केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांचा कार्यक्रम उधळण्याच्या प्रयत्नात असणार्‍या काँग्रेसच्या १० कार्यकर्त्यांना अंबड (जालना) येथे पोलिसांनी घेतले कह्यात !

काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

जालना – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे २३ ऑगस्ट या दिवशी अंबड गावाच्या दौर्‍यावर आहेत. अंबड शहरातून त्यांची दुचाकी वाहनातून फेरी निघणार आहे, तसेच शहरातील पंडित जळगावकर नाट्यगृहात त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. काँग्रेसचे काही कार्यकर्ते हा कार्यक्रम उधळून लावण्याच्या सिद्धतेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी अंबड शहरातील एका उपाहारगृहामधून काँग्रेसच्या १० कार्यकर्त्यांना कह्यात घेतले आहे. पोलिसांनी कार्यकर्त्यांना कह्यात घेताच त्यांनी दानवे यांच्या विरोधात घोषणा दिल्या. या कार्यकर्त्यांना अंबड पोलीस ठाण्यात नजर कैदेत ठेवण्यात आले आहे. (कायदा हातात घेणारे कार्यकर्ते असणारी काँग्रेस कायदा-सुव्यवस्थेचे राज्य काय देणार ? – संपादक)

जनआशीर्वाद यात्रेच्या वेळी बदनापूर येथील कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांनी भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करत ‘काँग्रेसचे नेते राहुल गांधी सांड (गायीचा नर) असून ते कोणत्याच कामाचे नाहीत’ असे वक्तव्य केले होते, तसेच ‘लोकांनी निरुपयोगी म्हणून सोडलेली जनावरे कोणत्याच कामांसाठी चालत नाहीत, तसे राहुल गांधी असून ते पंतप्रधानपदासाठी निष्क्रीय आहेत’, असेही ते म्हणाले होते. त्यानंतर राज्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.