देववाणी संस्कृत भाषेची निर्मिती आणि तिची वैशिष्ट्ये !

काँग्रेसवाले आणि साम्यवादी नेते देववाणी संस्कृतचे महत्त्व समजून घेतील का ?

कर्नाटकातील भाजप सरकारने ‘कर्नाटक संस्कृत विश्वविद्यालय’ उभारण्यासाठी १०० एकर भूमी संमत केली आहे. या निर्णयाला काँग्रेस, जिहादी आतंकवादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि कर्नाटकातील पुरोगामी यांनी विरोध करण्यास आरंभ केला आहे. कर्नाटकातील काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी या संस्कृत विश्वविद्यालयाला ‘बेकार’, असेही संबोधले आहे. काँग्रेसचे दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी संस्कृत भाषेला ‘मृत’ ठरवले होते. प्रत्यक्षात देववाणी असलेली चैतन्यमय संस्कृत भाषा ही मानवाला मिळालेली अनमोल देणगी आहे. अशा संस्कृत भाषेचे जीवनातील महत्त्व सर्वांना समजण्यासाठी हा लेख येथे देत आहोत.

इंग्रजी आणि संस्कृत

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

इंग्रजीची भोंगळ वर्णमाला अन् संस्कृतची शुद्ध आणि शास्त्रीय वर्णमाला : ‘आमची प्राचीन सनातन हिंदु संस्कृती अत्यंत शुद्ध आणि शास्त्रीय आहे. तिच्यात प्रवेश करायचा म्हटले, तर शुद्ध वर्णमाला हवी. इंग्रजी वर्णमाला ही अत्यंत अशुद्ध आहे. इंग्रजी डब्ल्यू (w) हा वर्ण ‘ड् अ ब् ल् यु’ असा आहे.  हा कसला भयानक भोंगळपणा ! इंग्रजीच्या अशुद्ध वर्णमालेच्या मर्यादा संगणकाला जाणवतात. हे प्रतिबंध निवारण्याकरता देवनागरी संस्कृत लिपी सोयीची आहे. आमच्या शुद्ध वर्णमालेचे हे अंगभूत सामर्थ्य जगाला स्वीकारावेच लागेल. वर्णाशी (अक्षराशी) असणारा शास्त्रीय अर्थ हा शुद्ध असेलच. वर्णमालेचा आणि शास्त्रीय अर्थाचा असा हा परस्पर जिवाभावाचा संबंध आहे.’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

अपूर्ण इंग्रजी भाषा आणि परिपूर्ण संस्कृत भाषा !

‘संस्कृत आणि संस्कृतोद्भव हिंदी, मराठी इत्यादी भाषांत ५२ अक्षरे आहेत. याउलट इंग्रजी भाषेत केवळ २६ अक्षरे आहेत. त्यामुळे एखाद्या संकेतस्थळाची मार्गिका (लिंक) सांगतांना त्यातील इंग्रजी अक्षरे ‘मोठे किंवा लहान’ या भाषेत सांगावी लागतात; कारण त्याखेरीज ती मार्गिका उघडू शकत नाही, उदा. आतापर्यंत झालेल्या अखिल भारतीय हिंदु अधिवेशनात विविध वक्त्यांनी ‘लव्ह जिहाद’ या विषयावर केलेल्या मार्गदर्शनाचे व्हिडिओ ‘यू ट्यूब’ संकेतस्थळावर ठेवण्यात आले आहेत. ते goo.gl/9kRUwY या मार्गिकेवर पहाता येतात. या मार्गिकेचा पत्ता सांगतांना ‘जी ओ ओ डॉट जी एल ऑब्लिक नाइन के कॅपिटल आर कॅपिटल यू डब्ल्यु कॅपिटल वाय’, असे सांगावे लागते !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१७.५.२०१५)

१.  संस्कृत भाषेची निर्मिती

१ अ. संस्कृत ही ईश्वरनिर्मित भाषा : ‘संस्कृतची आजची स्थिती पहाण्याअगोदर संस्कृत भाषेचा उद्भव कसा झाला, ते पाहूया. आपल्या वैदिक परंपरेने विश्वनिर्मितीपासूनचा साद्यंत इतिहास जतन करून ठेवला आहे. प्रथम सर्वत्र शून्य होते. मग ‘ॐ’ असा ध्वनी अवकाशात निनादला. शेषषायी श्रीविष्णु प्रकट झाला. त्याच्या नाभीतून ब्रह्मदेव प्रकटला. त्यानंतर प्रजापति, मातृका, धन्वन्तरि, गंधर्व, विश्वकर्मा आदी निर्माण झाले. त्याच वेळी विश्वाचे ज्ञानभांडार ज्यात सामावले आहे, असे वेद ईश्वराने उपलब्ध करून दिले. वेद संस्कृत भाषेत आहेत. संस्कृत ही ‘देववाणी’ आहे. वेद जसे अपौरुषेय म्हणजे ईश्वरप्रणीत आहेत, तशीच संस्कृत भाषाही ईश्वरनिर्मित आहे. तिची रचना आणि लिपी ईश्वराने निर्माण केली आहे; म्हणून त्या लिपिलाही ‘देवनागरी’ म्हणतात. संस्कृत भाषेची सर्व नावेही ती देवभाषा असल्याचे स्पष्ट करतात, उदा. ‘गीर्वाणभारती’ हे नाव पहा. त्यातील ‘गीर्वाण’ या शब्दाचा अर्थ ‘देव’ असा आहे.’

१ आ. सृष्टीच्या निर्मितीपूर्वीच ईश्वराने संस्कृत भाषा निर्मिली, तर त्रेतायुगात दत्तगुरूंनी संस्कृत भाषेची पुनर्निर्मिती केली : ‘संस्कृत भाषा कशी सिद्ध झाली, ते सांगतांना पाश्चात्त्यांच्या नादी लागलेले काही जण म्हणतात, ‘पहिल्यांदा मानवाला ‘आपल्या तोंडातून ध्वनी येतात’, हे कळले. त्या ध्वनींच्या खुणा, खुणांची चिन्हे आणि त्या चिन्हांचीच अक्षरे झाली. त्यातून बाराखडी, वस्तूंची नावे, अशा तर्‍हेने सर्व भाषा, अगदी संस्कृत भाषाही निर्माण झाली.’ अर्थात् हे सर्व खोटे आहे. ईश्वराच्या संकल्पाने ही सृष्टी निर्माण झाली. मानवाच्या निर्मितीनंतर मानवाला आवश्यक ते सर्वकाही त्या ईश्वरानेच दिले. एवढेच नव्हे, तर मानवाला काळाप्रमाणे पुढे ज्याची आवश्यकता भासेल, तेही द्यायची व्यवस्था त्याने केली आहे. सृष्टीच्या निर्मितीपूर्वीच ईश्वराने मनुष्यप्राण्याला मोक्षप्राप्तीसाठी उपयोगी पडणारी आणि चैतन्याने ओतप्रोत भरलेली अशी एक भाषा सिद्ध केली. या भाषेचे नाव आहे ‘संस्कृत’.

त्रेतायुगामध्ये जिवाची शब्दातीत ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता न्यून झाली. त्यामुळे शब्दांच्या माध्यमातून जिवाला ज्ञान प्राप्त होऊन मोक्षप्राप्ती सुलभतेने व्हावी, यासाठी दत्तगुरूंनी संस्कृत भाषेची पुनर्निर्मिती केली.’

१ इ. द्वापरयुगापर्यंत संस्कृत हीच विश्वाची भाषा होती ! : ‘सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापरयुग या तीन युगांमध्ये संस्कृत हीच विश्वाची भाषा होती. त्यामुळे तिला ‘विश्ववाणी’ही म्हणतात. अगदी कौरव-पांडवांच्या काळापर्यंत संस्कृत हीच विश्वातील एकमेव भाषा होती.’

१ ई. देवभाषा संस्कृत आणि मानवभाषा

१ ई १. देवभाषा संस्कृत (भाषेचे मूळ वेदांत आढळते) : ‘आद्यमानव मनु आणि शतरूपा यांचे मिथुन होते. त्यांना ब्रह्मदेवाने संस्कृत शिकवले. ब्रह्मदेवाने आपल्या अत्री, वसिष्ठ, गौतमादी या मानसपुत्र ऋषींना वेद शिकवले, संस्कृत शिकवले. ती परंपरा पुढे चालू झाली. वेदांतील शब्द नित्य आहेत. याचा अर्थ ‘गौः’ (गाय) हा प्राण्यांची एक जात सांगणारा शब्द आहे. तो मूळचा आहे, म्हणजे ‘गो’ हा जातीवाचक अथवा सामान्य शब्द आहे. गोत्व हे नित्य आहे. वेदसंहितेत असे नित्य शब्द आहेत, म्हणून ती अपौरुषेय वेदवाणी आहे. ती स्वयंभू आहे. स्वतः प्रमाण आहे. ते आम्ही वेदापासून ग्रहण केले. कपिला गाय, मंगला गाय, काळी गाय, पांढरी गाय, ही जी गायीला विशेष नावे आहेत, ती मानवनिर्मित आहेत. ती अनित्य आहेत.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

१ ई २. शब्दांना अर्थ कसे प्राप्त झाले, याचे विवरण वेदात असणे : ‘शब्दांना अर्थ कसे प्राप्त झाले ? भाषा सतत पालटत गेली आणि पुढेही बदलत  राहील; पण ‘वर्णांनी शब्द नेमके कसे बनत गेले ? त्यांना अर्थ कसे  प्राप्त झाले ?’, हे न उकलणारे विलक्षण गूढ आहे. अजूनही ते गूढच आहे. ‘अमक्या वस्तूसाठी अमुकच शब्द का ? दुसरा शब्द का नाही ?’, याचे बुद्धीनिष्ठ निर्वचन कुणीही करू शकत नाही. ते शक्य नाही. वेदात ते विवरण आहे. वेदशब्द नित्य आहेत. जाती नित्य आहेत. जे शब्द जातीवाचक आहेत, उदा. ‘गोत्व’ त्यातील ‘गाय’ हा नित्य शब्द आम्हाला वेदांपासून शिकता आला.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

१ ई ३. ‘श्रीकृष्णाने गीतेत संपूर्ण अध्यात्मशास्त्राचे जे ज्ञान दिले आहे, ते बीजस्वरूपात ज्ञान सांगण्याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे.’ – परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले

१ ई २. संस्कृत भाषेची मोडतोड होऊन अन्य भाषा निर्माण होणे : ‘कौरव-पांडवांच्या त्या महाभारतीय युद्धानंतर वैदिक, म्हणजेच हिंदूंचे विश्वसाम्राज्य हळूहळू आक्रसत आल्यावर संस्कृत भाषेचीही मोडतोड होऊन तिच्या वेड्यावाकड्या प्रादेशिक उच्चारातून अन्य भाषा निर्माण झाल्या. त्यामुळेच इंग्रजीसारख्या भाषांमध्ये संस्कृतशी साम्य दाखवणारे शब्द विपुल प्रमाणात आढळतात, उदा. गायीला संस्कृतमध्ये ‘गौ’, तर इंग्रजीत ‘काऊ (cow)’ म्हणतात, दाताला ‘दंत’ तर इंग्रजीत ‘dent’ म्हणतात.’

१ ई ५. मूळ संस्कृत शब्दाला पाश्चात्त्य भाषेतील आणि पौर्वात्य भाषेतील समानार्थी शब्द

– श्री. नारायण भवानराव पावगी

२.  संस्कृत भाषेची वैशिष्ट्ये

२ अ. ‘संस्कृत अक्षरे म्हणजे विश्वनिर्मिती करणारी जननी आहे. त्यांची रूपे आपले एका मातेप्रमाणे पोषण आणि रक्षण करतात !’ – वामदेव शास्त्री (पूर्वाश्रमीचे डेविड फ्रॉले)

२ आ. कधीही भ्रष्ट न होणारी संस्कृत भाषा ! (काश्मीरमधील पंडित संस्कृतचे जसे उच्चार आणि लेखन करतील, तसेच उच्चार आणि लेखन केरळमधील पंडितही करतील !) : ‘संस्कृत भाषेचे मूळ स्वरूप लाखो वर्षे टिकून आहे. याचे कारण म्हणजे तिच्यातील व्याकरणाची परिपूर्णता. या परिपूर्ण व्याकरणामुळे संस्कृत भाषा अन्य भाषांप्रमाणे प्रदेशनिहाय लिहिली जाऊ शकत नाही, तसेच तिचे शब्द प्रादेशिक उच्चारांनुसार पालटू शकत नाही. प्रदेशनिहाय लेखनाचे उदाहरणच द्यायचे झाले, तर इंग्लंडमध्ये colour (रंग) असे लिहिले जाते, तर अमेरिका color अशी वर्णमाला लिहिण्यात धन्यता मानते. संस्कृतमध्ये प्रादेशिक उच्चार नावाचा प्रकार नाही. काश्मीरमधील पंडित वेदांचे जसे उच्चार करतील, तसेच उच्चार केरळमधील पंडितही करतील. संस्कृत ही तिच्या व्याकरणाचे नियम, समास, संधी यांनुसारच लिहावी लागते. त्यामुळे ती भ्रष्ट होण्याची शक्यताच नाही. त्यामुळे तिच्यातील प्राचीन ज्ञानभांडारही मूळ स्वरूपात, जसेच्या तसे उपलब्ध आहे !’

२ इ. ‘देवभाषेच्या विकृतीकरणामुळे विकृत शब्द निर्माण होतात, उदा. योगा, आयुर्वेदा !’ – परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले

२ ई. जगातील सर्व भाषांना लाजवणारे संस्कृत भाषेचे सौंदर्य

२ ई १. प्रचंड शब्दभांडार : ‘स्त्री’ या शब्दाकरता नारी, अर्धांगिनी, वामांगिनी, वामा, योषिता, असे अनेक शब्द संस्कृतमध्ये आहेत. हा प्रत्येक शब्द स्त्रीची सामाजिक, कौटुंबिक आणि धार्मिक भूमिका दर्शवतो. संस्कृत भाषेचे शब्दभांडार एवढे प्रचंड आहे की, त्याची माहिती घ्यायला एक आयुष्य पुरे पडणार नाही.’

२ ई १ अ. एका प्राण्याला, वस्तूला, देवाला अनेक नावे असलेली संस्कृत भाषा ! : ‘संस्कृतमध्ये प्राणी, वस्तू इत्यादींना अनेक नावे देण्याची प्रथा होती, उदा. बैलाला बलद, वृषभ, गोनाथ अशी ६० च्या वर; हत्तीला गज, कुंजर, हस्तिन, दंतिन, वारण अशी १०० च्या वर; सिंहाला वनराज, केसरीन, मृगेंद्र, शार्दूल अशी ८० च्या वर; पाण्याला जल, जीवन, उदक, पय, तोय, आप; सोन्याला स्वर्ण, कांचन, हेम, कनक, हिरण्य आदी नावे आहेत.’

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘देववाणी संस्कृतची वैशिष्ट्ये अन् संस्कृतला वाचवण्यासाठीचे उपाय’)