श्री क्षेत्र जेजुरीगड आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील विकासकामांना संमती !

पुणे – श्री क्षेत्र जेजुरीगड तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील १०९.५७ कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्याच्या कामास संमती देण्यात आली, तसेच ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन करतांना त्या वास्तूची मूळ शैली जपणे आवश्यक असून पुरातत्वीय जाण असलेल्या संस्थेकडून ही कामे करण्यात यावीत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत खर्चास संमती देण्यात आली.

जेजुरी गड विकास आराखड्याच्या अंतर्गत वास्तूंचे जतन आणि संवर्धन, पायाभूत सुविधा अन् पर्यटक सोयी सुविधा, जलव्यवस्थापन करण्यात येणार आहेत. दगडांची स्वच्छता, अनियोजित आणि हानिकारक जोडण्या काढणे, खराब चुन्याच्या गिलाव्याची डागडुजी, पाणी गळती थांबवण्यासाठी डागडुजी, विद्युत् सोयी, पाणीपुरवठा, निचरा व्यवस्था, मल:निस्सारण प्रणाली, मंदिर परिसरातील धूळ गोळा करण्यासाठी यंत्र, घनकचरा व्यवस्थापन, गर्दीचे व्यवस्थापन, आपत्कालीन व्यवस्थापन आदी कामे करण्यात येणार आहेत.