अन्य धर्मांच्या तुलनेत हिंदु धर्म आणि ‘हिंदुत्व’ हेच ‘धर्मनिरपेक्षते’चे खरे संरक्षककवच ! – संपादक
अन्य धर्मियांना स्वधर्मात न घेणारे जगातील एकमेव ज्यू धर्मीय !
‘आपलेच खरे, आपला धर्मग्रंथ जे सांगतो तोच शाश्वत आणि अखेरचा शब्द’, असे मानणारे जे धर्म आहेत त्यांतील सर्वांत प्राचीन म्हणजे ‘जुडाईझम्’ म्हणजे ज्यूंचा धर्म; पण हा धर्म वंशशुद्धीवर भर देतो. बाहेरच्यांना (अन्य धर्मियांना) आत (धर्मांतर करून) घेत नाही. त्यामुळे ‘ज्यूंचा धर्म आजच्या लोकशाहीच्या जमान्यात हिंदूंवर सांस्कृतिक आक्रमण करील’, अशी भीती बाळगण्याचे कारण नाही; पण पुढे ख्रिस्ती धर्माचा संस्थापक झालेला येशू ख्रिस्त हा धर्मस्थापनेपूर्वी ज्यू होता आणि त्यांनी ज्यू समाजातील एका अतिरेकी स्वरूपाच्या विचाराच्या आधारे नवा धर्म स्थापन केला. नंतरच्या काळात ज्यूंना परागंदा व्हावे लागले आणि ख्रिस्ताने नव्या स्वरूपात जो धर्म आपल्या अनुयायांना दिला, त्यात सत्ताधारणेचाच विचार प्रमुख होता.
धर्मांतराद्वारे राष्ट्रांतर करण्याची छुपी कारस्थाने करणारे ख्रिस्ती आणि मुसलमान !
हिंदुत्व विचारक नवरत्न राजाराम यांनी हिंदु, ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्मांची तुलना करतांना ‘इस्लाम, ख्रिस्ती आणि जुडाईझम् (ज्यूंचा धर्म) यांची मूलतत्त्वे याचे मूलस्थान ‘बिब्लिकल’ किंवा ‘सेमिटिक’ (इस्रायलमधील एक पंथ) परंपरेत सापडते’, असे म्हटले आहे. त्याचा अर्थ व्यापक ऐतिहासिक संदर्भात समजून घेतला, तरच आजच्या इस्लामी आणि ख्रिस्ती राजकारणातील विसंगतीत एक आंतरिक सुसंगती सापडू शकते. सार्या जगात संख्याबळाच्या आधारे लोकशाही यंत्रणेचा उपयोग करून राजकीय सत्ता बळकावणे, हा या ‘सेमेटिक’ पंथांचा अंतिम हेतू आहे. धर्मतत्त्व या दृष्टीने ख्रिस्ती आणि इस्लाम (‘कम्युनिझम्’ (‘साम्यवाद’ नावाचा नवा जडवादी पंथ यांत नंतर समाविष्ट झाला)) हे धर्म राष्ट्रवाद मानीत नाहीत; पण विशिष्ट राज्यांत ख्रिस्ती किंवा मुसलमान बहुसंख्य असल्याने त्यांना ख्रिस्ती किंवा इस्लामी राष्ट्रे म्हटले जाते. या दोन्ही राष्ट्र गटांत धर्मांतराने राष्ट्रांतर करण्याची छुपी आणि उघड कारस्थाने अखंड चालत असतात. हिंदुस्थानी उपखंड आणि भोवतालचे गरीब प्रदेश हे त्यांच्या दृष्टीने संख्याबळ वाढवण्याचे एक ‘सॉफ्ट टार्गेट (सहज लक्ष्य करता येण्यासारखे) आहे. हे समजून घेण्यासाठी नवी पुस्तके वाचण्याची आवश्यकता नाही. केवळ नव्या, निर्भय हिंदू (समावेशक) दृष्टीने समोर घडत असलेल्या घटनांकडे पहाण्यास शिकले पाहिजे.
मूर्तीभंजक ख्रिस्ती आणि मुसलमान !
युरोपातील ख्रिस्ती धर्मप्रचार करतांना तेथील ‘पॅगन’ (मूर्तीपूजक) संस्कृती नामशेष करण्यात तत्कालीन ख्रिस्ती धर्मप्रचारकांनी पुढाकार घेतला होता. तसेच मध्यपूर्वेत इस्लामचा प्रचार करतांना प्रेषिताच्या अनुयायांनी तेथील मूळ मूर्तीभंजकांचा (जे अरबच होते) कसा दारूण पराभव केला, हे नव्याने सांगणे न लगे; पण आज काही शतकांनंतर या इस्लामी इतिहासाचेही इस्लामी देशात पुनर्विलोकन आणि पुनर्लेखन होत आहे.
‘हिंदुत्व’ हेच ‘धर्मनिरपेक्षते’चे खरे संरक्षककवच !
‘आपलेच खरे, आपला धर्मग्रंथ जे सांगतो तेच शाश्वत आणि अखेरचा शब्द’, असे श्रद्धापूर्वक मानणार्या असहिष्णु धर्मांना यापुढे भविष्य नाही. त्यांना देशकालपरिस्थितीनुरूप पालटावेच लागेल. हिंदूंचा एकच एक असा धर्मग्रंथ नाही. एकच एक देव नाही, देवाचा एकच एक असा प्रतिनिधी किंवा संदेशवाहक नाही. ‘बायबल’ हा ख्रिस्त्यांचा एकच एक पवित्र ग्रंथ आहे. त्यांचा एक देव आहे, त्या देवाचा एक पुत्र आहे, ‘त्या पुत्राला जे मानतील तेच स्वर्गाला जातील’, अशी शिकवण आहे. ‘हीच ख्रिस्त्यांची शक्ती आहे’, असे समजून तोडीस तोड म्हणून ख्रिस्त्यांप्रमाणेच आपला एक श्रद्धेय निवडावा म्हणून हिंदूंनी ‘श्रीमद्भगवद् गीता’ हा धर्मग्रंथ निवडला. ही निवड योग्य होती. स्वातंत्र्याच्या क्रांतीकारक चळवळीत अनेकांनी ‘गीता’ हातात घेऊन स्वतःची मान फासाच्या दोरीत लटकवली. हिंदू संघटनेस त्यामुळे बळ मिळाले; पण त्या गीतेतही श्रीकृष्णाने अर्जुनाला सर्वज्ञान दिल्यानंतर ‘यथेच्छसि तथा कुरु ।’ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १८, श्लोक ६३ (अर्थ : जशी तुझी इच्छा असेल, त्याप्रमाणे कर.) असे सांगितले. ‘माझेच खरे, माझेच ऐक’, असे सांगितले नाही. ‘कोणतीही पूजापद्धती स्वीकारावी, कोणत्याही देवाला भजावे; पण धर्मानुसार कर्तव्य करण्यास विसरू नये’, असे सांगून धर्माचे चिंतन करण्यास स्वातंत्र्य देणारा एकच देश आहे. त्या देशात ८० टक्क्यांच्या वर जनता हिंदू आहे. त्यांचे ‘हिंदुत्व’ हेच ‘धर्मनिरपेक्षते’चे खरे संरक्षककवच आहे. म्हणून या जगातील हिंदूंची संख्या अल्प होऊ न देणे, हिंदूंना बाटवून ‘डॉग्मॅटिक’ (सैद्धांतवादी म्हणवणार्या) पंथात पळवून नेण्यास इतरांना प्रतिबंध करणे आणि एकेश्वरी; पण मध्ययुगीन संस्कारात अडकून पडलेल्यांना २१ व्या शतकातील उदारमतवादाची ओळख करून देणे, हे हिंदुस्थानच्या प्रशासनाचे कर्तव्य आहे.
इस्लामला पहिला विरोध भारतातच झाला !
ख्रिस्ती धर्माचा प्रारंभीचा प्रचार तलवारीच्या जोरावरच झाला, हे स्पष्ट होते. नंतर इस्लामचा प्रचार त्याच पद्धतीने झाला. एकेकाळी हिंदु आणि बौद्ध असलेला देश पुढे अफगाणिस्तान झाला. तेथून टोळीवाल्यांच्या धाडी हिंदुस्थानात पडत होत्या. हे टोळीवाले तुर्क होते, बर्बर होते, मंगोलियन (मुसलमानांतील जमाती) होते; पण त्यांचा सामायिक धर्म इस्लाम म्हणून भारतात त्यांना ‘मुसलमान’ म्हणून ओळखण्यात येऊ लागले. युरोपात आणि मध्य आशियात अफगाणिस्तानपर्यंतचे इस्लामचे धार्मिक आक्रमण सोपे झाले; पण त्या त्या धर्माला परिणामकारक प्रतिबंध (विरोध) पहिल्यांदा हिंदुस्थानातच झाला. अरबांनी इस्लाम धर्मप्रचाराच्या नावाखाली प्राचीन पर्शियन (इराणी) संस्कृती गाडून टाकली. अरबांनी इस्लाम स्वीकारतांना त्यांचा जुना ‘पॅगन’ (मूर्तीपूजक) इतिहास गाडण्याचे ठरवलेच होते. या अर्थाने ‘अरब हे इस्लामचे पहिले बळी’, असे म्हटले जाते. याच अर्थाने पर्शियन संस्कृती दुसरा बळी. अरबांचे राज्य विस्तारले, ते साम्राज्यवादी झाले आणि साम्राज्य वाढवण्याचे एक प्रभावी हत्यार म्हणूनच इस्लामचा पुढे अरबांनी उपयोग केला.
इराणी मुसलमानांमध्ये ‘इराणी’ असल्याची होत असलेली जागृती !
पहिल्या महायुद्धानंतर अरबांचे हे इस्लाम धर्माधिष्ठित साम्राज्य युरोपिय ख्रिस्त्यांच्या कह्यात गेले. मित्र राष्ट्रांनी (अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया आदी देशांनी) ते आपसांत वाटून घेतले. जगात आज ५२ मुसलमान देश आहेत; पण त्यातील फारच थोडी इस्लामी आहेत. पर्शियासारख्या इस्लामी रिपब्लिक (प्रजासत्ताक) राष्ट्रांतही बहुसंख्य मुसलमान नागरिकांमध्ये आजही सौदी अरेबियाविषयी अढी आहे. ‘आपण आधी ‘इराणी’ आणि नंतर ‘मुसलमान’ अशी राष्ट्रीय भावना त्यांच्यामध्ये वाढीस लागली आहे. अरबी भाषेतील धार्मिक विधींची पुस्तके वाचण्याऐवजी इराणी शासनकर्ते इराणी भाषेतील पुस्तकांना उत्तेजन देत आहे. ‘आपली मूळ संस्कृती अरबांनी बुडवली’, असा त्यांचा ग्रह आहे.’ – वसंत गडकर
(साभार : मासिक ‘ धर्मभास्कर’, जुलै १९९९)