रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सद्गुरु अनुराधा वाडेकर यांची सेवा करतांना साधिकेला श्री दुर्गादेवीच्या संदर्भात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

१. ‘सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या ठिकाणी विराट रूपातील श्री दुर्गादेवी आहे’, असे जाणवणे

नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२१ मध्ये काही दिवसांसाठी सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर रामनाथी, गोवा येथील आश्रमात आल्या होत्या. त्या वेळी मला त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. एकदा त्यांच्या खोलीत सेवेसाठी जाण्यापूर्वी मी दाराजवळ उभी राहून प्रार्थना करत होते. त्या वेळी मला जाणवले, ‘सद्गुरु अनुताईंच्या ठिकाणी साक्षात् श्री दुर्गादेवी विराट रूपात आहे.’

कु. किरण व्हटकर

२. सद्गुरु अनुताईंच्या पायांना मर्दन करतांना साधिकेला ‘सद्गुरु अनुताईंचे चरण म्हणजे श्री दुर्गादेवीचेच चरण आहेत’, असे जाणवून कोणतेही शारीरिक त्रास न होता चैतन्य आणि आनंद मिळणे

सद्गुरु अनुताईंच्या पायांना मर्दन (मालीश) करण्याची सेवा मला मिळाली होती. सेवेपूर्वी प्रार्थना करतांना मला जाणवले, ‘सद्गुरु ताईंचे चरण म्हणजे श्री दुर्गादेवीचेच चरण असून मी श्री दुर्गादेवीच्या चरणांची सेवा करत आहे.’ सद्गुरु अनुताईंचे पाय दाबत असतांना मला वाकावे लागायचे, तरीही मला कंबर किंवा पाय या ठिकाणी कधीही वेदना जाणवल्या नाहीत. अन्य वेळी थोडी सेवा केली, तरी मला थकवा येतो. सद्गुरु अनुताईंकडून चैतन्य मिळत असल्यामुळे मला त्यांच्या सेवेत असतांना कधीही शारीरिक त्रास जाणवले नाहीत. ‘सद्गुरु अनुताईंच्या माध्यमातून श्री दुर्गादेवीनेच मला चैतन्य आणि आनंद दिला’, असे वाटले.

३. सद्गुरु अनुताईंची सेवा झाल्यावर मनात आलेला विचार आणि परात्पर गुरु डॉक्टरांनी सूक्ष्मातून दिलेला दृष्टीकोन !

सद्गुरु अनुताईंच्या सेवेचा कालावधी संपल्यावर माझ्या मनात विचार आला, ‘आता मला सद्गुरु अनुताईंकडे जाता येणार नाही.’ नंतर काही वेळाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून मला सांगितले, ‘असा विचार करण्यापेक्षा ‘आतापर्यंत सद्गुरु अनुराधा वाडेकर यांची सेवा करायला मिळाली’, हेच भाग्य आहे’, असा विचार कर आणि त्यासाठी कृतज्ञ रहा.’ त्यानंतर सद्गुरु अनुताईंच्या सेवेतील क्षण आठवून मला पुष्कळ आनंद मिळाला.

श्री दुर्गादेवीच्या कृपेनेच मला सद्गुरु अनुताईंच्या सेवेची संधी मिळाली. त्याबद्दल श्री दुर्गादेवीच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– कु. किरण रवींद्र व्हटकर (वय २० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.१२.२०२१)

साधिकेला सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या जागी श्री दुर्गादेवीचे अस्तित्व जाणवण्याचे कारण

सनातन-निर्मित श्री दुर्गादेवीचे चित्र

‘सनातनच्या साधक-चित्रकार’ म्हणून कु. अनुराधा वाडेकर (आताच्या सद्गुरु अनुराधा वाडेकर) यांनी साधनेला आरंभ केला. वर्ष २००३ मध्ये त्यांनी श्री दुर्गादेवीचे चित्र रेखाटले आहे. श्री दुर्गादेवीप्रती असलेल्या त्यांच्या भावामुळे ७.५.२००३ या दिवशी पाच घंटे ‘श्री दुर्गादेवी जणू सूक्ष्मातून आपल्यासमोर उभी आहे’, असे त्यांना जाणवत होते. त्या वेळी देवीच्या शरिराचा एकेक भाग कु. अनुराधा वाडेकर यांना जसा दिसत होता, त्याप्रमाणे त्यांनी तो रेखाटण्यास आरंभ केला. शेवटी देवीचे दशभुजा रूपातील चित्र पूर्ण झाले. वर्ष २००५ मध्ये त्या चित्रात काळानुसार आवश्यक असलेले पालट करून श्री दुर्गादेवीचे अष्टभुजा रूपातील चित्र सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी रेखाटले. त्यांच्यामध्ये श्री दुर्गादेवीप्रती भाव आणि भक्ती असल्यामुळे साधिकेला सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या ठिकाणी श्री दुर्गादेवीचे अस्तित्व जाणवून अनुभूती आल्या.’ – संकलक

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक