श्री क्षेत्र द्वारापूर, धारवाड (कर्नाटक) येथील संत श्री परमात्माजी महाराज यांची वाराणसी येथील सनातन संस्थेच्या सेवाकेंद्राला सदिच्छा भेट !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी २० वर्षांपूर्वीच ज्या हिंदु राष्ट्राविषयी सांगितले, त्याविषयी संत आणि समाज यांना आता कुठेतरी जाणीव व्हायला लागली आहे ! – श्री परमात्माजी महाराज

श्री परमात्माजी महाराजांचा सन्मान करतांना हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारत समन्वयक श्री. शंभू गवारे

वाराणसी (उत्तरप्रदेश), ९ जानेवारी (वार्ता.) – परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी २० वर्षांपूर्वी हिंदु राष्ट्राविषयी सांगितले होते आणि आता समाजालाच नव्हे, तर संतांनादेखील हिंदु राष्ट्राविषयी कुठेतरी जाणीव व्हायला लागली आहे, असे प्रतिपादन श्री क्षेत्र द्वारापूर, धारवाड, कर्नाटक येथील ‘श्री परमात्मा महासंस्थानम्’चे संस्थापक श्री परमात्माजी महाराज यांनी केले. महाराजांनी येथील सनातनच्या सेवाकेंद्राला सदिच्छा भेट देऊन राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याला आशीर्वाद दिले. त्या वेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत त्यांचे शिष्य श्री. विशाल जाधव आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. पूजा जाधव उपस्थित होत्या. या वेळी महाराजांचा सन्मान हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारत समन्वयक श्री. शंभू गवारे यांनी केला.

महाराजांनी आश्रमात चालू असलेल्या वेगवेगळ्या सेवांविषयी कुतुहलपूर्वक जाणून घेतले. महाराजांना महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाद्वारे करण्यात येत असलेल्या संशोधन कार्याविषयी, तसेच सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकलित केलेल्या ग्रंथांविषयी माहिती सांगितल्यावर त्यांनी ती जिज्ञासेने ऐकून घेतली.

परमभाग्य म्हणून साधक सेवाकेंद्रात राहून साधना करत आहेत !

सेवाकेंद्रातील श्रीरामाच्या मूर्तीचे दर्शन घेऊन महाराजांनी सेवाकेंद्र पहाण्याची इच्छा व्यक्त केली. सेवाकेंद्रात चालू असलेल्या कार्याविषयी त्यांनी आस्थेने जाणून घेतले. सेवाकेंद्रातील युवा साधकांना पाहून ते म्हणाले, ‘‘या सर्वांचे परमभाग्य आहे. त्यांचे जीवन यासाठीच आहे; म्हणून ते एवढ्या लहान वयात सेवाकेंद्रात राहून साधना करत आहेत.’’

हिंदु धर्मात योग्य कर्माला पुष्कळ महत्त्व आहे !

सेवाकेंद्रात साधकांकडून झालेल्या चुका लिहिण्यासाठीचा फलक आणि स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया यांविषयी महाराजांना माहिती सांगितल्यावर महाराज म्हणाले, ‘‘परात्पर गुरुदेव तुमच्याकडून योग्य कर्म होण्यासाठी आवश्यक कृती या माध्यमातून करून घेत आहेत; कारण हिंदु धर्मात योग्य कर्माला फार महत्त्व आहे.’’

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्य फारच चांगले आहे !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्य फारच चांगले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी तुम्ही चांगले कार्य करत आहात.

क्षणचित्र

श्री परमात्माजी महाराज हे श्री दत्तगुरूंचे उपासक आहेत. त्यांना सनातन-निर्मित श्री दत्तगुरूंचे सात्त्विक चित्र दिल्यावर त्यांनी ‘‘मी तर यांचाच उपासक आहे’’, असे म्हणत ते चित्र अत्यंत भावपूर्णपणे स्वतःकडे ठेवले. त्यांना चित्र ठेवण्यासाठी पिशवी दिल्यावर ते ‘नको’ म्हणाले आणि त्यांनी ते चित्र हातातच ठेवले. वाहनात बसल्यावरदेखील ते सतत त्या चित्राकडेच पहात होते.