…तर काश्मीर भारतात विलीन करण्याविषयी आमचा निर्णय वेगळा असता ! – जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीरचा भारताशी विलय करतांना आम्हाला सांगण्यात आले होते की, येथे सर्व धर्मियांना एकाच दृष्टीने पाहिले जाईल. त्यामुळेच आम्ही जम्मू-काश्मीर भारतात विलीन करण्यासाठी सहमती दिली होती. जर त्या वेळी सांगितले गेले असते की, एका धर्माच्या तुलनेत दुसर्‍या धर्माला अधिक महत्त्व दिले जाईल, तर आमचा निर्णय वेगळा असता. त्या वेळी काश्मीरमध्ये मुसलमान ८० टक्के होते, असे विधान जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केले आहे.

ओमर अब्दुल्ला पुढे म्हणाले की,

१. हलाल मांस विकू नये, असे म्हटले जात आहे; पण का ? (हलाल मांस विकू नये, असे कुणीही म्हणत नाही; मात्र हलाल प्रमाणपत्र घेण्यासाठी हिंदूंवर दबाव निर्माण केला जात आहे, त्याला विरोध केला जात आहे. याविषयी अब्दुल्ला का बोलत नाहीत ? हाललवरून कांगावा का करत आहेत ? – संपादक)

२. मशिदींवर भोंगे लावण्याची अनुमती का दिली जात नाही ? (मशिदींवर भोंगे अनुमनीविनाच लावलेले आहेत. त्याला विरोध करणे हा कायद्यानेच दिलेला अधिकार आहे ! – संपादक) वास्तविक अन्यत्र भोंग्यांचा वापर केला जात आहे. आम्ही असे कुठेही म्हणत नाही की, मंदिर, गुरुद्वारा येथे ध्वनीवर्धक लावू नयेत. आम्ही जे काही करत आहोत, ते तुम्हाला पसंत नाही. (कायद्याच्या विरोधात जाऊन करण्यात येणारी कृती कधीही कुणाला आवडणार नाही, हे अब्दुल्ला यांनी नेहमीच लक्षात ठेवावे ! – संपादक)

३. जम्मू-काश्मीरमध्ये ‘सेहरी’च्या (पहाटे रोजा (उपवास) प्रारंभ करण्यापूर्वीचा आहार) वेळी आणि इफ्तारच्या वेळी वीज पुरवठा बंद करून जाणीवपूर्वक लोकांना त्रास दिला जात आहे. जर तुमचा उद्देश आमच्या भावनांशी खेळण्याचा नसेल, तर या दोन्ही वेळा सोडून अन्य वेळी वीज कपात करू शकता.

संपादकीय भूमिका

जम्मू-काश्मीर भारतात विलीन करण्याचा निर्णय काश्मीरचे तत्कालीन महाराजा हरि सिंह यांनी घेतला होता, हा इतिहास आहे. पाकने काश्मीरवर आक्रमण केले होते आणि काश्मीरचे रक्षण करण्यासाठीच हा विलय करण्यात आला होता आणि तो हरि सिंह यांचा अधिकार होता. आज काश्मीरच्या ज्या भागावर पाकचे नियंत्रण आहे, तेथील काश्मिरी मुसलमानांचे अस्तित्व नष्ट केले जात आहे, याविषयी ओमर अब्दुल्ला का बोलत नाहीत ?