अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवाब मलिक यांच्या त्यागपत्रासाठी विधानसभेत विरोधकांचा गदारोळ !

विधानसभा  

मुंबई, ३ मार्च (वार्ता.) – विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झरवळ यांनी कामकाजाला प्रारंभ केल्यानंतर भाजपच्या आमदारांनी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या त्यागपत्राची मागणी करून सरकारला घेरले. मुख्यमंत्र्यांनी नवाब मलिक यांच्या त्यागपत्राची मागणी करून भाजपच्या आमदारांनी सरकारच्या विरोधात घोषणा चालू केल्या. त्यामुळे सभागृहात गदारोळ झाला. सर्व गोंधळ आणि गदारोळ यातच अध्यक्षांनी विधानसभेचे कामकाज चालू ठेवले.

सौजन्य टीवी 9 मराठी

विधानसभेत काही शासकीय, अशासकीय विधेयक आणि पुरवण्या मागण्या, असे विषय संमत करण्यात आले. त्यानंतर भारतरत्न दिवंगत लता मंगेशकर, ज्येष्ठ उद्योगपती दिवंगत राहुल बजाज यांसह अन्य काही जणांच्या निधनाविषयी शोकप्रस्ताव मांडण्यात आला.

पत्रकारांशी बोलतांना नेत्यांनी काय सांगितले  ?

मलिक यांनी मंत्रीपदावर रहाणे नैतिकतेला धरून नाही ! – फडणवीस, विरोधी पक्षनेते

देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

दाऊदसमवेत व्यवहार केल्याचा नवाब मलिक यांच्यावर आरोप आहे. मुंबई येथे जे बॉम्बस्फोट झाले, त्यातील आरोपींसमवेत व्यवहार करून हसीना पारकर हिला ५० लाख रुपये दिल्याप्रकरणी नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. असे असतांना ते मंत्री मंत्रीपदावर कसे रहातात ? हे नैतिकतेला धरून नाही. दाऊद याच्या बहिणीला पैसे देणे याचा अर्थ काय ? दाऊद याला समर्थन देणार्‍या मंत्र्याचे त्यागपत्र घेतलेच पाहिजे.

मंत्री नवाब मलिक यांच्या त्यागपत्रासाठी भाजप आक्रमक असणार आहे ! – आशिष शेलार, भाजप

आशिष शेलार, भाजप

आंतरराष्ट्रीय आतंकवादी दाऊद इब्राहिम याचे हस्तक आणि त्याच्याशी संबंध ठेवल्याच्या आरोपांखाली पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे, असे नवाब मलिक यांचे त्यागपत्र जोपर्यंत घेत नाही, तोपर्यंत भाजप शांत रहाणार नाही. नवाब मलिक यांच्या त्यागपत्रासाठी भाजप आक्रमक असणार आहे.

राज्यपालांनी क्षमा मागवी ! –  नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वक्तव्य करून त्यांचा अवमान केला आहे. त्यामुळे सर्वांच्या मनामध्ये चीड आहे. छत्रपतींचा जयघोष त्यांना आवडत नाही. महाराष्ट्रात महाराजांचा जयजयकार होणार. नवाब मलिक यांच्यावर आरोप सिद्ध न झाल्याने त्यांनी त्यागपत्र देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.