‘जिहादी आतंकवादाच्या प्रवेशद्वारांपैंकी एक’ आणि ‘समाजासाठी धोकादायक’ असल्याचा ठपका !
मुसलमानांसाठी अत्यंत महत्त्वाचा देश असलेल्या सौदी अरेबियाला जर ‘तबलिगी जमात ही संघटना आतंकवादाचे प्रवेशद्वार आहे’, असे वाटते आणि तो देश तिच्यावर बंदी घालतो, तर भारत बंदी घालण्यास का कचरतो ? सौदी अरेबियाच्या पावलावर पाऊल टाकून भारत अशी कारवाई कधी करणार ? कि या संघटनेने भारतात कारवाया केल्यावर भारत जागा होणार ? – संपादक
रियाध (सौदी अरेबिया) – ‘तबलिगी जमात’ या सुन्नी मुसलमानांच्या धार्मिक संघटनेवर बंदी घालण्याची घोषणा सौदी अरेबियाचे इस्लामी व्यवहार मंत्री डॉ. अब्दुल लतीफ अल्-अलशेक यांनी सामाजिक माध्यमांद्वारे केली. या संघटनेवर ‘जिहादी आतंकवादाच्या प्रवेशद्वारांपैंकी एक’ आणि ‘समाजासाठी धोकादायक’ असा ठपका ठेवण्यात आला आहे. इस्लामी व्यवहार मंत्रालयाने मशिदींना याविषयी लोकांपर्यंत माहिती पोचवण्याचे निर्देश दिले आहेत.
Saudi Arabia has banned the Tablighi Jamaat, terming it a “danger to society” and “one of the gates of terrorism”.https://t.co/zbISsWkq7F
— Hindustan Times (@htTweets) December 12, 2021
सौदी अरेबियाच्या धार्मिक व्यवहार मंत्रालयाने मशीद आणि मौलवी (इस्लामचे धार्मिक नेते) यांना दिलेल्या निर्देशांनुसार, शुक्रवारच्या नमाजपठणानंतर मार्गदर्शन करतांना पुढील विषयांचा समावेश करण्यास सांगितले आहे,
१. तबलिगी जमात लोकांचा बुद्धीभेद करून त्यांना, मुख्यत्वे तरुणांना आतंकवादाच्या जाळ्यात ओढते, हे लोकांना सांगा. २. या संघटनेच्या सर्वांत महत्त्वाच्या चुकांचा उल्लेख करा. ३. ‘ही संघटना जनतेसाठी धोकादायक आहे’, हे लोकांपर्यंत पोचवा. ४. ‘सौदी अरेबियात तबलिगी जमातसह इतर धोकादायक गटांशी संबंध ठेवणे अवैध आहे’, हेसुद्धा जनतेला सांगा. |
भारतात कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या प्रसारामागे तबलिगी जमात असल्याचा झाला होता आरोप !
वर्ष २०२० मध्ये भारतात कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेला तबलिगी जमातचे सदस्य कारणीभूत ठरल्याचा आरोप झाला होता. देहली येथील निझामुद्दीनमधील या संघटनेच्या मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमानंतर विविध राज्यांत परतलेल्या जमातच्या सदस्यांमुळे देशात कोरोनाचा संसर्ग सर्वत्र झपाट्याने वाढल्याचे सांगण्यात आले होते. या प्रकरणी अनेक सदस्यांना अलगीकरणात ठेवल्यावर त्यांच्याकडून परिचारिकांचा विनयभंग करण्यासह डॉक्टरांना मारहाण करण्याच्या घटनाही घडल्या होत्या. यासह काही ठिकाणी मशिदींमध्ये लपलेल्या सदस्यांना शोधण्यास गेलेल्या पोलिसांवरही आक्रमणे करण्यात आली होती. या संघटनेच्या भारतातील प्रमुखाला अद्यापही पोलिसांनी या प्रकरणी अटक केलेली नाही.
तबलिगी जमातचा इतिहास !
देवबंदी मौलाना (इस्लामी विद्वान) महंमद इलियास कांधलवी यांनी वर्ष १९२६ मध्ये सुन्नी मुसलमानांची ‘तबलिगी जमात’ ही संघटना स्थापन केली. ही संघटना इस्लामच्या अनुयायांना धार्मिक प्रवचन देण्याचे काम करते. अराजकीय असलेल्या या संघटनेचा उद्देश हा केवळ ‘इस्लामची ५ मूलभूत तत्त्वे समजावून सांगणे’ इतकाच होता. आता मात्र ही संघटना जिहादी आतंकवादी कृत्यांसाठी ओळखली जाते. या संघटनेचा प्रसार संपूर्ण जगात झाला असून तिचे जगभरात ४० कोटी सदस्य आहेत.