|
संभाजीनगर – जयपूर येथील निम्बाहाडा येथे ३१ मार्च या दिवशी पुष्कळ प्रमाणावर स्फोटके सापडली होती. ही स्फोटके मध्यप्रदेशमधील रतलाम येथून जयपूर येथे पाठवण्यात आली होती, असे अन्वेषणात पुढे आले आहे. या प्रकरणी रतलाम येथून तिघांना अटक करण्यात आली आहे. हे तिघे ‘अल सुफा’ संघटनेसाठी काम करत आहेत. या संघटनेचे काही धागेदोरे संभाजीनगर येथेही असल्याचा संशय मध्यप्रदेश आतंकवादविरोधी पथकाला (‘ए.टी.एस्.’ला) आहे. त्यामुळे मागील आठवड्यात मध्यप्रदेश ‘ए.टी.एस्.’चे १ पथक येथील सातारा परिसरात चौकशीसाठी आले होते आणि या पथकाने खुलताबाद येथील काही लोकांची चौकशी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (ही माहिती मध्यप्रदेशच्या पोलिसांना कळते, महाराष्ट्राच्या का नाही ? – संपादक)
जुबेर फकीर महंमद, अल्तमश बशीरखाँ पठाण आणि सैफुल्ला रमजान अली या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीतून संभाजीनगर येथील ‘अल सुफा’ संघटनेचे धागेदोरे असल्याचे समोर आले. हे तिघे शहरातील काही तरुणांना नियमित दूरभाष करत होते. ए.टी.एस्. पथक १४ एप्रिल या दिवशी येथे पोचले होते; मात्र यातील काही तरुण पळाले. काही तरुणांची अधिकाऱ्यांनी चौकशीही केली; मात्र कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
३० मार्च या दिवशी जयपूर येथील निम्बाहाडा येथे पोलिसांनी नाकेबंदीच्या वेळी एका चारचाकी वाहनातून १२ किलो आर्.डी.एक्स., ३ टायमर, ३ सेल, ३ कनेक्टर आणि छोटे बल्ब जप्त केले होते. या टोळीचा जयपूर भागात साखळी बाँबस्फोट करण्याचा कट होता, असा संशय आहे. त्या वेळी वाहनातील तरुणांनी पोलीस कर्मचाऱ्यांना वाहन सोडवण्यासाठी २० लाख रुपये दिले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. (अशा देशद्रोही पोलिसांना कठोरात कठोर शिक्षा दिली पाहिजे. – संपादक)
४ वर्षांपूर्वीही रोशन गेट परिसरातून काही तरुणांना महाराष्ट्र ‘ए.टी.एस्.’ने कह्यात घेतले होते. त्या वेळी ठाणे जिल्ह्यातील ‘मुंब्रा कनेक्शन’ पुढे आले होते.
संपादकीय भूमिका
|