आसाममध्ये जिहादी यंत्रणा कार्यान्वित असलेले ७०० मदरसे बंद !

खासगी मदरशांवर नियंत्रणासाठी लवकरच कायदा !

गौहत्ती (आसाम) – आसाममधील मदरशांत जिहादी यंत्रणा कार्यान्वित असल्याची माहिती मिळाल्यानंतर राज्यशासनाने असे तब्बल ७०० मदरसे बंद केले. आतंकवादी यंत्रणा नेस्तनाबूत करण्यासाठी आणि मुलांना त्यापासून वाचवण्यासाठी आसाममधील भाजप शासनाने खासगी मदरशांवर नियंत्रण ठेवणारा कायदा आणण्याची सिद्धताही चालू केली आहे. मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या म्हणण्यानुसार आतंकवादी संघटना अल्-कायदा आसाममध्ये हिंसाचार घडवण्याचा कट रचत आहे.

१. मदरशांवरील नियंत्रणासंबंधी कायदा आणण्यासाठी राज्यशासन कायदेतज्ञांचा सल्ला घेत आहे. ‘अल्पसंख्यांक समुदायातील तरुण पिढीकडे आतंकवादी संघटनांचे लक्ष आहे. तरुणांची दिशाभूल करण्यासाठी जिहादी साहित्य बंगाली भाषेत भाषांतरित करून ते  भ्रमणभाषच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचवले जात आहे’, अशी माहिती गुप्तचर यंत्रणा आणि अटक करण्यात आलेल्या धर्मांध मुसलमानांच्या चौकशीतून समोर आली आहे.

२. अटक करण्यात आलेल्या जिहाद्यांपैकी अनेकांनी ‘इमाम’ (मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणारा प्रमुख) म्हणून काम केले होते. आतंकवादी कारवाया करण्यासाठी ते अनेक ठिकाणी धार्मिक मेळेही आयोजित करतात. अशा मदरशांना बेकायदा निधी मिळत असल्याचीही माहिती आहे.

आसाममध्ये कार्यरत २४ हून अधिक जिहादी गट अटकेत !

एवढे आतंकवादी गट निर्माण होईपर्यंत पोलीस झोपले होते का ? यास उत्तरदायी असलेल्यांवरही सरकारने कारवाई करायला हवी !

अन्वेषण यंत्रणांनी २४ हून अधिक जिहादी गटांना अटक केली आहे. आसाममधील मदरशांतील जिहादी हे ‘अन्सार उल्ला बांगला टीम’ आणि ‘अल्-कायदा’ यांच्याशी जोडलेले आहेत. या संघटनांच्या गटांचे धागेदोरे त्रिपुरा, भोपाळ आणि बेंगळुरू येथपर्यंत आहेत.

 

संपादकीय भूमिका

  • भारतभरातील अनेक मदरसे जिहाद्यांना लपवण्यासाठीचे अड्डे बनले आहेत, हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. त्यामुळे असा कायदा आता केवळ आसामपुरता मर्यादित न ठेवता केंद्रशासनाने तो देशपातळीवर करणे अपेक्षित आहे !
  • मूळचे पाकिस्तानी आणि आता इंग्लंडमध्ये वास्तव्य करणारे प्रसिद्ध इस्लामी अभ्यासक आरिफ अजाकिया यांच्या म्हणण्यानुसार, ‘भारतातील ८५ टक्के बहुसंख्यांकांच्या विरोधात मदरशांमधून गरळओक करून ‘काफिरांना नष्ट करा !’, अशी चिथावणी दिली जात आहे.’ याकडे केंद्रीय गृहमंत्रालयाने गांभीर्याने पाहून मदरशांवर कठोर नियंत्रण आणण्याची आवश्यकता आहे, असे राष्ट्रप्रेमींना वाटते !