पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार यांनी साधकांना साधनेविषयी वेगवेगळ्या वेळी केलेले चैतन्यमय अन् अमूल्य मार्गदर्शन !

पू. (सौ.) अश्विनी पवार (पू. अश्विनीताई) ‘देवद आश्रमातील साधकांचे स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन व्हावे’, या दृष्टीने त्यांचे सत्संग घेतात. पू. अश्विनीताई साधकांशी बोलतांना, व्यष्टी साधनेचे आढावे घेतांना किंवा सत्संग घेतांना त्यांच्या मुखातून काही वाक्ये सहज बाहेर पडतात. ती पुष्कळ साधी आणि सरळ असतात; मात्र ऐकणार्‍याच्या अंतर्मनापर्यंत पोचतात. त्यांचे ‘प्रत्येक वाक्य टिपून घ्यावे’, असेच असते. त्या वेळी आम्हा साधकांना ‘साक्षात् देवाचीच ओघवती वाणी त्यांच्या मुखातून बाहेर पडते’, असे वाटते. त्यामुळे साधकांना साधनेत प्रयत्न करण्यासाठी दिशा मिळून उत्साह येतो. त्या सत्संग घेत असतांना सहसाधिकांनी त्यांच्या वाणीतून वेळोवेळी निघालेली चैतन्यमय सूत्रे टिपून ठेवली आहेत. ती येथे दिली आहेत.

पू. (सौ.) अश्‍विनी पवार

१. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया

१ अ. ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करणे’, हे साधनेतील शेवटपर्यंत करण्याचे साध्य आहे.

१ आ. निराशेत असलेला साधक आनंदी होऊ शकतो; पण ‘अहं’ला धरून बसलेला कधीच आनंदी होऊ शकत नाही !

१ इ. ‘मनाला नाही, तर देवाला काय अपेक्षित आहे ?’, ते समजून घेऊन कृती करणे योग्य असणे : स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया ही मनाच्या स्तरावरील आहे. त्याला अध्यात्माची जोड द्यावी लागते. ‘साधनेत ‘मला काय वाटते ?’, याला महत्त्व नसते, तर ‘देवाला काय वाटते ? त्याला काय अपेक्षित आहे ?’, हे महत्त्वाचे आहे. त्यानुसार कृती करावी लागते.

कु. सोनाली गायकवाड

१ ई. ‘स्वभावदोषांचे निर्मूलन करणे’, म्हणजे स्वतःच्या चुका सांगणे : स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेत प्रथम स्वतःची चूक सांगितली पाहिजे. ‘माझी साधना नीट चालू आहे’, अशा विचारांत असतांना कोणीही चूक सांगितली की, ती मनाला लागते. ‘मी श्रेष्ठ आहे’, ही भूमिका असेल, तर समोरच्याने चूक सांगितल्यावर अहंला ठेच लागून आपण हतबल होतो; मात्र अहं अल्प असलेला इतरांचे ऐकतो आणि इतरांना समजून घेतो.

१ उ. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेमुळे आपल्याला ‘मी कसा आहे ?’, याची खरी जाणीव होते.

१ ऊ. अहं अधिक आणि अल्प असल्याची लक्षणे : ‘इतरांसारखे मला जमणार नाही’, असे वाटणे’, हाही अहंच (न्यनूगंड) आहे किंवा आपल्याला ‘स्वतःचा अहं न कळणे’ हेसुद्धा अहंचेच लक्षण आहे. अहंमुळे मनातील भाव-भावना व्यक्त करता येत नाहीत. ‘स्वमतावर ठाम असणे’ हे अहंचे मोठे लक्षण आहे, तर ‘इतरांना त्वरित प्रतिसाद देणे’ हे अहं अल्प असण्याचे लक्षण आहे. ‘आनंदी असणे’, हे अहं अल्प असल्याचे लक्षण आहे. ‘ताण घालवणे आणि प्रतिमा तोडणे’ यांवरील एकमात्र उपाय म्हणजे प्रांजळपणे बोलणे.

