(म्हणे) ‘पाकिस्तान काश्मीरचे सूत्र आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित करील !’

पाकचे नवनिर्वाचित पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी जुनाच राग आळवला !

काश्मीर भारताचा अविभाज्य अंग आहे, हे पाकिस्तानने नेहमीसाठीच लक्षात ठेवावे; मात्र पाकमधील राजकारण्यांना काश्मीरचे सूत्र उपस्थित केल्याविना सत्तेवर बसता येत नाही, हेही तितकेच खरे आहे ! – संपादक

पाकचे नवनिर्वाचित पंतप्रधान शाहबाझ शरीफ

इस्लामाबाद (पाकिस्तान) – काश्मिरी लोकांचे रक्त काश्मीरच्या रस्त्यांवर वहात असून त्यांच्या रक्ताने काश्मीर खोरे लाल झाले आहे. पाकिस्तान त्यांना राजनैतिक आणि नैतिक पाठिंबा देईल, तसेच आमचे सरकार हे सूत्र प्रत्येक आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर उपस्थित करील. आम्हाला भारतासमवेत चांगले संबंध हवे आहेत; मात्र काश्मीरचा प्रश्‍न सुटल्याखेरीज हे साध्य होऊ शकत नाही, असे विधान पाकचे नवनिर्वाचित पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर संसदेत केले.

शरीफ म्हणाले की, आपले शेजारी आपल्याला निवडता येत नाहीत, आपल्याला त्यांच्यासमवेत रहावेच लागते आणि पाकिस्तानच्या निर्मितीपासून आमचे भारतासमवेतचे संबंध दुर्दैवाने कधीही चांगले राहिलेले नाहीत. ऑगस्ट २०१९ मध्ये भारताने अनुच्छेद ३७० रहित केला, तेव्हा इम्रान खान यांनी हे कलम पुन्हा अस्तित्वात आणण्यासाठी राजनैतिक स्तरावर प्रयत्न केले नाहीत. काश्मीरचा प्रश्‍न सोडवण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे यावे, जेणेकरून दोन्ही देश सीमेच्या दोन्ही बाजूला असलेली गरिबी, बेरोजगारी, औषधटंचाई आणि अन्य सूत्र यांवर लक्ष केंद्रित करू शकतील.