भोमा येथे चौपदरी रस्त्याच्या कामात एकही घर किंवा मंदिर यांना धोका नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी, १९ एप्रिल (वार्ता.) – भोमा गावातून जाणार्‍या नियोजित चौपदरी रस्त्याच्या कामात एकही घर किंवा मंदिर यांना धोका पोचणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मधलावाडा, भोम येथील नागरिकांना दिली.

केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्रालयाने भोमा ते खोर्लीपर्यंतच्या चौपदरी रस्ता बांधकामासाठी १ सहस्र ६० कोटी रुपये संमत केले आहेत आणि पावसाळ्यानंतर या कामाला प्रारंभ केला जाणार आहे. या कामाच्या वेळी श्री सटी देवस्थान आणि इतर घरे यांना धोका निर्माण होण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भोमा येथील सुमारे ५० नागरिक १९ एप्रिल या दिवशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना भेटण्यासाठी साखळी येथील रवींद्र भवन येथे आले होते. या वेळी मुख्यमंत्री सावंत यांनी उपरोक्त ग्वाही दिली.

मुख्यमंत्री सावंत यांनी २१ एप्रिल या दिवशी सकाळी १०.३० वाजता मंत्रालयात भोमावासियांसाठी एक विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीमध्ये भोमा येथील चौपदरी रस्त्याच्या कामाविषयी तांत्रिक पथकाकडून नागरिकांसाठी सादरीकरण केले जाणार आहे.