मुंबई – आपल्या राज्यात, देशात आणि संस्कृतीत महिलांना पूजनीय स्थान देण्यात आले आहे. महिला अत्याचारातील घटनांमध्ये शिक्षेचे प्रमाण वाढायला हवे. ‘अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यास आरोपीला देहदंडाची शिक्षा करावी’, अशी मागणी आम्ही लावून धरली; पण आजचे चित्र विदारक आहे. खरे काम पोलिसांचे आहे. ‘फास्ट ट्रॅक’ न्यायालय सिद्ध झाले असून अन्वेषण यंत्रणा तात्काळ कार्यान्वित झाल्या पाहिजेत. आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. अशी शिक्षा झाली पाहिजे की, परत कुणी महिलेला स्पर्श करण्याची, त्रास देण्याची, तसेच वाकड्या दृष्टीने पहाण्याचे धैर्यच व्हायला नको, असे प्रतिपादन भाजपच्या नेत्या सौ. पंकजा मुंडे-पालवे यांनी केले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. महाराष्ट्रातील बलात्काराच्या वाढत्या घटनांच्या अनुषंगाने त्या बोलत होत्या.