सिद्धलिंग स्वामीजी यांच्यासह प्रमोद मुतालिक आणि महिला हिंदुत्वनिष्ठ यांना ३ मार्चपर्यंत कलबुर्गी जिल्ह्यात प्रवेशबंदी !

विटंबना झालेल्या शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त शुद्धी करण्यास मज्जाव !

रायचूर (कर्नाटक) – काही दिवसांपूर्वी कलबुर्गी जिल्ह्यातील आळंद येथे शिवलिंगाची विटंबना झालेल्या श्री ईश्वर मंदिराची महाशिवरात्रीनिमित्त शुद्धी करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सिद्धलिंग स्वामीजी यांच्या हस्ते हे शुद्धीकरण करण्यात येणार होते.

श्रीराम सेनेचे संस्थापक श्री. प्रमोद मुतालिक

 (सौजन्य : Daily Salar)

या कार्यक्रमाला श्रीराम सेनेचे संस्थापक श्री. प्रमोद मुतालिक आणि हिंदुत्वनिष्ठ कु. चैत्रा कुंदापूर तेथे जाणार होत्या; परंतु जिल्हा प्रशासनाने त्यांना ३ मार्चपर्यंत कलबुर्गी जिल्ह्यात प्रवेशबंदी केली आहे. ‘दायजीवर्ल्ड’ या वृत्तसंकेतस्थळाने हे वृत्त प्रसारित केले आहे.

या वृत्तानुसार, ‘या आदेशाचे उल्लंघन करून जिल्ह्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्‍या कु. चैत्रा कुंदापूर यांना शहाबाद पोलिसांनी कह्यात घेतले आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्रवेशबंदीच्या निर्णयाला हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून विरोध करण्यात आला. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी येथे ३ मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिरात विशेष पूजेची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच दिवशी अपवित्र झालेल्या ईश्वर मंदिराशेजारी असलेल्या ‘लाडले मशक दर्ग्या’त ‘शब-ए-बारात’ सोहळा साजरा केला जात आहे. त्यामुळे चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना श्री. प्रमोद मुतालिक म्हणाले की, ‘कलबुर्गी जिल्हा प्रशासनाची भूमिका हिंदुविरोधी आहे.’