वीजदेयक भरले नसल्याचा संदेश पाठवून अधिकोषातील पैसे लांबवणारी टोळी महाराष्ट्रात कार्यरत !

पोलिसांकडून नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे आवाहन

मुंबई – वीजदेयकाचे पैसे भरल्यानंतरही ‘तुमचे मागील वीजदेयक थकित आहे. वीजदेयकाची रक्कम न भरल्यास वीजजोडणी तोडण्यात येईल’, अशी भीती दाखवून  भ्रमणभाषवरून मिळालेल्या माहितीच्या आधारे अधिकोषातील पैसे लांबवणारी टोळी राज्यात कार्यरत आहे. विशेष म्हणजे वीजदेयकाचे पैसे भरल्यावर थोड्या वेळाने हा संदेश येतो. यातून सायबर गुन्हेगार वीज महामंडळाच्या संकेतस्थळाशी जोडले असल्याचे दिसून येत आहे.

राज्यात ठिकठिकाणी हे फसवणुकीचे प्रकार समोर आल्यावर पोलिसांनी प्रसिद्धीपत्रक काढून नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

१. सायबर गुन्हेगार भ्रमणभाषवर लघूसंदेश (एस्.एम्.एस्.) किंवा ‘व्हॉट्सअ‍ॅप’ द्वारे ग्राहकांना ‘तुमची वीजदेयकाची थकबाकी आहे. तुम्ही भरलेले वीजदेयक ‘अपडेट’ केलेले नाही. त्यामुळे तुमची वीजजोडणी तोडली जाईल’, असा संदेश पाठवतात.

२. वीजपुरवठा खंडित करण्याच्या भीतीने ग्राहक दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधतात. फसवणूक करणारे ग्राहकास बोलण्यात गुंतवून थकीत वीजदेयक पडताळण्याच्या बहाण्याने एक लिंक पाठवून महावितरणसारखे हुबेहूब खोटे ‘अ‍ॅप’ भ्रमणभाषवर ‘इन्स्टॉल’ करायला सांगतात. ‘अ‍ॅप इन्स्टॉल’ झाल्यावर संबंधित व्यक्तीच्या नकळत त्यांच्या भ्रमणभाषची स्क्रीन ‘शेअर’ होते.

३. त्यानंतर फसवणूक करणारे ग्राहकांना अधिकोषातील खात्याची माहिती भ्रमणभाषवरून भरण्यास सांगतात. भ्रमणभाषवर भरलेली माहिती फसवणूक करणार्‍यांना दिसते. या माहितीच्या आधारे हे चोरटे संबंधित व्यक्तीच्या अधिकोषाच्या खात्यातील पैसे काढतात.

अशी टाळा फसवणूक !

अधिकोषाच्या खात्याची माहिती आणि ‘ए.टी.एम्.’चा ‘पासवर्ड’ भ्रमणभाषवरून देऊ नये. अज्ञात व्यक्तीच्या सांगण्यावरून कुठल्याही लिंकवर ‘क्लिक’ करू नये. नवीन ‘अ‍ॅप इन्स्टॉल’ करून वीज शुल्क न भरता बँकेने पुरवलेल्या ‘अ‍ॅप’द्वारे वीज शुल्क भरल्यास फसवणूक होणार नाही.

संपादकीय भूमिका

पोलिसांनी केवळ प्रसिद्धीपत्रक काढून न थांबता अशांना अटक होईपर्यंत प्रयत्न करावेत !