हिंदु रक्षा महाआघाडीच्या ‘गोवा इन्क्विझिशन’च्या विरोधातील जागृती मोहिमेच्या निमित्ताने…
गोव्याच्या मुक्तीसाठी अनेक स्वातंत्र्यसेनानी प्राणपणाने लढले. त्यांपैकी डॉ. त्रिस्ताव ब्रागांझ कुन्हा म्हणजेच डॉ. टी.बी. कुन्हा यांना गोमंतकाच्या ‘आधुनिक स्वातंत्र्यसंग्रामाचे जनक’ म्हणून ओळखले जाते. पोर्तुगीज गेले; पण पोर्तुगीजधार्जिणे गोव्यात अजूनही आहेत. डॉ. टी.बी. कुन्हा यांनी ‘गोमंतकियांचे अराष्ट्रीयीकरण कसे झाले आहे ?’, याचा साद्यंत इतिहास त्यांच्या ‘डिनॅशनलायझेशन ऑफ गोवन्स’ या पुस्तकातून मांडला आहे. ११ मे २०२२ या दिवशी आपण ‘मूर्तिभंजक झेवियर आणि सक्तीने सर्रास धर्मांतरे करणारे पाद्री’, यांविषयी वाचले. आज त्यापुढील भाग येथे देत आहोत.
९. ख्रिस्त्यांनी योजलेले उपाय
अ. ‘१५१९ मध्ये रॉयल चार्टरद्वारा (राजाज्ञेद्वारे) काढून ख्रिश्चनांकरता वैद्यकीय साहाय्य आणि दानधर्म राखून ठेवण्यात आले. त्यामुळे गरीब हिंदूंना धर्मांतर करणे भाग पाडावे.
आ. १५३४ मध्ये ‘डायोसिस ऑफ गोवा’ निर्माण करून त्याच्या व्यवस्थेकरता नवीन कर लादण्यात आले. लगेच पोर्तुगालहून प्रमाणाबाहेर पाद्री गोव्यात येऊ लागले; परंतु ख्रिश्चन मात्र थोडेच होत होते. मग आग आणि तलवार यांच्या जोरावर प्रसार चालू झाला.
इ. १५४० मध्ये सेंट फ्रान्सिसचे दोन प्रसिद्ध बगलबच्चे, मिंगेल व्हाज आणि दियोग द् वॉर्दा यांनी तर गोव्यातली सगळी देवळे उद्ध्वस्त करण्याचा आदेश दिला.
ई. ३० जून १५४१ च्या कायद्याद्वारे मंदिरांची सगळी मालमत्ता कॅथॉलिक चर्चसाठी ठेवण्याचा हक्क प्राप्त केला. त्या उत्पादनातून जेजुईटांनी सेंट पॉलची सेमिनरी स्थापन केली.
उ. २३ मे १५५९ च्या कायद्यान्वये कुठल्याही हिंदु माणसाला सार्वजनिक कार्य करता येऊ नये, अशी बंदी घालण्यात आली.
ऊ. त्याच वर्षी आणखी एक कायदा करून हिंदु पोरक्या मुलांची सर्व मालमत्ता, त्यांनी धर्मांतर करण्यास नकार दिला, तर काढून घेऊन पोर्तुगिजांना आणि ख्रिश्चनांना दिली गेली.
ए. एका कायद्याद्वारे गोवा बेटातील हिंदूंची सर्व देवळे आणि देवांच्या मूर्ती उद्ध्वस्त करण्याचा आदेश दिला अन् ख्रिश्चन नसलेल्या कुठल्याही सार्वजनिक वा खासगी सणांवर बंदी घालण्यात आली. अशा गुन्हेगारांची माहिती देणाऱ्या माणसाला त्या गुन्हेगाराची अर्धी मालमत्ता हिरावून घेण्याचा हक्क मिळून उरलेली अर्धी चर्चला देण्यात येत असे.
ऐ. त्या वर्षीच्या अनेक कायद्यांद्वारे, धर्मांतर करून ख्रिश्चन झालेल्या हिंदूंना खास हक्क देण्यात आले.
ओ. १५६० मध्ये डॉन कॉन्स्टान्टीनो द् ब्रागान्झा याने गोव्यातील सर्व ब्राह्मणांना आणि सोनारांना हाकलून दिले.
औ. ४ डिसेंबर १५६७ च्या कायद्यान्वये,
१. हिंदूंच्या मुंज, लग्न आणि अंत्यसंस्कार हे संस्कार आणि विधींवर, तसेच त्यांच्या धर्मग्रंथांवर बंदी घालण्यात आली.
२. १५ वर्षांवरील वयाच्या प्रत्येक माणसाला ख्रिश्चन धर्माची प्रवचने ऐकायला उपस्थित रहाणे सक्तीचे करण्यात आले, उपस्थित नसल्यास जबर शिक्षेची भीती होतीच.
