ग्रंथलिखाणाचे अद्वितीय कार्य करणारे एकमेव परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

सर्वसाधारण लेखकांचे अध्यात्मावरील ग्रंथ सर्वसाधारण व्यक्तींसाठी असतात. त्यांमध्ये मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर अध्यात्म समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो. काही संतही ग्रंथ लिहितात; परंतु ते ग्रंथ लिहितांना बहुतांशी त्यांचा संप्रदाय आणि भक्त यांचा विचार करून ते लिहिलेले असतात. त्यामुळे त्यांचे ग्रंथ त्या त्या संप्रदायापुरते सीमित रहातात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकलित केलेले अध्यात्मावरील ग्रंथ हे मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर अल्प, तर आध्यात्मिक स्तरावर अधिक असून ते अध्यात्म आणि विविध साधनामार्ग यांविषयी शास्त्रीय परिभाषेत मार्गदर्शन करणारे आहेत. ते ग्रंथ अध्यात्मशास्त्राच्या अभ्यासक्रमाप्रमाणे आहेत. हे ग्रंथ अधिकतर आध्यात्मिक स्तरावर लिहिलेले असल्यामुळे त्यांच्यात चैतन्यही अधिक आहे.

चैतन्याने युक्त असणाऱ्या धर्मकार्याला ईश्वराचा आशीर्वाद असतो आणि ते कार्य जणू ईश्वरी कार्यच बनते ! परात्पर गुरु डॉक्टरांचे ग्रंथकार्यही असेच आहे. सनातनचे ग्रंथ वैशिष्ट्यपूर्ण आहेत; म्हणूनच विविध साधनामार्गांनुसार साधना करणारे संत, साधक, तसेच हिंदुत्वनिष्ठ आदींनी या ग्रंथांना गौरवले आहे. ‘सनातनचे ग्रंथ हे जणू मानवासाठी दैवी वरदानच आहेत’, हे वाचकांना ग्रंथांच्या संदर्भात येणाऱ्या अनेक अनुभूतींवरून लक्षात येते. सनातनच्या ग्रंथकार्याचे असे विविध पैलू उलगडणारा हा लेख परात्पर गुरु डॉक्टरांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त प्रसिद्ध करत आहोत.

लेखांक ४  (भाग १)

संकलक : (पू.) संदीप आळशी (सनातनच्या ग्रंथांचे एक संकलक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१. ‘सनातनचे ग्रंथकार्य हे ईश्वरी कार्यच आहे !’, याची येत असलेली प्रचीती

१ अ. ईश्वराने ग्रंथकार्यासाठी साहाय्यभूत ठरतील असे विविध विषयांत प्राविण्य असलेले साधक सनातनला आधीच दिलेले आहेत ! : परात्पर गुरु डॉक्टरांचे ग्रंथकार्य हे विविधांगी आहे. त्यासाठी ईश्वराने विविध विषयांवरील ग्रंथलिखाणासाठी साहाय्यभूत ठरतील असे विविध विषयांत प्रवीण असलेले साधक सनातनला आधीच दिलेले आहेत ! याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

१. ‘संस्कृत’ या भाषेत पदवीधर असलेले वैद्य मेघराज पराडकर (सनातन आश्रम, रामनाथी) हे ग्रंथांमधील संस्कृत श्लोक आणि त्यांचे अर्थ पडताळणे, तसेच ‘आयुर्वेद’, ‘औषधी वनस्पतींची लागवड’ इत्यादी विषयांवरील ग्रंथांचे संकलन करणे, या सेवा करतात.

२. सुश्री (कु.) सुप्रिया शरद नवरंगे (सनातन आश्रम, रामनाथी) यांनी ‘मराठी’ विषयातील पदव्युत्तर शिक्षण (एम्.ए.) घेतले असून त्या व्याकरणाशी संबंधित धोरणे ठरवणे आणि शब्दकोश सिद्ध करणे, या सेवा करतात. त्यांची ‘सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !’ ही साप्ताहिक लेखमालाही दैनिक ‘सनातन प्रभात’मधून २९ ऑगस्ट २०२१ पासून प्रसिद्ध होत आहे.

३. ‘कला’ विषयात पदविकाधारक असलेल्या सौ. जान्हवी रमेश शिंदे आणि कु. भाविनी कपाडिया, तसेच ‘कला’ विषयीचे शिक्षण घेतलेल्या कु. सिद्धि क्षत्रिय (सनातन आश्रम, रामनाथी) या देवतांची सात्त्विक चित्रे, सात्त्विक अक्षरे, ग्रंथांची मुखपृष्ठे, ग्रंथांत घेण्यासाठीची छायाचित्रे इत्यादी बनवण्याची किंवा त्यांवर संगणकीय संस्करण करण्याची सेवा करतात. या साधिका ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ या विषयीच्या ग्रंथांचे लिखाण करतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. जान्हवी शिंदे यांनी संकलित केलेला ‘सात्त्विक देवनागरी अक्षरे आणि अंक लिहिण्याची पद्धत’ हा ग्रंथही सनातनने प्रकाशित केला आहे.

४. ‘कला-शिक्षक (पदविका अभ्यासक्रम – ए.टी.डी.)’ असलेल्या कु. संध्या माळी आणि कु. कुशावर्ता माळी (सनातन आश्रम, रामनाथी) यांनी रांगोळी आणि मेंदी यांच्या कलाकृती सात्त्विक बनवण्याविषयी अभ्यासपूर्ण प्रयोग केले, तसेच या कलाकृतींचे ग्रंथ बनवण्याची सेवाही केली. मेंदी आणि रांगोळी या विषयांवरील ‘सात्त्विक कलांचे सादरीकरण (एकूण ३ ग्रंथ आणि १ लघुग्रंथ)’ ही ग्रंथमालिकाही सनातनने प्रकाशित केली आहे.

