पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार यांनी साधकांना साधनेविषयी वेगवेगळ्या वेळी केलेले चैतन्यमय अन् अमूल्य मार्गदर्शन !

‘पू. (सौ.) अश्विनी पवार (पू. अश्विनीताई) देवद आश्रमातील साधकांचे स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन व्हावे’, या दृष्टीने त्यांचे सत्संग घेतात. पू. अश्विनीताई साधकांशी बोलतांना, व्यष्टी साधनेचे आढावे घेतांना किंवा सत्संग घेतांना त्यांच्या मुखातून काही वाक्ये सहज बाहेर पडतात. ती पुष्कळ साधी आणि सरळ असतात; मात्र ती ऐकणार्‍याच्या अंतर्मनापर्यंत पोचतात. त्यांचे ‘प्रत्येक वाक्य टिपून घ्यावे’, असेच असते. आम्हा साधकांना ती ‘साक्षात् देवाचीच ओघवती वाणी त्यांच्या मुखातून बाहेर पडते’, असे वाटते. त्यामुळे साधकांना साधनेत प्रयत्न करण्यासाठी दिशा मिळून उत्साह येतो. त्या सत्संग घेत असतांना सहसाधिकांनी त्यांच्या वाणीतून वेळोवेळी निघालेली चैतन्यमय सूत्रे टिपून ठेवली आहेत.

कालच्या लेखात आपण स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाविषयी पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी सांगितलेली सूत्रे पाहिली. आता या भागात मनाचा अभ्यास, साधना आणि सेवा यांविषयी सांगितलेली काही महत्त्वपूर्ण सूत्रे पाहूया.

मागील भाग पुढील लिंकवर पाहू शकाल – https://sanatanprabhat.org/marathi/532070.html

पू. (सौ.) अश्‍विनी पवार

२. मनाचा अभ्यास

२ अ. आपल्याला ‘काय करायचे आहे ?’, हे स्पष्ट असेल, तर मन भावनाशील होत नसणे : ‘आपल्या मनाला ‘आपले काय चुकले ?’, हे कळत नाही. त्यामुळे मन भावनिक होते आणि त्यामुळे ‘वाईट वाटणे किंवा दुःख वाटणे’, असे होते; पण ‘आपल्याला काय करायचे ?’ हे एकदा समजले की, मन भावनिक होत नाही. ‘ऐकण्याचे महत्त्व’ हे ऐकल्यावरच कळते.

कु. सोनाली गायकवाड

२ आ. ‘सकारात्मक विचार’ हा मनावर होत असलेला संस्कार असल्यामुळे मन सकारात्मक असायला हवे आणि त्यालाच ‘घडणे’, असे म्हटले जाणे : ‘विश्वास न वाटणे’ म्हणजे मनाचा कमकुवतपणा आहे. अशा दुबळ्या मनात लगेच नकारात्मक विचार येतात. दुबळ्या मनात शंका आणि संशय असतात. मनाची सकारात्मकता महत्त्वाची आहे; मात्र त्यासाठी शिकण्याची वृत्ती हवी. प्रत्येक वेळी ‘मनात सकारात्मक विचार येणे’, याला ‘घडणे’, असे म्हणतात. ‘विचार’, हा एक संस्कार आहे. त्यामुळे अधिकाधिक सकारात्मक विचार करायला हवा.

२ इ. अंतर्मुखता : ज्याची अंतर्मुखता अधिक असते, तितके त्याला ‘स्वतः अल्प पडलो’, हे लक्षात येते. त्याला शब्दांतून सांगण्याचीही आवश्यकता नसते. त्याला त्वरित सर्व समजते. ‘अंतर्मुखतेतील विचार’ म्हणजेच एक प्रकारची साधनेसाठी प्रेरणा असते. जो विचार आपल्याला योग्य कृती करायला प्रवृत्त करतो, त्यालाच ‘जाणीव’, असे म्हणतात. ज्याला चुकांची जाणीव होते, त्याला खंत वाटते.

