विद्वेषी प्रसाराला ‘समर्थ’पणे तोंड द्या !

 संपादकीय

समर्थ रामदासस्वामी व छत्रपती शिवाजी महाराज

संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी पुणे येथे एका मैदानाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिक्षणाविषयी उल्लेख करतांना त्यांचे गुरु ‘समर्थ रामदासस्वामी आणि दादोजी कोंडदेव’ यांचा उल्लेख केल्याने परत एकदा जातीद्वेषी राजकारण उफाळून आले आहे आणि नेहमीप्रमाणेच माध्यमांनीही सत्य बाजू मांडण्याऐवजी नकारात्मक वृत्ते दिली आहेत. ‘समर्थ रामदासस्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु असल्या’चे पुरावे उपलब्ध असतांना ‘केवळ एका विशिष्ट गटाला वाटते म्हणून त्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेठीस धरून विद्वेषी राजकारण करायचे’, हे कितपत योग्य आहे ? सध्याची पत्रकारिताही संशोधनवृत्ती न ठेवता अशा जातीयवादी राजकारणाची ‘री’ ओढत असल्याने तिचाही दर्जा खालवला आहे. एखादा समाज परंपरेने जी गोष्ट अनेक वर्षे मानत असतो, त्यात तथ्य असतेच. शिवाय समर्थ रामदासस्वामी हे समकालीन, त्याच परिसरातील आहेत आणि विशेष म्हणजे ते सामान्य संत नसून राष्ट्रगुरु आहेत, एवढी साधी गोष्टही यातील सत्यता लक्षात आणून देते.

‘ब्राह्मणांनी दलितांवर अन्याय केला’ हे ब्राह्मणद्वेषाचे भूत बहुजन समाजाच्या डोक्यावर घालण्यात इंग्रज आणि त्यानंतर राजकारणी एवढे यशस्वी झाले की, ३ शतकांनंतरही ते उतरण्याचे नाव घेत नाही. ‘आमच्याकडे जाती होत्या; पण ‘द्वेष’ नव्हता’, हे सत्य जाणून त्याचे पुरावे आज वैचारिक धर्मप्रेमींनी समाजासमोर ठेवले पाहिजेत, समवेत जातीद्वेष पसरवणार्‍यांचे बिंगही उघडे पाडले पाहिजे; जेणेकरून समाजाची दिशाभूल थांबेल. ‘जातीजातींत द्वेष पोसण्यात यशस्वी झालेले स्वार्थी राजकारणी आणि लेखक यांची चलती संपण्याचे दिवस जवळ येत आहेत’, हेही त्यांनी ध्यानात घेतले पाहिजे. ‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही’ याप्रमाणे जातीयवाद्यांनी कितीही कंठशोष केला म्हणून सत्य इतिहास पालटणार नाही. दादोजी कोंडदेव आणि समर्थ रामदासस्वामी यांचे नाव घेतल्यावर सध्या जो काही ब्राह्मणद्वेष उफाळून येतो, त्याला येणारा काळच सडेतोड चपराक देईल.

काही वर्षे आधी ‘हिंदु राष्ट्र’ शब्द उच्चारला, तर विजेची लहर गेल्यासारखे वाटत होते. ‘लव्ह जिहाद’ ही संकल्पनाच नाकारली गेली. आता ३ राज्यांत लव्ह जिहादच्या विरोधात कायदे झाले. वर्ष २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधानपदावर येईपर्यंत त्यांच्या विरोधात प्रतिदिन गरळओक करणार्‍या माध्यमांची निवडणुकीच्या निकालाच्या दुसर्‍या दिवसापासून भाषा नरमली. ‘राममंदिर होईल, ३७० कलम रहित होईल’, असेही यापूर्वी वाटले नव्हते. त्याचप्रमाणे जातीभेदाच्या विद्वेषी राजकारणाला भिऊन ‘समर्थ रामदासस्वामी छत्रपती शिवरायांचे गुरु होते’ हे लिहायला आणि दाखवायला कचरणारी माध्यमे मात्र उद्या राष्ट्र आणि धर्म निष्ठांनी दिलेले इतिहासाचे पुरावे दाखवतील हे निश्चित !