कालीचरण महाराज यांच्या विरोधात काँग्रेसी नेत्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंद !

रायपूर (छत्तीसगड) येथील धर्मसंसदेत म. गांधी यांची हत्या केल्यावरून नथुराम गोडसे यांचे कौतुक केल्याचे प्रकरण  

कालीचरण महाराज

रायपूर (छत्तीसगड) – येथे आयोजित धर्मसंसदेमध्ये मोहनदास करमचंद गांधी यांच्या हत्येवरून नथुराम गोडसे यांचे कौतुक केल्यावरून कालीचरण महाराज यांच्या विरोधात काँग्रेसच्या नेत्यांनी तक्रारी केली. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे.
२६ डिसेंबर या दिवशी झालेल्या धर्मसंसदेत कालीचरण महाराज म्हणाले की, मुसलमान हे राजकारणाच्या माध्यमातून देशावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या डोळ्यांसमोरच त्यांनी वर्ष १९४७ मध्ये देशावर नियंत्रण मिळवले होते. त्यांनी प्रथम इराण, इराक आणि अफगाणिस्तान यांच्यावर नियंत्रण मिळवले. तसेच राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी पाकिस्तान आणि बांगलादेश यांवरही नियंत्रण मिळवले. मी नथूराम गोडसे यांना सलाम करतो; कारण त्यांनी म. गांधी यांची हत्या केली.

कट्टर हिंदु नेता निवडणे आवश्यक ! – कालीचरण महाराज

कालीचरण महाराज यांनी राज्यातील काँग्रेस सरकारवर टीका करतांना म्हटले की, धर्माचे रक्षण करण्यासाठी कट्टर हिंदु नेत्यालाच सरकारचा प्रमुख करायला हवे. छत्तीसगडमधील सरकार हे पोलीस प्रशासनाचे गुलाम आहेत. त्यामुळे याठिकाणी कट्टर हिंदु नेता मुख्यमंत्री होणे आवश्यक आहे. हिंदु धर्माचे रक्षण करणे, हेच आमचे कर्तव्य आहे.

कालीचरण महाराज यांची संक्षिप्त ओळख

कालीचरण महाराज हे विदर्भातील अकोला येथील आहेत. त्यांचे मूळ नाव अभिजित धनंजय सराग आहे. ते भावसार समाजातील आहे. त्यांना शिक्षणाची आवड नसल्याने त्यांच्या पालकांनी इंदूर येथील त्यांच्या मावशीकडे पाठवल्यावर तेथे त्यांचा संपर्क भय्यूजी महाराजांशी झाला. तेथेच त्यांना कालीचरण नाव मिळाले. अकोल्यात एका मंदिरात म्हटलेल्या शिवतांडव स्तोत्राचा त्यांचा एक व्हिडीओ प्रसारित झाला होता. त्यानंतर कालीचरण महाराज हे चर्चेत आले होते. ‘मी श्री महाकालीमातेला आई, तर अगस्ती ऋषी यांना ते गुरु मानतो’, असे त्यांनी म्हटले आहे.

(म्हणे), ‘प.पू. कालीचरण महाराज यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंद करून त्यांना अटक करा !’ – नवाब मलिक, अल्पसंख्यांक मंत्री

संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई करू ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक

मुंबई, २७ डिसेंबर (वार्ता.) – छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे २ दिवसीय ‘धर्मसंसद’ आयोजित करण्यात आली होती. या धर्मसंसदेचा समारोप २६ डिसेंबर या दिवशी झाला. या कार्यक्रमात मोहनदास गांधी यांना शिव्या देऊन नथुराम गोडसे यांचे कौतुक केले, असा आरोप या कार्यक्रमाविषयी करण्यात आला आहे. या कार्यक्रमात अकोला येथील रहिवासी प.पू. कालीचरण महाराज यांनीही मोहनदास गांधी यांच्याविषयी अपशब्द वापरले, असा आरोप करण्यात आला आहे. त्यावरूनच २७ डिसेंबर या दिवशी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी प.पू. कालीचरण महाराज यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंद करा, अशी मागणी केली. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘या प्रकरणाची पूर्ण माहिती घेऊन प.पू. कालीचरण महाराज यांच्यावर कारवाई केली जाईल’, असे आश्‍वासन दिले. या वेळी विधानसभेत भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार, काँग्रेसचे आमदार नाना पटोले, तसेच मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही वरील मागणी केली.