२ ई. चांगल्या आणि वाईट विचारांचा परिणाम ! : मनातील नकारात्मक विचार दाबून ठेवल्याने त्याचे घनीकरण होते आणि ते अधिक तीव्र होतात. एकच विचार सतत केला की, तो आपोआपच लक्षात रहातो. भविष्याची चिंता अधिक असल्यास ध्येयनिश्चिती होऊ शकत नाही. विवंचना असेल, तर समर्पण होत नाही. आपल्या वृत्तीच्या संस्कारांवरून आपल्याभोवतीचे वायूमंडल सिद्ध होते. विचार ही एक शक्ती आहे.

१. अनावश्यक विचार : शक्ती वाया घालवणे

२. नकारात्मक विचार : शक्तीचे अधःपतन होऊन ती अयोग्य संस्कार निर्माण होण्यासाठी वापरली जाणे

३. सकारात्मक विचार : शक्तीचा योग्य वापर होणे

२ उ. बहिर्मुखतेमुळे व्यक्तीला योग्य निर्णय घेता येत नाहीत.

२ ऊ. ज्या व्यक्तीत भाव असतो, त्याची कृती सुंदर असते. ज्याच्यात भाव आहे, त्याला ‘व्यवस्थित कर’, असे सांगावे लागत नाही.

२ ए. ‘कुठलीही गोष्ट समजणे’ ही परिवर्तनाची प्रक्रिया असणे : जिज्ञासू वृत्ती म्हणजे ‘कळले की, त्याच क्षणी कृतीत आणणे’ होय. ‘समजणे’ ही परिवर्तनाची प्रक्रिया आहे. एखादे सूत्र कुणी सांगितले, तर ते समोरचा ऐकून घेतो. तेव्हा त्याला ते ‘समजले’, असे आपण म्हणू शकत नाही. जेव्हा ऐकणार्‍याला ते समजते, तेव्हा त्याच्यात परिवर्तनाची प्रक्रिया चालू होते. साधना म्हणजे परिवर्तनाची प्रक्रिया आहे.

२ ऐ. भक्तीविना आपले जीवन निरस आहे. निर्मळ मनातच भक्तीचा उगम होतो.

२ ओ. जोपर्यंत आपले मन आपल्याला कळू शकत नाही, तोपर्यंत आपण योग्य पाऊल टाकू शकत नाही.

सौ. स्नेहा हाके

३. साधनाविषयक सूत्रे

३ अ. जिथे अहं अल्प व्हायला आरंभ होतो, तिथे अध्यात्म चालू होते.

३ आ. चित्तावरील अयोग्य संस्कारांवर सतत योग्य दृष्टीकोनांची चैतन्यमय धार सोडायला हवी.

३ इ. चित्ताची झालेली प्रकिया म्हणजे चिंतन, अध्यात्मात प्रत्येक क्षणी परीक्षा असल्याने चिंतनप्रक्रिया सतत झाली पाहिजे ! : विचारप्रक्रिया हा चिंतनाकडे नेणारा मार्ग आहे. चित्ताची झालेली प्रक्रिया म्हणजेच चिंतन ! चिंतन ही मनाची जाणीव आहे. ज्ञान आणि अज्ञान हे चिंतनातूनच कळू शकते. योग्य कर्म करण्याची दिशा म्हणजे ज्ञान ! शाळेत आपली तिमाही किंवा सहामाही परीक्षा असतांना आपण किती अभ्यास करतो ? अध्यात्मात क्षणाक्षणाला परीक्षा असते. प्रत्येक क्षणाला असलेल्या परीक्षेसाठी आपली अभ्यासाची सिद्धता किती असायला हवी ? एकच गोष्ट सतत करत राहिल्याने शरीर आणि मन यांची क्षमता वाढते.

