‘पद्मावत’ आणि ‘जोधा अकबर’ या चित्रपटांना अभिव्यक्तीस्वातंत्र्य अन् ‘नथुराम गोडसे’ यांच्या चित्रपटाला विरोध, हा गांधींचा विश्वासघात !

भारतियांनो, गांधीवादी आणि पुरोगामी यांचा हा ढोंगीपणा लक्षात घ्या !

हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांचे ट्वीट

मुंबई, ३१ जानेवारी (वार्ता.) – नथुराम गोडसे यांच्या चित्रपटाला विरोध करणारे गांधीजींच्या प्रेम आणि अहिंसा या शिकवणीच्या विरुद्ध वागत आहेत. हे तेच लोक आहेत, ज्यांनी कला आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली ‘जोधा अकबर’ आणि ‘पद्मावत’ या चित्रपटांचे समर्थन केले होते, असे ट्वीट करत हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी ‘नथुराम गोडसे’ यांच्या चित्रपटाला विरोध करणार्‍यांचा ढोंगीपणा उघड केला आहे.

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

या चित्रपटाला विरोध करणे म्हणजे भ्याडपणा आणि ढोंगीपणा असल्याचेही त्यांनी ‘ट्वीट’मध्ये म्हटले आहे. गांधी यांच्या हत्येवर आधारित ‘व्हाय आय् किल्ड गांधी ?’ हा चित्रपट ३० जानेवारी या दिवशी ‘ओटीटी प्लॅटफार्म’ वर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला काँग्रेस, गांधीवादी आणि काही पुरोगामी मंडळी यांच्याकडून विरोध केला जात आहे. याविषयी अधिवक्ता इचलकरंजीकर यांनी ‘ट्वीट’द्वारे या विरोधातील ढोंगीपणा उघड केला आहे.