मुंबई – महापालिकेच्या शाळा १५ डिसेंबरपासूनच चालू करणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त ए.एस्. चहल यांनी दिली. महापरिनिर्वाण दिनाला अनुयायांना गर्दी न करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
कोरोना विषाणूच्या ‘ओमिक्रॉन’ या नवीन प्रकारच्या पार्श्वभूमीवर चहल म्हणाले की, १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ सहस्र १२६ प्रवासी आतापर्यंत मुंबई विमानतळावर उतरले आहेत. त्यांतील १०० जण मुंबईतील असून इतर मुंबईच्या आसपासच्या जिल्ह्यांतील आहेत. त्यांचा शोध घेण्याचे काम चालू असून त्यांची कोरोनाची तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये ते ‘पॉझिटिव्ह’ आढळल्यास ‘जिनोम सिक्वेंसिंग’ (जनुक संश्लेषण) ही केले जाणार आहे.
मुंबईसाठी विशेष पालट म्हणून पहिल्या आणि दुसर्या डोसातील अंतरही अल्प करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. ४०० टन क्षमतेची ऑक्सिजन व्यवस्था, ऑक्सिजन प्लांट यांची पहाणी करून मोठ्या कोरोना केंद्राची परिस्थिती पडताळण्यासाठी रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. मुखपट्टी न घालणार्यांवरच्या कारवाईत वृद्धी करण्यात येणार आहे.