दगाफटका करणाऱ्या आमदारांची नावे आमच्याकडे आहेत ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

शिवसेनेचे नेते संजय राऊत

मुंबई – आमच्या मित्रपक्षांनी आमच्याशी दगाफटका केला नाही. घोडेबाजारात उभे होते, त्यांची ६-७ मते आम्हाला मिळाली नाहीत. आम्ही कोणता व्यापार केला नाही. दगाफटका करणाऱ्या आमदारांची नावे आमच्याकडे आहेत, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना केले. ‘बहुजन विकास आघाडीचे ३, करमाळा येथील आमदार संजय शिंदे, लोहा येथील आमदार शामसुंदर शिंदे, स्वाभिमानी पक्षाचे आमदार देवेंद्र भुयार यांची आम्हाला मते मिळाली नाहीत’, असे राऊत म्हणाले.

या वेळी संजय राऊत म्हणाले, ‘‘सुहास कांदे यांचे मत ज्या कारणासाठी रहित करण्यात आले, त्याच कारणासाठी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर आम्ही आक्षेप घेतला; परंतु केवळ कांदे यांचे मत अवैध ठरवण्यात आले. अन्यही आमदारांची मते रहित करण्याचा त्यांचा प्रयत्न होता; परंतु आम्ही तो हाणून पाडला. संजय पवार यांना पराभूत करण्यासाठी भाजपने पैशांचा पाऊस पाडला; मात्र हा काही भाजपचा मोठा विजय नाही. विधान परिषदेच्या येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे २, शिवसेना २ आणि काँग्रेसचा १ उमेदवार निवडून येईल.’’