|
मुंबई, ११ ऑक्टोबर (वार्ता.) – दक्षिण मुंबईत असलेल्या वाळकेश्वर येथे प्रभु श्रीरामाने बाण मारून निर्माण केलेले प्रसिद्ध बाणगंगा कुंड आणि तलाव आहे. ६ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या सर्वपित्री अमावास्येनंतर या तलावात अनेक मासे मृत झाल्याचे लक्षात आले. प्रत्यक्षात ‘प्रतिवर्षी ही समस्या येते’, असेही संबंधित न्यासाच्या पदाधिकार्यांनी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला सांगितले.
बाणगंगा हे पवित्र क्षेत्र असल्याने शेकडो भाविक येथे सर्वपित्री अमावास्येला पिंडदानाचा विधी करण्यासाठी येतात. ‘विधीनंतर मात्र अपेक्षित अशी स्वच्छता येथे केली जात नसल्याने या तलावातील सहस्रावधी मासे मृत होत आहेत’, असे लक्षात येत आहे. येथे विधींसाठी येणारे बहुसंख्य भाविक हे उत्तर भारतीय आहेत.
विधींनंतर अपेक्षित स्वच्छता केली जात नाही !
पितृपक्षातील सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी श्राद्धविधीच्या वेळी तलावाच्या ठिकाणी क्षौरकर्म (श्राद्धकर्म करण्यापूर्वी डोक्यावरील केस काढण्याचा विधी) केले जाते. क्षौरकर्म झाल्यानंतर भाविक तलावामध्ये स्नान करतात. त्या वेळी केस तलावामध्ये जातात. तलावाच्या ठिकाणी करण्यात येणार्या पिंडदानाच्या वेळी अन्न आणि गुलाल हेही मोठ्या प्रमाणात तलावात जातात. यांमुळे हे मासे मरत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वहाते पाणी नसल्याने विधीनंतर येथे केस, पिंड किंवा निर्माल्य पाण्यात जाणार नाही, याची दक्षता भाविकांनी घेणे आवश्यक आहे; मात्र तसे होतांना दिसत नाही.
तीर्थक्षेत्राच्या न्यासाने कल्पना देऊनही पालिकेचे कर्मचारी २ दिवस विलंबाने आल्याने तीर्थक्षेत्री दुर्गंधी !
सर्वपित्री अमावास्येला बाणगंगेतील मासे मृत झाल्यानंतर प्रतिवर्षी महानगरपालिकेचे कर्मचारी बाणगंगेतून मृत मासे काढून त्याची विल्हेवाट लावतात. तीर्थक्षेत्राच्या ‘गौड सारस्वत ब्राह्मण टेम्पल ट्रस्ट’कडून यावर्षीही मृत मासे काढण्याविषयी महानगरपालिका प्रशासनाला पूर्वकल्पना देण्यात आली होती; मात्र पालिकेचे कर्मचारी आले नाहीत. त्यामुळे देवस्थानने वेतनावर माणसे लावून हे मृत मासे बाणगंगेतून बाहेर काढले. मासे बाहेर काढल्यानंतर ते घेऊन जाण्याविषयी देवस्थानकडून प्रशासनाला कळवण्यात आले; मात्र पालिका कर्मचारी २ दिवसांनी आले. यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली होती.
अपुरी उपाययोजना !
तलावाच्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेकडून ‘निर्माल्य आणि पिंड काहीही थेट पाण्यात टाकू नये. निर्माल्य किंवा पिंड तलावामध्ये बुडवून अन्यत्र ठेवावे’, असे सूचनाफलक लावण्यात आले आहेत; मात्र भाविकांकडून त्याचे पालन केले जात नाही. (तीर्थक्षेत्राचे पावित्र्य भंग करणार्या भाविकांना विधींचे अपेक्षित फळ मिळेल का ? – संपादक)
पुरातत्व विभाग, महापालिका आणि तीर्थक्षेत्र न्यास यांनी एकत्र मिळून ठोस अन् कायमस्वरूपी उपाययोजना काढणे आवश्यक !
बाणगंगा हे क्षेत्र पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येते. त्यासमवेतच हिंदूंच्या या पवित्र क्षेत्राचे पावित्र्य जपणे, हे मुंबई महानगरपालिका प्रशासनाचेही दायित्व आहे. बाणगंगा तीर्थक्षेत्र न्यास ‘गौड सारस्वत ब्राह्मण टेम्पल ट्रस्ट’ने प्रतिवर्षी होणारा हा प्रकार रोखण्यासाठी पुरातत्व विभाग आणि महापालिका यांच्यासमवेत भाविकांचे प्रबोधन करणे किंवा न ऐकल्यास त्यांना दंड करणे आदी कायमस्वरूपी उपाययोजना काढून बाणगंगेचे कुंड स्वच्छ कसे राहील, हे पहाणे आवश्यक आहे. यामुळे कुंडाचे पावित्र्य राखले जाईल, असे हिंदूंना वाटते. यासमवेतच भाविकांच्या धार्मिक भावना जपून भाविकांना शिस्त लावणे आवश्यक आहे, असेही हिंदूंचे म्हणणे आहे.