अं. त्याच वर्षी रायतूर किल्ल्याच्या अधिकाऱ्याने आर्चबिशप आणि सोसायटी ऑफ जीझस या संस्थेचे पदाधिकारी यांच्या सल्ल्याने आणि पाठिंब्याने, केवळ एका सासष्टीमधील २८० हिंदु देवळे उद्ध्वस्त करून जाळून टाकली. त्याविषयी डॉन सबॅस्टियन या राजाने त्या देवळांच्या मालकीची अर्धी जमीन त्याला इनाम दिली आणि उरलेली अर्धी जेजुईटांना देण्यात आली. या सगळ्या मालमत्ता नंतर ‘सांता काज द् मिजरीकॉर्द’ या फक्त युरोपियन आणि त्यांचे वंशज यांच्या संघटनेच्या नावावर करण्यात आल्या, ती संस्था आजही अस्तित्वात आहे.
क. १५७५ च्या एका कायद्यान्वये हिंदूंना सरकारी जमिनी भाड्याने घेण्यास बंदी घालून ती ख्रिश्चनांना देण्यास भाग पाडण्यात आले.
ख. त्याच वर्षी हद्दपार केलेले हिंदु अनुमतीविना परत आल्यास त्यांच्या जमिनी जप्त केल्या गेल्या.
ग. १५८३ मध्ये जेजुईटांनी लष्करी साहाय्याने असोळणे आणि कुंकळ्ळी येथील मंदिरे नष्ट करून तेथे चर्चेस बांधली.’ (पृष्ठ १६ ते १९)
१०. संपत्ती बळकावणारे पाद्री
‘ख्रिस्तीकरणाच्या नावाखाली पोर्तुगीज धार्मिक अधिकारी स्थानिक लोकांची संपत्ती लुबाडून इतके धनवान बनले की, त्यामुळे राज्याची सुरक्षितताच धोक्यात आली ! १६०३ मध्ये गोव्याच्या सिनेटने राजाला कळवले, ‘‘केवळ जेजुईटांची मिळकत म्हणजे साऱ्या राज्याच्या प्राप्तीच्या अर्ध्या वाट्याएवढी आहे. पाद्री स्वैराचारी बनून ऐषआरामात रहात आहेत. त्यांना आता धर्माची फिकीर उरलेली नाही. त्याचबरोबर येथे काम करणारे हिंदू छळाच्या भीतीने पळून स्थलांतर करू लागल्याने देशावर गरिबी कोसळली आहे; पण धर्माचा पगडा इतका जबरदस्त होता की, १७ आणि १८ व्या शतकातसुद्धा पाद्री नवीन नियमांनुसार संपत्ती बळकावतच राहिले. फादर म्यॅनुअेल डी सा (जे नंतर इथिओपियाचे पॅट्रीआर्क होते) यांच्यासारख्या पाद्र्यानेसुद्धा (त्यांच्याच शब्दांत) ‘‘हिंदूंना त्यांच्या पवित्र देवघरात शिरून त्यांच्या बायका-मुलींना ओढून बाहेर आणून (त्यांचा सगळ्यात मोठा अपमान) त्यांना बळजोरीने धर्मोपदेश ऐकायला निग्रोकरवी ओढीत नेणे’’ अशा कृतींना तीव्र विरोध दर्शविला; पण असहिष्णुता चालूच राहिली.’’
(पृष्ठ ३१ ते ३४)
११. नाईलाजाने केले गेलेले काळे आर्चबिशप
‘आर्च-डायोसिस ऑफ गोवा स्थापन होऊन ४०० वर्षे झाली; पण तिथे अजून एकही हिंदी बिशप झाला नाही, उलट ब्रिटीश हिंदुस्थानात तोच आकडा १७ पर्यंत गेला. हिंदुस्थानात किंवा आफ्रिकन देशात आर्चबिशपच्या जागेत काळ्यांना नियुक्त करणे, ही अगदी अलीकडची गोष्ट आहे, त्या त्या देशातील आंदोलनामुळे ती निर्माण झाली. या देशातील स्वातंत्र्याच्या चळवळीमुळेच हा पालट घडला, हे निर्विवाद आहे. साहजिकच दडपशाहीच्या मार्गाने गोवेकरांच्या राष्ट्रीय स्वाभिमानाचे खच्चीकरण केल्यामुळेच, ख्रिश्चन धर्माविषयी दीर्घकालीन निष्ठा असूनसुद्धा त्यांना या प्रगतीचा लाभ मिळू शकला नाही.’
(पृष्ठ क्र. ३७)
(लेखातील प्रत्येक सूत्रानंतर दिलेले पृष्ठ क्रमांक हे पुढील पुस्तकातील आहेत – ‘गोमंतकियांच्या राष्ट्रीयत्वाचा ऱ्हास’ मूळ इंग्रजी लेखक : डॉ. टी.बी. कुन्हा, अनुवादक : प्रफुल्ल गायतोंडे)