सातारा जिल्ह्यात श्री दत्तजयंती उत्साहात साजरी !

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट देतांना (डावीकडून) सनातनच्या साधिका सौ. सुनीता पवार आणि सौ. राजेश्वरी सांभारे

सातारा, २० डिसेंबर (वार्ता.) – कोरोना महामारीमुळे २ वर्षे अनेक निर्बंध घालण्यात आले होते; मात्र निर्बंध हटवल्यानंतर यावर्षी जिल्ह्यातील विविध श्री दत्त मंदिरांमध्ये मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावात श्री दत्तजयंती उत्सव साजरा करण्यात आला.

शहरातील आनंदवाडी दत्त मंदिर, प्रतापगंज पेठेतील मुतालिक दत्त मंदिर, गेंडामाळ येथील दत्त मंदिर, श्रीक्षेत्र सज्जनगड येथील समाधी मंदिरासमोरील दत्त मंदिर, तसेच जिल्ह्यातील विविध एस्.टी. आगारातील दत्त मंदिर येथे मोठ्या उत्साहात सायंकाळी श्री दत्त जन्मकाळ साजरा करण्यात आला. या वेळी ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा…..’ या नामघोषाने संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला सदिच्छा भेट !

सनातन संस्थेच्या वतीने शहरातील आनंदवाडी दत्त मंदिर परिसरामध्ये सनातननिर्मित सात्त्विक ग्रंथ, नामपट्ट्या, देवतांची चित्रे, तसेच सात्त्विक उत्पादनांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सदिच्छा भेट दिली. या वेळी ‘सनातनचे कार्य ठाऊक आहे,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. या वेळी मंत्री देसाई यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट देण्यात आले.