शाळेकडून अशी कृती झाली असेल, तर कारवाई करू ! – प्रशासन
|
कांकेर (छत्तीसगड) – येथील भानुप्रतापपूरमध्ये ख्रिस्ती मिशनरींकडून चालवण्यात येणार्या सेंट जोसेफ शाळेमध्ये शिकणार्या अंश तिवारी या विद्यार्थ्याला शाळेच्या मुख्याध्यापकांनी शेंडी कापून शाळेत येण्यास सांगितले. त्याला अंश याने शेंडी हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक असल्याचे सांगत ती कापण्यास नकार दिला. यामुळे मुख्याध्यापकांनी त्याला शाळेत येण्यास बंदी घातली. याची तक्रार भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष राजा पांडे यांच्याकडे करण्यात आल्यावर त्यांनी कार्यकर्त्यांसह शाळेत जाऊन विरोध केला. त्यांनी मुख्याध्यपकांच्या कक्षामध्ये भगवा ध्वज लावला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी परिस्थिती शांत केली. विशेष जिल्हाधिकारी जितेंद्र यादव यांच्यापर्यंत हे प्रकरण गेल्यावर त्यांनी सांगितले की, जर शाळेकडून अशी कृती करण्यात आली असेल, तर शाळेवर कारवाई केली जाईल.
सेंट जोसेफ शाळा गेल्या २० वर्षांपासून चालू आहे. वर्ष २०१९ मध्ये शाळेच्या मुख्याध्यापकांनी ‘भारतमाता की जय’ आणि ‘वन्दे मातरम्’ म्हणण्यावर बंदी घातली होती. तेव्हाही शाळेला विरोध झाला होता. या वेळी प्रशासनाने समजावल्यावर ही बंदी मागे घेण्यात आली होती. (यातून ख्रिस्ती शाळांची हिंदुद्वेषी आणि भारतद्वेषी मानसिकता स्पष्ट होते. याविषयी तथाकथित निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी बोलत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक)