ज्ञानवापी मशिदीचे पहिल्या दिवशी ४० टक्के सर्वेक्षण पूर्ण

आज उर्वरित सर्वेक्षण होणार

वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण १४ मे या दिवशी सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत पूर्ण करण्यात आले. हे सर्वेक्षण ४० टक्केच पूर्ण झाले आहे. उर्वरित सर्वेक्षण १५ मे या दिवशी पुन्हा करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल १७ मे या दिवशी न्यायालयाला सादर करायचा आहे.

सकाळी सर्वेक्षण आणि चित्रीकरण यांस प्रारंभ करण्यात आला. या वेळी न्यायालय आयुक्त, २ साहाय्यक न्यायालय आयुक्त, हिंदु पक्षांचे अधिवक्ता आणि पक्षकार, तसेच अन्य असे एकूण ५२ जण उपस्थित होते. या सर्वांचे भ्रमणभाष संच बाहेर जमा करण्यात आले होते. प्रशासनाने ज्ञानवापी परिसराच्या ५०० मीटर परिसरात नागरिकांना प्रवेश बंद केला होता. सुरक्षेच्या दृष्टीने एक किलोमीटर परिसरात १ सहस्र ५०० हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

ज्ञानवापीच्या तळघरातील ४ खोल्या उघडल्या !

या सर्वेक्षणामध्ये ज्ञानवापी मशिदीच्या तळघरातील ४ खोल्या उघडण्यात आल्या. यांपैकी ३ मुसलमान पक्षाकडे, तर १ हिंदु पक्षाकडे आहेत. त्यांचे संपूर्ण चित्रीकरण करण्यात आले. तळघरासह मशिदीच्या पश्‍चिमेकडील भिंतीचे चित्रीकरण करण्यात आले. वर्षानुवर्षे बंद असलेल्या तळघरात सर्वेक्षण करावे लागेल; म्हणून बॅटरी नेण्यात आली होती. त्याच्या प्रकाशात चित्रीकरण करण्यात आले, तसेच टाळे तोडणारे आणि तेथील स्वच्छता करण्यासाठी संबंधितांनाही या वेळी नेण्यात आले होते. विशेष म्हणजे तळघरात साप असू शकतील म्हणून सर्पमित्रांनाही नेण्यात आले होते.

अपेक्षेपेक्षा अधिक सापडले ! – हिंदु पक्षकार

न्यायालयाच्या आदेशानुसार या सर्वेक्षणानंतर या पथकातील कोणत्याही व्यक्तीने बाहेर असणार्‍या प्रसारमाध्यमांशी संवाद साधला नाही. ‘जर कुणी माहिती उघड केली, तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते’, असे न्यायालयाने बजावले आहे. तरीही हिंदू पक्षापैकी एक असणार्‍या विश्‍व वैदिक सनातन संघाचे प्रमुख जितेंद्र सिंह बिसेन यांनी म्हटले, ‘न्यायालयाच्या आदेशाने पूर्ण प्रक्रिया गोपनीय ठेवायची आहे. त्यामुळे या संदर्भात आम्ही आता काहीही सांगू शकत नाही; मात्र इतकेच म्हणेन की, कल्पनेपेक्षा अधिक सापडले आहे. या वेळी तळघरांचे काही टाळे चावीद्वारे उघडण्यात आले, तर काही तोडावे लागले.  काही सर्वेक्षणानंतर चारही तळघरांना पुन्हा टाळे लावण्यात आले.

सर्वेक्षणातून काहीही सापडले नाही ! – मुसलमान पक्षकार

या वेळी काही प्रसारमाध्यमांनी मुसलमान पक्षकारांच्या अधिवक्त्यांना विचारणा केली असता, ते म्हणाले, ‘सर्वेक्षणातून काहीही सापडले नाही.’