३ ई. ‘देवाला अपेक्षित’, असे वागणे, म्हणजेच प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पहाणे : भगवंत प्रत्येकाकडे वेगवेगळ्या दृष्टीने पहातो. ही दृष्टी आपल्यामध्ये यायला हवी आणि ती विकसित व्हायला हवी. ती दृष्टी असली की, आपण देवाला अपेक्षित असे वागायला लागतो. एखादा साधनेत पुढे जातो म्हणजे त्याची वृत्ती पालटते आणि मन स्थिर असते. तो कुठल्याही प्रसंगात प्रयत्नरत रहातो आणि देवाचे साहाय्य घेतो. त्याचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन योग्य असतो आणि तो सकारात्मक रहाण्यासाठी प्रयत्न करतो.

३ उ. देवाला हाक मारली की, तो येतोच. देव भावात अडकतो. ‘भाव’ हाच देवाचा संपर्क क्रमांक आहे.’

३ ऊ. अखंड सुधारण्याची प्रक्रिया म्हणजे साधना ! : ‘साधना म्हणजे ‘स्वः’ सोडणे’, याची स्वतःला जाणीव असणे आणि इतरांनाही जाणीव करून देणे म्हणजे साधक ! एखाद्यामध्ये भाव अल्प असला, तरी चालेल; पण अहं अल्प असायला हवा ! अखंड सुधारण्याची प्रक्रिया म्हणजे साधना !

३ ए. तत्त्वनिष्ठता असली की, आत्मविश्वास येतो.

३ ऐ. साधनेत चुका आणि वेळ या दोन गोष्टी सर्वांत महत्त्वाच्या आहेत. सत्संगात चुका लपवणे म्हणजे गुरुतत्त्वाचा अपमान आहे.

३ ओ. आपल्याला ‘अध्यात्मातील काही कळत नाही’, असे वाटते, तेव्हाच आपण अध्यात्मातील एका विशिष्ट स्थितीला पोचतो ! : अध्यात्मात बुद्धीचा वापर ‘मी समजून घ्यायला अल्प कसा पडतो ?’, हे समजून घेण्यासाठी करायचा असतो. आपल्याला आतून ‘मला खरंच काही कळत नाही’, असे वाटते, तेव्हा आपण अध्यात्माच्या एका विशिष्ट स्थितीला पोचलेलो असतो.

४. सेवाविषयक सूत्रे

४ अ. सेवेतील सर्वच कृती परिपूर्ण केल्यास त्या कर्मातून योग साधला जाणे : काही वेळा काही जणांकडून इतरांच्या दृष्टीत येणार्‍या सेवाच परिपूर्ण केल्या जातात. ज्या सेवा इतरांच्या दृष्टीस येत नाहीत किंवा इतरांना दिसत नाहीत, त्याही परिपूर्णच करायला हव्यात. आपले प्रत्येक कर्म चांगले हवे. प्रत्येक कर्मातून योग साधला पाहिजे. यशस्वी होण्यासाठी प्रत्येत कृती वेळेवर व्हायला हवी. अभ्यासातूनच निर्णयक्षमतेचा उगम होतो.

४ आ. प्रत्येकच सेवा चांगली आणि परिपूर्ण करतो, तो उत्तम सेवक असणे : कुणी कशीही सेवा करो; पण ती सेवा आपल्याकडे आल्यावर त्याचे सोने व्हायला हवे. तेवढी आपली क्षमता निर्माण व्हायला हवी. सेवा सोडून जो पलायन करतो किंवा सेवा व्यवस्थित करत नाही, तो कनिष्ठ सेवक. सांगेल, तितकेच करतो, तो मध्यम सेवक आणि काही न सांगता चांगली आणि परिपूर्ण सेवा करतो, तो उत्तम सेवक.

४ इ. आपली पात्रता आहे; म्हणून आपल्याला सेवा दिली जात नाही, तर आपल्यात पात्रता निर्माण होण्यासाठी सेवा दिली जाते.

