संपर्क तुटला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांचा आता काहीच उपयोग होणार नसल्याचे ‘इस्रो’ने सांगितले. या प्रक्षेपणासाठी ५६ कोटी रुपये व्यय (खर्च) करण्यात आले आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होत आहे. याचे औचित्य साधून देशभरातील ७५ शाळांतील ७५० विद्यार्थ्यांनी ‘आझादी सॅट’ हा उपगृह सिद्ध केला आहे. या उपग्रहाचे वजन केवळ ८ किलोग्राम इतके आहे. यात ‘सोलार पॅनल’ आणि ‘सेल्फी कॅमेरा’ लावण्यात आला आहे.