१ ऊ १. देव भक्तासाठी वेगवेगळ्या भूमिका करतांना स्वतःची स्थिती पालटत असणे; पण अहंभाव असलेली व्यक्ती स्वमतावर ठाम रहात असणे : देव सर्व सृष्टीचा मालक आहे. त्याला कुणाचीच सेवा करण्याची आवश्यकता नाही, तरी त्याने संत एकनाथांच्या घरी श्रीखंड्या बनून पाणी भरले. भक्त प्रल्हादासाठी तो क्रोधित झाला. भक्तासाठी सृष्टीचा पालनकर्ता त्याची भूमिका पालटतो; पण आपण स्वतःची भूमिका पालटत नाही. स्वतःच्या मतावर ठाम असणे यावर उपाय म्हणजे इतरांनी सांगितलेले ऐकणे !

१ ए. चुकांमुळे साधकांभोवती आलेले काळ्या शक्तीचे आवरण काही वेळाने शमणे; पण अहंचा परिणाम मनावरून न जाणे : जो साधक अधिक चुका करतो, त्याच्याभोवती काळ्या शक्तीचे आवरण अधिक असते. त्याच्या चुकाच त्याच्याभोवती तसे आवरण निर्माण करतात. मनातील अयोग्य प्रतिक्रियांमुळे त्याच्या मनात अस्थिरता निर्माण होते. अयोग्य कृती किंवा अयोग्य विचार यांतून निर्माण झालेली आणि चैतन्यावर परिणाम करणारी स्पंदने काही वेळाने शमतात; पण अहंची स्पंदने शमत नाहीत.

सौ. स्नेहा हाके

१ ऐ. सर्वसामान्यांप्रमाणे राहिल्यास इतरांकडून लगेच शिकता येणे; कारण त्यात ‘स्व’चे विचार नसणे : ‘स्वः’च्या विचारांना धरून राहिल्यास समष्टीशी संपर्क साधू शकत नाही. आपल्या मनात असणार्‍या नकारात्मक विचारांचे प्रतीक म्हणजे निष्कर्ष ! समोरच्याच्या प्रतिसादाचा वेध घेण्याची मानसिकता असेल, तर त्याची अडचण समजून घेता येते. साधक जितका लहान होतो, तितका तो व्यापक होतो. जो स्वतःचे अस्तित्व मोठे समजतो, तोच साधनेत प्राथमिक स्तरावर (लहान) असतो. स्वतःला सर्वसामान्य समजल्यास इतरांकडून शिकता येते. आपण जितके सहज असू, तितकी शीघ्र प्रगती होते; कारण सहजतेमध्ये ‘स्व’चे विचार नसतात.

१ ओ. प्रतिदिन वेगवेगळ्या दगडांवर घाव घातल्यास दगड फुटत नाही. त्याचप्रमाणे प्रतिदिन वेगवेगळ्या स्वभावदोषांवर प्रयत्न केल्यास त्यांचे निर्मूलन होत नाही.

१ औ. चुकीच्या कृतीत ऊर्जा व्यय झाली, तर चांगल्या कृतीसाठी ऊर्जा न मिळणे : ‘ऊर्जा किंवा शक्ती एका रूपातून दुसर्‍या रूपात (शक्तीत) रूपांतरित (‘कन्व्हर्ट’) होते, उदा. एका ठिकाणी खड्डा खणला, तर दुसरीकडे डोंगर होतो. तसेच स्वभावदोष आणि अहं यांच्या विचारांमध्ये ऊर्जा व्यय झाली, तर सेवा किंवा साधना यांसाठी ऊर्जा कशी मिळणार ? मायेच्या विचारांत ऊर्जा व्यय होते. त्यामुळे साधनेसाठी ऊर्जा अल्प मिळते.’

– कु. सोनाली गायकवाड (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) आणि सौ. स्नेहा हाके (पूर्वाश्रमीची कु. स्नेहा झरकर)(आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२१.७.२०२१) (क्रमशः)

उर्वरित भाग पुढील लिंकवर पाहू शकाल https://sanatanprabhat.org/marathi/532479.html