५. ‘संगीत विशारद’ असलेल्या सुश्री (कु.) तेजल पात्रीकर आणि ‘बी.ए. संगीत’ असलेल्या सौ. अनघा शशांक जोशी (सनातन आश्रम, रामनाथी) या ‘विकार आणि आध्यात्मिक त्रास यांवर संगीताद्वारे उपाय’ अन् ‘ईश्वरप्राप्तीसाठी संगीतकला’ यांविषयी अभ्यासपूर्ण संशोधन आणि ग्रंथलिखाण करतात. सुश्री (कु.) तेजल पात्रीकर आणि सौ. अनघा जोशी यांचे संगीत, वाद्य-संगीत इत्यादी विषयांवरील अनेक लेख ‘सनातन प्रभात’मधून प्रसिद्ध होतात. या विषयांवरील ग्रंथही प्रकाशित होणार आहेत.

६. ‘नृत्य अभ्यासिका’ सौ. सावित्री वीरेंद्र इचलकरंजीकर, ‘भरतनाट्यम् विशारद’ असलेल्या होमिओपॅथी डॉ. आरती तिवारी आणि भरतनाट्यम् शिकत असलेली दैवी बालिका  कु. अपाला औंधकर (सनातन आश्रम, रामनाथी) या ‘नृत्याच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती’ याविषयी अभ्यासपूर्ण संशोधन आणि ग्रंथलिखाण करतात. सौ. सावित्री इचलकरंजीकर, डॉ. आरती तिवारी, कु. अपाला औंधकर यांचे ‘नृत्याभ्यास’ विषयीचे विविध लेख ‘सनातन प्रभात’मधून प्रसिद्ध होतात. ‘ईश्वरप्राप्तीसाठी नृत्याभ्यास’ या विषयावरील ग्रंथही प्रकाशित होणार आहेत.

१ आ. ग्रंथ-निर्मितीसाठी ईश्वरच समाजातील आवश्यक त्या व्यक्तींनाही जोडून देत आहे ! : वर्ष २०१२ मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांनी भावी महायुद्धकाळात जीवितरक्षणासाठी उपयुक्त ठरतील अशा विविध उपचारपद्धतींची ग्रंथमालिका सिद्ध करायचे ठरवले. आम्हा साधकांसाठी हा विषय नवीनच होता. पुढे आमच्या असे लक्षात आले की, त्या त्या उपचारपद्धतींतील तज्ञ व्यक्तींना जणू ईश्वरानेच सनातनशी जोडून दिले ! याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

१. ऑक्टोबर २०१४ मध्ये मडगाव, गोवा येथील ‘बिंदूदाबन’ या विषयातील तज्ञ श्री. विनायक चंद्रकांत महाजन हे सनातनच्या रामनाथी आश्रमात स्वतःहून आले. ते म्हणाले, ‘‘हाता-पायांच्या तळव्यांवरील बिंदूदाबन (रिफ्लेक्सॉलॉजी)’ या विषयावर ग्रंथ काढावा’, अशी मला ईश्वराने प्रेरणा दिली. तुम्हीच (साधकच) हा ग्रंथ चांगल्या प्रकारे सिद्ध करू शकाल; म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे. ही उपचारपद्धत साधकांना शिकवण्यासाठी मी नियमितपणे आश्रमातही येईन.’’ याप्रमाणे श्री. महाजन यांनी आश्रमात येऊन ग्रंथलिखाण पूर्ण केले, तसेच सनातनच्या साधकांना उपचारपद्धत शिकवतांना तिच्या बारकाव्यांसह अमूल्य असे मार्गदर्शनही केले. आम्ही वरील विषयावर ग्रंथ काढणारच होतो; पण देवाने स्वतःहून त्यासाठी श्री. महाजन यांना पाठवले.

२. आगामी आपत्काळात पेठेतील (बाजारातील) औषधे, चिकित्सालये आदी उपलब्ध होणे कठीण असेल. या वेळी घरगुती आयुर्वेदीय औषधेच बहुमोलाची ठरतील. यासाठी आम्ही ‘औषधी वनस्पतींची लागवड करा !’ हा ग्रंथ काढण्याचे ठरवले होते. वर्ष २०१४ मध्ये याविषयी ज्येष्ठ वनस्पती-शास्त्रज्ञ डॉ. दिगंबर मोकाट यांना संपर्क केला असता त्यांनी यासंदर्भात बहुमोल मार्गदर्शन केले, तसेच त्यांच्या दिवसभराच्या व्यस्ततेतूनही वेळ काढून ग्रंथाचे सर्व लिखाण आनंदाने पडताळून दिले.

परात्पर गुरु डॉक्टरांच्या वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथकार्यासाठी देवाने अनेक वैशिष्ट्यपूर्ण साधकांना सनातनमध्ये आणले अन् समाजातील वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तींना सनातनशी जोडून दिले, ही देवाची सनातनवरील केवढी कृपा ! परात्पर गुरु डॉक्टरांना अखिल मानवजातीच्या कल्याणाची तीव्र तळमळ लागली आहे आणि त्यासाठी ते अविरत कार्यरतही आहेत. त्यांच्या या तळमळीमुळेच देव सनातनवर एवढी भरभरून कृपा करत आहे.

(क्रमश:)