मोगलांचे वंशज !

(उजवीकडे) कबीर खान

चित्रपट दिग्दर्शक कबिर खान यांनी ‘चित्रपटातून मोगलांना नकारात्मक दाखवल्यामुळे मला त्रास होतो. त्यांना न्यून लेखणारे चित्रपट मी सहन करू शकत नाही. मोगल हे भारताला घडवणारे खरे शासक होते’, असे वक्तव्य केले आहे. कबिर खान यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा खरा इतिहास आणि खोटा इतिहास हा वाद पेटला आहे. स्वातंत्र्यानंतर साम्यवाद्यांनी मोगलांचे उदात्तीकरण करणारा इतिहास लिहिला. त्यामुळे मोगलांना ‘आक्रमक’, ‘अत्याचारी’, ‘पाशवी वृत्तीचे’ असे म्हटल्यावर कबिर खान यांच्यासारख्या धर्मांधांचे डोके फिरते. त्यांच्या मते मोगलांना ‘आक्रमक’ किंवा नकारात्मक रंगवणे, ही ऐतिहासिक चूक आहे. वास्तविक ऐतिहासिक कागदपत्रे चाळल्यास मोगलांना ‘सदाचारी’, ‘जनताभिमुख’ म्हणून रंगवणे ही इतिहासाशी केलेली प्रतारणा ठरेल, हे या मोगलप्रेमींच्या लक्षात येत नाही. मोगलांचा किंवा कोणत्याही मुसलमान आक्रमकांचा इतिहास हा त्यांच्या दरबारी असलेले सरदार किंवा त्यांच्या ताटाखालील मांजरे असणार्‍या लोकांनी लिहिला आहे. त्यामुळे ते त्यांचे उदात्तीकरण करणारच ! मोगलांचा इतिहास अभ्यासायचा असेल, तर राजपूत किंवा मराठा यांनी त्या काळात लिहिलेल्या कागदपत्रांचा अभ्यास करावा लागेल. हुमायू, बाबर, अकबर, जहांगिर आदी मोगल आक्रमकांनी केलेले अत्याचार झाकले जातात आणि त्यांना ‘कल्याणकारी राजा’ म्हणून रंगवले जाते. कबिर खान यांच्या वक्तव्याचा समाचार भारतातील राष्ट्रप्रेमी घेतीलच; मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली मुसलमान आक्रमकांचे जे उदात्तीकरण चालू आहे, ते कधी थांबणार ?

भारतात अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासाठी इतिहासाची तोडफोड करण्यात आली. यामुळे अल्पसंख्य समाज सुखावला; मात्र बहुसंख्य हिंदूंचे काय ? मुसलमान आक्रमकांचे अन्याय आणि अत्याचार सहन करून हिंदूंनी स्वतःचा धर्म, परंपरा टिकवून ठेवली. स्वधर्म टिकवण्यासाठी हिंदूंनी प्राणत्यागही केला आहे. हा इतिहास आहे; मात्र सध्या पीडा देणार्‍यांना ‘पीडित’ आणि ‘पीडितां’ना ‘पीडा देणारे’ म्हणून रंगवले जात आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखवून ‘जोधा अकबर’सारखे चित्रपट किंवा बाबरावर आधारित ‘द एम्पायर’ ही मालिका निघते. यात चुकीचा इतिहास दाखवला जातोच, त्यासह आक्रमकांचे उदात्तीकरण करून युवा पिढीची दिशाभूल केली जाते. हे थांबवण्यासाठी खोटा इतिहास सांगणार्‍यांना, लिहिणार्‍यांना कठोर शिक्षा करणारी तरतूद करणारे कायदे होणे आवश्यक. राष्ट्राच्या भूतकाळावर त्याचे वर्तमान आणि भविष्य अवलंबून असते. राष्ट्राचा गौरवशाली इतिहास जर आपण विसरलो, तर समृद्ध भविष्यासाठी आपण कृती कशी करणार ? चित्रपटांतून मोगलांचे खरे स्वरूप दाखवले; म्हणून कबिर खान यांना ‘वाईट’ वाटले, उद्या अन्य धर्मांधांना वाईट वाटेल; म्हणून इतिहास नाकारायचा का ? मोगलांचे वंशज आजही भारतात आहेत आणि ते मोगलांची तळी उचलत आहेत. अशांवर सरकारने कठोर कारवाई करणे आवश्यक !