घटनाद्रोही आदेश !

  • मशिदींवरील भोंगे काढण्याऐवजी हिंदूंनाच दाबण्याचा प्रयत्न करणारे हिंदुद्वेषी पोलीस !
  • अवैध भोंग्यांवर कारवाई न करणारे पोलीस कायदाद्रोहीच होत !

नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी भोंग्यांविषयी आदेश जारी केला आहे. ३ मे पर्यंत सर्वच धार्मिक स्थळांना भोंगे लावण्यासाठी अनुमती घेण्याचा आदेश दिला आहे. तसेच नमाजपठणाच्या वेळी मशिदीच्या १०० मीटर परिसरात कुणीही भोंगे लावून त्यावर कीर्तन, भजन किंवा हनुमान चालिसाचे पठण करण्यावर बंदी घातली आहे. ‘जर कुणी असे केले, तर त्याला ४ मासांचा कारावास आणि तडीपार करण्याची शिक्षा देण्यात येईल’, असे आदेशात म्हटले आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियमन १९५१ च्या कलम ४० अंतर्गत हे आदेश काढण्यात आले आहेत. नाशिक पोलिसांच्या आदेशातील पहिला भाग योग्य आहे की, सर्वांनी अनुमती घेऊनच धार्मिक स्थळावर भोंगे लावले पाहिजेत; मात्र दुसरा आदेश चुकीचाच म्हणावा लागेल.

भारतात प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे. जर नमाजपठणाच्या वेळी हिंदू भजन, कीर्तन करत असतील, तर ते चुकीचे कसे ठरवले जात आहे ? हिंदूंच्या मंदिरात आरती होत असेल किंवा भजन-कीर्तन होत असेल, तेव्हा भोंग्यांवरून दिली जाणारी अजान कधी थांबवली जाते का ? मग हिंदूंनाच हा आदेश कशाला ? आणि आताच हा आदेश कसा काय पोलीस काढतात ? राज ठाकरे यांनी ३ मेपर्यंत भोंगे उतरवण्याच्या दिलेल्या चेतावणीमुळे पोलीस असे करत असतील, तर ते अयोग्यच आहे. याला हिंदूंनी वैध मार्गाने विरोध केला पाहिजे. यासाठी न्यायालयाचाही दरवाजा ठोठवावा लागेल. ‘मशिदींवरील भोंगे अवैधरित्या लावले जातात’, हे पोलिसांना ठाऊक असतांनाही त्यांनी तक्रारी येऊनही आतापर्यंत कधी कारवाई केली नाही; मात्र हे पोलीस आता आदेशावर बोट ठेवून हिंदूंवर मात्र कारवाई करण्यास पुढे असतील, हे लक्षात ठेवायला हवे. आधीच मुसलमान अनुमती न घेता भोंगे लावत आहेत, आताही पोलिसांच्या आदेशाचे ते पालन करून अनुमती घेतील, याची अपेक्षा पोलीस कशी काय करतात ? आणि अशा वेळी पोलीस ३ मे नंतर त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस दाखवणार आहेत का ? ते केवळ हिंदूंवर कायद्याचा बडगा उगारतील, हे वेगळे सांगायला नको. त्यामुळे हिंदूंनी या आदेशाला विरोध करणे आवश्यक आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे याला त्यांच्या परीने उत्तर देतील आणि मनसेसैनिक त्यांच्या परीने यावर कृतीही करतील; मात्र असा चुकीचा आणि घटनाविरोधी आदेश पोलिसांनी पुन्हा देऊ नये, म्हणून कायदाप्रिय हिंदूंनी त्याला विरोध करणे आवश्यक आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सर्व प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर केवळ नाशिक पोलीस आयुक्तांनी हा आदेश दिला आहे. अन्य शहर किंवा जिल्ह्यांतील पोलिसांनी यावर अद्याप तरी काही म्हटलेले नाही. ‘नाशिक येथे मनसेचा अधिक जोर असल्याने असे करण्यात आले आहे का ?’, असा प्रश्न उपस्थित होतो. स्वतःची अकार्यक्षमता लपवण्यासाठी नाशिक पोलीस हिंदूंनाच दाबण्याचा प्रयत्न याद्वारे करत आहेत. त्यामुळे हा अन्याय रोखण्यासाठी हिंदूंनी वैध मार्गाने विरोध करणे अपरिहार्यच आहे !