इस्रायलच्या राजदूतांनी संयुक्त राष्ट्रांच्या सभेत फाडला इस्रायलविरोधी अहवाल !

अनेकदा जागतिक व्यासपिठावर भारतविरोधी अहवाल सादर केले जातात, तेव्हा भारताने आजपर्यंत कधी अशी कठोर भूमिका घेतली आहे का ? – संपादक

इस्रायलचे राजदूत गिलाद एर्दन संयुक्त राष्ट्रांच्या सभेत इस्रायलविरोधी अहवाल फाडताना

न्यूयॉर्क (अमेरिका) – इस्रायलचे राजदूत गिलाद एर्दन यांनी संयुक्त राष्ट्र महासभेच्या व्यासपिठावर संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेचा इस्रायलविरोधी वार्षिक अहवाल फाडून टाकला. ‘हा अहवाल इस्रायलविरोधी आणि पक्षपाती असून त्याची खरी जागा कचराकुंडीत आहे. या अहवालाचा काहीही उपयोग नाही’, अशी संतप्त प्रतिक्रियाही त्यांनी या वेळी व्यक्त केली. या अहवालामध्ये इस्रायलच्या गाझापट्टीवरील आक्रमणानंतर स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीचा निष्कर्ष नमूद करण्यात आला होता. या अहवालातील माहितीनुसार इस्रायलच्या आक्रमणात ६७ मुले, ४० महिला आणि १६ वृद्ध यांच्यासह २६० पॅलिस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला होता. या अहवालात गाझापट्टीवरील आक्रमणासाठी इस्रायलची निंदा करण्यात आली होती.

महासभेला संबोधित करतांना एर्दन म्हणाले की, १५ वर्षांपूर्वी मानवाधिकार परिषदेची स्थापना झाल्यापासून तिने जगातील इतर देशांविरोधात केलेल्या १४२ निंदांपैकी ९५ वेळा इस्रायलचीच निंदा केली आहे. मानवाधिकार परिषद पूर्वग्रहदूषित असून या अहवालाने हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.