४ ई. आपण इतरांवर जितके अवलंबून असतो, तितकी दायित्वशून्यता निर्माण होते.

४ उ. आपल्यात गुणवृद्धी होण्यासाठी सेवा असते. कार्यपद्धतीचे पालन म्हणजे धर्मपालन ! कार्यपद्धतीचे पालन करणे म्हणजे कृतज्ञता ! आपण कर्म नीट केले, तर आपल्या वाणीत चैतन्य येऊन समोरचा ऐकतो.

४ ऊ. तळमळ नसल्यास सेवेत समस्या निर्माण होतात. जितका उत्साह असेल, तितके चैतन्य आणि सकारात्मकता कार्य करते. सेवा भावपूर्ण केल्यास आवरण येत नाही.

४ ए. संतसेवेतील सर्वांत महत्त्वाचे सूत्र म्हणजे संतांचे मन जिंकणे !

४ ऐ. जीव ओतून सेवा केल्यास ती सेवाच आपल्याला सर्वकाही सुचवते आणि आपल्याकडून चूक होऊ देत नाही. आपली सेवा आपल्या साधनेचे दर्शन घडवते.

५. सनातन संस्था

५ अ. उत्तरदायी किंवा सहसाधक हे आपला आरसा असणे : उत्तरदायी किंवा सहसाधक हे आपला आरसा आहेत. आरसा ज्याप्रमाणे आपल्याला आपण जसे आहोत, तसेच दाखवतो, त्याचप्रमाणे उतरदायी साधक साधकांना साहाय्य करण्यासाठी ते त्यांना भ्रमात न ठेवता, ते जसे आहेत, ते स्पष्टपणे सांगतात. उतरदायी साधकांमध्ये आपण आपले व्यक्तीमत्त्व पाहू शकतो. आपण या आरशात पहायला (उतरदायी साधकांशी बोलायला) कधीही प्रतिमा आड येऊ द्यायची नाही किंवा घाबरायचे नाही. आपण आपला तोंडवळा पहातो, त्या आरशावर आपला विश्वास असतो, तसाच विश्वास उत्तरदायी किंवा सहसाधकरूपी आरशात आपले व्यक्तीमत्त्व पहातांना हवा.

५ आ. उत्तरदायी किंवा सहसाधक हे आपले मार्गदर्शकही असणे : आपल्याला गावाला जायचे असेल, तर मार्गात ‘अजून किती अंतर जायचे आहे ?’, हे सांगणारे दगड ठिकठिकाणी दिसतात. ते दगड आपले दिशादर्शक असतात. ते नसतील, तर आपली दिशा भरकटू शकते आणि आपल्याला निश्चित ठिकाणी पोचायला वेळ लागू शकतो. त्याचप्रमाणे ईश्वरप्राप्तीच्या मार्गात उत्तरदायी साधक आपले मार्गदर्शक आहेत. ते नसतील, तर ‘आपण साधनेच्या कुठल्या टप्प्याला आहोत ? कुठे जायचे आहे ?, हे आपल्याला कळले नाही, तर पुढे कसे जाणार ?’ उत्तरदायी साधकांवर विश्वास ठेवला की, मनाची घालमेल होत नाही.

६. संत

अ. आपला अहं जागृत अवस्थेत असतो. संतांचे तसे नसते. संतांच्या मनावर बाह्य गोष्टींचा परिणाम होत नाही.

आ. संतांनी प्रसंग घडण्यामागचे मर्म जाणले असल्याने त्यांच्या साधनेत खंड पडत नाही. कुणी कसेही वागले, तरी संत त्याला क्षमा करतात. आपण ‘हे असे का म्हणाले ? ते तसे का म्हणाले ?’, यात अडकतो.

– कु. सोनाली गायकवाड (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) आणि सौ. स्नेहा हाके (पूर्वाश्रमीची कु. स्नेहा झरकर)(आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२१.७.२०२१)

(समाप्त)